मुंबई, तसं ह्या विषयावर नेहमीच लिहिलं जातं, विविधांगी आणि विविध पद्धतीने मुंबई बद्दलची माहिती रोजच कुठून येतच असते त्यात मी त्या विषयावर चार ओळी लिहिणं म्हणजे समुद्रात खडेमिठाचे तुकडे फेकून मीच तो खारट केला म्हणण्यासारखं आहे. अनेकांसाठी चाऊन चोथा असला तरी माझ्यासाठी हा नाविन्याचा विषय,सगळ्यांच्या मनात असेल तसं स्वप्नांचं शहर मुंबई माझ्यासाठी सुद्धा.
लहानपणापासून औरंगाबाद सारख्या ठिकाणी राहून मुंबई बद्दल फक्त ऐकून होतो, इथे मोठमोठ्या इमारती असतात. मोठं शहर म्हणजे वैभव,दिमाखदार, इथल्या बऱ्याच गोष्टींचं कौतुक. इथं पाय ठेवला की पहिलीच गोष्ट समोर दिसते ती म्हणजे माणसांची गर्दी. ही समोर दिसणारी जिकडे तिकडे पसरलेली गर्दी म्हणजे गोष्ट नकारात्मक आहे की सकारात्मक ते ठरवता येत नाही,कारण ते ठरवायला इथे ह्या गर्दीतल्या कुणालाही वेळ नाही. इतक्या मोठ्या गर्दीच्या लोंढ्याला अजिबात क्षणाची उसंत नाही. सर्व जण धावताहेत धावताहेत आणि कसल्यातरी मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताहेत. मोठी शहरं, मोठी माणसं म्हणजे त्यांची स्वप्नं मोठी असणार अन ती पुरी करण्यास ह्या माणसांना धावतच रहावं लागणार, आमच्या सारखी संथगती डुलत डुलत निघाली तर काम कसं चालेल?
इथे येण्याआधीच जिथं जिथं जायची त्या ठिकाणांचे पत्ते विचारावे म्हटलं, तर कळालं इथले सगळे अंतर मोजतात मिनिटांत,तेही लोकल रेल्वेच्या वेगाने. म्हणजे शहराच्या एक भागातून दुसऱ्या भागात जायला माणसाला तितकाच वेळ लागतो जितका त्या लोकल ला! ती लोकल मुंबईच्या रक्तात भिनली आहे, जणू काही त्या लोकल शिवाय ह्यांची वेळही पुढे सरकू नये.
कोपऱ्या कोपऱ्याने गाडीवर मिळणारा वडापाव इथे कधी कुणाला उपाशी ठेवत नसावा, एक खाल्ला की रात्री घरी पोहचून जेवण करेपर्यंत ह्यांच्या पोटाची विश्रांती.
तसं इथे सगळंच अजब आहे हो, म्हणजे रेल्वेचे एकामागून एक डबे असावेत तश्या खोल्यांनी बनलेल्या चाळी आणि त्याच प्रकारच्या निवासी इमारती. अगदी इवल्या इवल्या जागा, त्यात ही माणसं मोठ्ठाली स्वप्नं पाहत आरामात पहुडतात,अगदी सुखात. दादरच्या पुढे उड्डाणपुलावरून जाताना समोर दिसणाऱ्या उंच उंच भव्य इमारती पाहिल्या की खात्री पटते,मुंबई ने त्या छोट्या छोट्या खुराड्यांत राहून पाहिलेली,किंबहुना अनेकांनी पूर्ण केलेली हीच अशीच ती स्वप्नं आहेत बहुदा. उंच स्वप्नांच्या साक्षी त्या उंच इमारती भासतात.
इथे मुंबईबद्दल आणि तिथल्या माणसांबद्दल लिहिण्यासारखं खूप काही आहे. मुळात मुंबई आणि तिथली माणसं ह्या काही दोन वेगळ्या गोष्टी नाहीत,तिथली न थकणारी न थांबणारी माणसं म्हणजे मुंबई,तीच तिथला जीव, भलेही गर्दीत जीव घुसमटल्या सारखा होत असेल, पण ही गर्दीच तर मुंबई आहे, घोळक्यात राहूनही आपली ओळख जपणं हेच तर इथलं जीवन. अख्ख्या देशभरातून आलेली विविध रंगरूपाची यंत्रासारखी माणसं,त्यांना इथली लोकल चाके देते,गती देते, धावायला शिकवते. माधव ज्युलियन यांनी सांगितलेली थांबला तो संपला वगैरे ओळ खरी कुणी केली तर मुंबईने. जुनाट चाळीतल्या कोपऱ्यात झोपून अनेकांनी मोठी साम्राज्ये उभारली,ती ही मुंबईची ओळख.
इथं आयुष्य धकाधकीचे वगैरे नाही,मुंबई मध्ये कधीही न राहिलेल्यांना ते तसं वाटतं, मुंबईत राहिलेला माणूस कधी असं म्हणत नाही,तो वाट पाहतो,बेस्टची,लोकलची आणि गर्दीत ढकलून चढून निघून जातो,ह्याला मुंबईत धकाधकी म्हणत नाहीत.
मुंबई जगायला शिकवते असं कुणी म्हणालं ते उगीच नाही, इथे गिचमीडित गल्ल्या,झोपड्या आहेत,पण थोडी मान उंच केली तर मोकळा अथांग कोरा समुद्रही आहे. दिवसभर धावपळ करून ही माणसं रात्री समुद्राच्या किनारी जाऊन बसतात, सगळ्या धावपळीच्या आयुष्याला,त्रासांना,गर्दीला एक क्षणात पाठ करून समुद्राकडे बघत,भेळ खात आनंदानं आपली संध्याकाळ घालवतात,जणू काही ह्यांच्या पाठी असलेल्या धावाधाव जगण्याचं ह्यांना काही देणंघेणं नाही. अथांग समुद्रासारखी स्वप्नं डोक्यात घालून ही परत जातात,पुन्हा सकाळी त्या स्वप्नांच्या मागे धावायला. इथे सगळं खरंच अजब आहे, ह्याला अगदी थोडक्यात सांगणं शक्य नाही,मुंबई शब्दात सांगता येणं अवघड आहे,मुंबई कळायची म्हणजे इथं येऊन जगलं पाहिजे,दादरच्या पुलावर धावलं पाहिजे,लोकलच्या गर्दीत रेटून उभं राहिलं पाहिजे,वडापाव खाऊन दिवस ढकलायला पाहिजे,घामाच्या धारांत न्हाऊन निघालं पाहिजे.
माझ्यासाठी मुंबई ही धावणाऱ्यांची आहे,थांबला की धक्के पडणार,तुम्हाला धावावेच लागणार,थांबायला वेळ कुणाकडे आहे? मी ह्यावर जास्त लिहायला नको,जास्त लिहिलं तर ते वाचायला वेळ मुंबईला असेल का अशी शंका मला आहे.
Nicely put.
आशुतोष दादा खुपच छान लिहीलय…
Very Nice as usual, मुंबईचं संक्षिप्त स्वरूपात वर्णन करायचं झालं तर हे खूप छान केलंयस 🙂 आणि हो, थांबायला वेळ नाही हे खरंय पण हे वेळ काढून वाचावं असं मात्र आहे!
मस्त लिहतोस
Khup ch mast!!!
वाह छान मुंबई ची ओळख थोडक्यात पण खूप सुंदर लिह्लीस..
You have made many valid points. Those who have not been to Mumbai are missing something in Life. It is the city with tremendous character.
छान लिहिलय 👌 आवडलं 😊
धन्यवाद….!
चार ओळींत लिहलं असले तरी असंख्य सत्य परिस्थिती मांडली आहेस, आशु, मुंबई आणि मुबंईकरांन बद्दल खूपच छान, थोडक्यात लिहलेला तुझा ब्लॉग खूपच आवडला👌👌👌👌👍🚩
तू लिहत जा, वेळात वेळ काढून,आमचे स्थानक येईपर्यंत आम्ही तुझा ब्लॉग नक्कीच वाचू😊
अनेक शुभेच्छा👍
धन्यवाद पूजा