Site icon आशुतोष ब्लॉग

मराठवाडा मुक्तिसंग्राम – लेख ४ – वंदे मातरम

मराठवाडा मुक्तिसंग्राम - लेख ४ - वंदे मातरम 1

“वंदे मातरम” हैदराबाद संस्थानात हे दोन शब्द उच्चारणे म्हणजे देशद्रोह ठरवला जात असे. अख्ख्या हिंदुस्तानात नाद घुमत असलेल्या या वंदे मातरम गीताची निजामाला मात्र वेगळीच धास्ती होती. वंदे मातरम म्हणजे ‘जातीय गीत’ आहे असा शिक्का मारून त्यावर बंदी घातली. वंदे मातरम वर बंदी घालताना निजामाला वाटत होतं की आपण एका गीतावर बंदी घालतोय, पण त्याला पुसटशीही कल्पना नसावी की त्याने त्याच्या साम्राज्याला भस्मसात करणाऱ्या एका अग्निकुंडाला जन्म दिला आहे. 

१९३८ हे वर्ष हैदराबाद मुक्तिसंग्रामाला एक कलाटणी देणारे वर्ष मानले जाते. एकाच वेळी तीन तीन वेगळे सत्याग्रह यावर्षी घडले, त्यातील सर्वप्रचलित आंदोलन म्हणजे “वंदे मातरम चळवळ”. ही विद्यार्थ्यांची चळवळ होती. औरंगाबादच्या इंटरमिजिएट कॉलेजात प्रार्थना म्हणून निजामाला उद्देशून त्याचे कुटुंब आणि साम्राज्य सदैव अबाधित राहो, अशी उर्दू दुवा म्हणण्याचा नियम होता. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आधीच रोष होता. त्यात शिक्षक म्हणून रुजू झालेले गोविंददास श्रॉफ यांना सरकारविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेऊन बडतर्फ केल्याची घटना घडली. हिंदू आणि मुस्लिम धर्मीय विद्यार्थ्यांना वेगळी वागणून मिळणे हे आणखी एक कारण. 

या सर्वांचा परिपाक होऊन १४ नोव्हेम्बर १९३८ रोजी विद्यार्थ्यांनी “वंदे मातरम” गाण्यास सुरुवात केली. आणि तिथूनच वंदे मातरम चळवळीची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी संप पुकारला, अन्नत्यागही केला. ही चळवळ पुढे वेगाने पसरली. हैदराबादचे उस्मानिया विद्यापीठ, हे एकमेव विद्यापीठ होते, तिथेही ही चळवळ पोचली आणि बघता बघता संपूर्ण राज्यातील महाविद्यालये ओस पडली. विद्यार्थ्यांनी सरकारी शाळा आणि महाविद्यालयांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केलं, आणि शेकडो मुलांनी आपलं शिक्षण पणाला लावलं.

या चळवळीने अनेक तरुण घडवले, पण त्यातल्या एकाची गोष्ट जरा वेगळीच आहे.

रामचंद्रराव वाविलाला नावाचा हा तरुण. मूळचा तेलंगणातील गडवालचा. उस्मानिया विद्यापीठाच्या या धगधगत्या दिवसांत तो आंदोलनात होता, आणि पुढे १९३९ साली सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल त्याला अटक झाली. हैदराबादच्या कुप्रसिद्ध चंचलगुडा तुरुंगात त्याची रवानगी झाली. तुरुंगात असताना त्याने रोजच वंदेमातरम गाण्याचा सपाट लावला, तेव्हा त्याला चाबकाचे फटके देण्यात आले, प्रत्येक फटक्यागणिक त्याने पुन्हा पुन्हा ‘वंदे मातरम’चा जयघोष केला. पुढे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या तरुणाचे नाव वंदेमातरम रामचंद्रराव असे ठेवले. ज्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली, त्यालाच नामरूपी आभूषण म्हणून मिरवण्याचे भाग्य या तरुणाला मिळाले. 

पुढे या माणसाची कहाणी संपली नाही. १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनातही ते सक्रिय होते आणि पुन्हा तुरुंगात गेले. आणि मुक्तिसंग्रामाच्या अखेरच्या टप्प्यात, १९४७ नंतर ते भूमिगत राहून निजामाच्या सैन्याची गुप्त माहिती गोळा करत होते आणि ती हैदराबादेतील भारताचे तत्कालीन एजंट-जनरल के. एम. मुन्शी यांच्यापर्यंत पोहोचवत होते. निजाम सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला आणि तो खटला चालू असताना त्यांची रवानगी झाली त्याच चंचलगुडा तुरुंगात.

पुढे हैदराबाद संस्थान भारतात विलीन केल्यानंतर हे वंदेमातरम रामचंद्रराव विकाराबाद येथून तीनवेळा आमदार निवडून आले होते. 

या वंदेमातरम चळवळीने मुक्तिसंग्रामाच्या यज्ञकुंडात नुसती समिधा टाकली नाही, तर त्या अग्नीला धगधगत ठेवणारे तरुण हात घडवले. १९३८ पर्यंत हा लढा मुख्यतः काही मोजक्या नेत्यांपुरता, सभा-संमेलनांपुरता आणि निवेदनांपुरता मर्यादित होता. पण वंदेमातरम चळवळीने पहिल्यांदा सामान्य विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणलं. जे तरुण त्या दिवसांत आपले वर्ग सोडून बाहेर पडले, ज्यांनी शिक्षण पणाला लावलं, ज्यांची हकालपट्टी झाली आणि जे नागपूर-जबलपूरला जाऊन शिकून पुन्हा हैदराबादेत परतले, तेच पुढची दहा वर्षं या लढ्याचा कणा बनले. 

ज्या गोविंददास श्रॉफ यांच्या बडतर्फीने या आंदोलनाची एक ठिणगी पडली, तेच पुढे गोविंदभाई श्रॉफ म्हणून मराठवाड्याच्या मुक्तिसंग्रामाचे अध्वर्यू ठरले, भूमिगत चळवळीचे सूत्रधार बनले. एका विद्यार्थी आंदोलनातून निघालेला माणूस एका सशस्त्र प्रतिकाराचा शिल्पकार व्हावा, यापेक्षा या चळवळीच्या परिणामाचा दुसरा पुरावा तो काय असणार? आणि हे एकच उदाहरण नाही, त्या पिढीतले अनंत भालेराव, दिगंबरराव बिंदू, माणिकचंद पहाडे असे कित्येक जण पुढे स्टेट काँग्रेसच्या, महाराष्ट्र परिषदेच्या आणि सत्याग्रहाच्या आघाडीवर उभे राहिले. वंदेमातरम चळवळ ही त्या सर्वांची पहिली शाळा होती.

आणि म्हणूनच ‘वंदे मातरम’ हे या लढ्यातलं नुसतं स्फूर्तीगीत राहिलं नाही, ते या लढ्याचं प्रतीक, स्वाभिमान बनलं. तुरुंगात जाताना तोंडी हेच शब्द, मोर्चात घोषणा देताना हेच शब्द, आणि १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामी सत्तेचा अंत झाल्यावर गावागावांत उमटलेला जयघोषही हाच. 

निजामाने ज्या दोन शब्दांना ‘जातीय’ ठरवून बंदी घातली, त्याच दोन शब्दांनी त्याच्या राज्याच्या शेवटाची घोषणा केली. औरंगाबादच्या कॉलेजात, उस्मानियाच्या वसतिगृहात १९३८ साली उमटलेला तो सूर पुढे दहा वर्षं मराठवाड्याच्या मातीत घुमत राहिला आणि ज्या दिवशी मराठवाडा मुक्त झाला, त्या दिवशी तो सूर विजयाचा नाद बनून परत आला.

Exit mobile version