फेब्रुवारीचे दहा दिवस मी कामानिमित्त सिंगापूर मध्ये राहून आलो. सिंगापूर ला जाण्याचा कार्यक्रम एक दीड महिना आधीच नक्की झाला होता, पण जसजसे निघण्याचा दिवस जवळ येत गेला, तसतशा कोरोना व्हायरसच्या भीतीदायक बातम्या वाढत होत्या. मी निघतानाच्या आसपासची आकडेवारी पाहिली तर, कोरोना व्हायरस बाधित देशांच्या यादीत चीन नंतर दुसरा क्रमांक सिंगापूरचाच होता. त्यात सिंगापूर हा चिनी लोकांचे बाहुल्य असलेला देश, आणि हा संपूर्ण जगाचा “ट्रान्झिट पॉईंट”, त्यामुळे इथे कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा धोका खूप जास्त आहे असाच सर्वत्र प्रचार होता.
महागडे 4 मास्क, हँड सॅनिटायझर असा सगळा बंदोबस्त करून मी हैदराबाद विमानतळावर दाखल झालो. मी इथे येईपर्यंत मी कोरोनाच्या बाबतीत अत्यंत निश्चित होतो. पण मी सगळे अलबेल असल्यासारखे आलो असलो तरी विमानतळावर चित्र थोडे वेगळे होते. सीआरपीएफ च्या सुरक्षा तपासणी पासून साफसफाई कर्मचार्यांपर्यंत सर्वच जण वेगवेगळे मास्क घालून आपले काम करत होते. सामान जमा करण्या्चया वेळी, मी चिनला प्रवास केला नसल्याचे कागदावर लिहून घेतले आणि हळूहळू माझ्या मनात भीतीचे काहूर माजण्यास सुरुवात झाली. नजर टाकावी तिथे बहुतांश जण मास्क लावलेले. त्यात सिंगापूरला निघालेल्या एक दोन जणांनी सिंगापूर मध्ये परिस्थिती खूप चिघळली आहे, तुम्ही कशाला जात आहात इत्यादी चर्चा करून वातावरण अधिकच गंभीर बनवले.
हे सर्व वातावरण मी पहिल्यांदाच अनुभवत होतो, त्यामुळे माझी अवस्था “भित्या पाठी ब्रह्म राक्षस” अशी झाली होती. त्यावेळी माझी गोंधळाची अवस्था होती. एकतर मी कोरोना व्हायरस बद्दल संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केला नव्हता. मी केवळ ऐकीव माहितीच्या आधारावर अवलंबून होतो, आणि त्यानुसार, कोरोना म्हणजे एक भयंकर आजार असून त्यामुळे अनेकांचे मृत्यू झाले हेच एक सारखे डोक्यात घोळत होते. इथे येईपर्यंत बऱ्यापैकी निश्चिन्त असणारा मी आता मात्र बऱ्यापैकी दडपणाखाली आलो होतो. मुळात त्या विमानतळावरचे एकूणच वातावरण अत्यंत तणावाचे भासत होते. आधीच मध्यरात्रीची वेळ, त्यात जिकडे पहावे तिकडे मास्क आणि कोरोनाच्या चर्चा! एसटीच्या एशियाड बसमध्ये बसणारे प्रवासी लाल डब्याच्या बसकडे जसे हूडत नजरेने पाहतात तसे काहीसे इतर देशांकडे जाणारे प्रवासी आम्हा सिंगापुरी मास्कधारी प्रवाशांकडे बघत होते. अशा वातावरणामुळे आपण सिंगापूरला जाण्याचे टाळले असते तर बरे झाले असते अशा भयभीत मनाने ५ तास उशिराने आलेल्या विमानाची वाट बघत मी रात्र काढली. मी आयुष्यात पहिल्यांदाच मेडिकल मास्क घातला होता आणि त्यामागे कोरोना व्हायरस नावाची भीती दडलेली होती. दुसऱ्या दिवशी दुपारी मजल दरमजल करत मी एकदाचा चांगी विमानतळावर उतरलो.
एकतर भारतापासून लांब आणि थोड्याश्या वेगळ्या देशात एकट्यानेच मी येऊन पोचलो होतो. त्यात दारातच कोरोना व्हायरस संबंधी सूचना पाहिली आणि मला हिंदी चित्रपटांत नायकाला त्याचा भूतकाळ आठवावा तसे ओळखीच्या लोकांनी दिलेले धोक्याचे संदेश मनात घोंगावण्यास सुरुवात झाली. इथे पोचल्यावर माझी वैद्यकीय तपासणी होणार, मला अनेक सूचना पाळाव्या लागणार अशी माझी धारण होती, पण ती पुढच्या काही मिनिटांत फोल ठरली. सिंगापूर विमानतळावर वैद्यकीय चाचणी ऐच्छिक होती, वैद्यांचे समूह तपासणी साठी उपस्थित होते, पण तपासणी करणे अनिवार्य नव्हते.
मी आपले आणलेलं मास्क चढवून, इतरांशी अंतर राखत, आता कसे बसे दहा दिवस काढुया आणि होईल तितकं परत निघूया असा विचार करत विमानतळावरून बाहेर पडलो. माझ्या राहण्या्चया ठिकाणी जाण्यासाठी मी मेट्रो पकडली. हा मेट्रोचा प्रवास म्हणजे सिंगापूर मधला सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या संपर्कात येण्याचा पहिलाच प्रसंग होता. तिथे गर्दी अपेक्षित होती, आणि नेमके त्या दोन्ही मेट्रो मध्ये अगदी तुरळक लोक होते. त्यामुळे इथे गर्दी असते किंवा नसते ह्याचा कसलाही अंदाज नसलेला मी “बहुतेक कोरोनामुळे गर्दी नसणार” असं पहिलं संशयाचं भूत मनात तयार करून घेतलं.
मनात एक संशय बळावला की त्याचे धागेदोरे जोडणारे अनेक संशय निर्माण होत जातात. आता ह्या मेट्रो मध्ये जी काय तुरळक गर्दी दिसत होती, त्यात सिंगापूर ची स्थानिक माणसे मास्क सोडा साधा रुमाल देखील न चेहऱ्यावर न बांधता फिरत होती. पण सिंगापूर मध्ये मास्क चा तुटवडा आहे इत्यादी बातम्या मला आठवल्या आणि बाजारात मास्क नाहीयेत म्हणून ही मंडळी अशीच उघड्या तोंडाने फिरत असणार हे दुसरं भूत मी मनात बसवलं. आणि कोरोनाची भीती आणखी घट्ट झाली.
ही वरची दोन अवजड संशयाची भुतं घेऊन अर्ध्यातासाने मी माझ्या हॉटेलजवळच्या मेट्रो स्थानकातून बाहेर पडलो. त्या स्थानकावर मी एक आणि अजून एक दुसरा स्थानिक भारतीय वगळता कुणीही बाहेर पडलं नव्हतं. स्थानकाच्या बाहेर एक मोठा चार पाच पदरी रस्ता, ज्यावरून क्वचितच एखादी महागडी चारचाकी धावत होती. अत्यंत शांत असणारे एक वाहतूक सिग्नल, वरून कडाडणारे ऊन आणि नजरेच्या कक्षेत दूरवर एक चिनी माणूस, हे असे एकूणच रुक्ष वातावरण तिसऱ्या संशयाच्या भुताला घेऊन आले. हा भला मोठा रस्ता आणि हा परिसर इतका शांत कसा? बहुतेक कोरोना च्या भीतीने कुणीही बाहेर पडत नसणार!
ही तीन संशयाची भुतं चढवून मी त्या एकांत हॉटेलच्या पलंगावर पाठ टेकवली आणि “जेट लॅग” हा काय प्रकार असतो त्याच्या अनुभव घेतला. संध्याकाळी उठून मी बाहेर पडलो, पाऊस पडून गेला होता. हॉटेल मॅनेजर च्या सांगण्या नुसार मी चालत “लिटिल इंडिया” नावाच्या प्रदेशात येऊन पोचलो. सोबत संशयाची तीन भुतं होतीच. मी त्यांना सोडलं नव्हतंच. कोरोनाच्या भीतीने सिंगापूर अवघे विस्कळीत झाले आहे ही माझी ठाम धारणा होती. पण जसा मी त्या लिटिल इंडियाच्या बाजारात पाय ठेवला, माझ्या मानगुटीवरचे एक एक भूत काढता पाय घेऊ लागले. त्या भारतीय दुकानांच्या बाजारात बऱ्यापैकी गर्दी होती. भारतीय बाजारासारखी वर्दळ होती. फारसे कुणी मास्क घातलेले दिसत नव्हतेच, पण कुणाच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. आणि बाजार असा दिमाखात सजला होता, जसा बातम्यांत सांगितलेला कोरोना इथे आलेलाच नसावा. मी आताही मास्क घालून, लोकांशी अंतर राखत फिरत होतो, पण इथले वातावरण पाहून माझ्या मनावरचा तणाव थोडा निवळला.
मी कामानिमित्त दुसऱ्या दिवशी सकाळीच बाहेर पडलो, तो मोठा मास्क तोंडावर लावला की माझ्या चष्म्यावर धुकं जमायला चालू होतं आणि अर्ध्या चष्म्यातून काहीच दिसत नाही. संशयाची भुतं थोडी सैल झाली तरी त्यांनी माझा अजून पिच्छा सोडलेला नव्हता. त्यात मी परत एकदा त्या “एमआरटी” चा मार्ग धरला. आज मेट्रो मध्ये भरपूर गर्दी होती, सोमवारीची सकाळ. काल दुपारच्या तुलनेत आजच्या मेट्रो प्रवासाचं चित्र पार वेगळं होतं. कोरोना वैगैरे सर्व इतिहास जमा असल्यासारखे ते वातावरण वाटले.मी एका कोपऱ्यात माझे स्थानक येण्याची वाट बघत उभा होतो, डोक्यात हाच एकमेव विचार चालू होता, इथे इतके कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत, संख्या रोज वाढत आहे, आणि ह्यांना गर्दीची भीती किंवा चिंता वाटत नसावी का?
मी कामाच्या ठिकाणी पोचलो, तिथे दारातच सुरक्षा रक्षक हातात एक डिजिटल थर्मा मीटर येणाऱ्या प्रत्येकाच्या कपाळा समोर लावून शरीराचे तापमान मोजत होता. आता ही तपासणी रोज करावी लागणार होती. ह्या सगळ्या कामाच्या ठिकाणी मास्कधारी लोक अगदी तुरळक होते. ती तीन संशयाची भुतं मी खरी इथे काढून फेकणार होतो. इथे मला मूळ सिंगापुरी सहकाऱ्यांशी संवाद साधायला मिळायला. आणि त्यातून मला खऱ्या परिस्थितीचे अवलोकन झाले.आणि एक एक करून कोरोनाच्या भीतीने तयार झालेली संशयाची भुतं माझं मानगूट सोडून पळून गेली. मी इथे सुरक्षित आहे ह्याची हमी तिथल्याच नागरिकांनी दिली, जे काही दिवस आधी स्वतः भयभीत होते आणि त्यांनी “पॅनिक सिच्युएशन” चा अनुभव घेतला होता.
जेव्हा सिंगापूर मध्ये कोरोना व्हायरस चे रुग्ण असल्याच्या बातम्या आल्या, तिथेही गोंधळ उडाला. सोशल मीडियावर खोट्या बातम्या आणि अफवा होत्याच. त्यामुळे ३ ते ४ दिवस लोकांनी “पॅनिक शॉपिंग” केली. अर्थात गरजेच्या वस्तूंचा भरपूर साठा निर्माण केला, जेणे करून तो अनेक दिवस पुरेल. त्यामुळे अनेक सुपर मार्केट रिकामे झाले, अनेकांना आवश्यक वस्तू मिळाल्या नाहीत, मात्र काही दिवसांत हे लगेच पूर्वपदावर आलं.नागरिकांना भय होतं की शहर बंद होईल, तसं काहीही झालं नाही अन लोक पुन्हा घराबाहेर पडले. सोबतच तिथल्या सरकारने जनजागृती केली. सैन्याच्या मदतीने नवीन मास्क घरोघरी वितरित केले. बहुतांश सर्वच कार्यालयांत शरीराचे तापमान तपासण्याची सोय केली. सार्वजनिक ठिकाणी जिथे गर्दी असते, उदा. मेट्रो अशा ठिकाणांची वारंवार स्वच्छता करण्यास सुरुवात झाली.
जिथून कोरोनाचे रुग्ण आढळले तिथे तिथे निर्जंतुकीकरण करण्यात आलं. आणि मुख्य म्हणजे कोरोना क्लस्टर्स बनवण्यात आले. हे म्हणजे अशी काही ठिकाणे जिथून कोरोनाचे जिवाणू पसरले होते.त्या ठिकाणी विशेष निर्जंतुकीकरण करण्यात आले. अर्थात ह्यातून अनेक कार्यालयांना सुट्टी किंवा घरून काम करण्याची मुभा दिली गेली. मात्र कॉर्पोरेट भागांतील गर्दी बघता बहुतेक सर्वच जण कार्यालयांत येत होते ह्यात शंका नाही. तिथली गर्दी कमी झालीच नव्हती. लोकांच्या मनातून कोरोनाचे भय काढून टाकले गेले आणि प्रत्येकाने स्वतःची काळजी कशी घ्यावी ह्याचे प्रबोधन करण्यात आले होते. ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत, त्यांनी नेमके काय करावे ह्याच्या सूचना सर्वत्र प्रसारित होत होत्या. नागरिकांनीही जबाबदारी उचलली होती.
हे सर्व पाहता माझ्या मनातले कोरोनाची भीती घेऊन आलेले भूत दोनच दिवसांत दूर पळाले. मी देखील शांत मनाने, स्वतःची काळजी घेत सिंगापूर मध्ये काम केले. आधी मी बाहेर कुठे फिरायला नको असे ठरवले होते, मात्र योग्य वेळी मास्क घालून, अधून मधून हात स्वच्छ धुवत, सॅनिटायझर्स वापरून मनसोक्त सिंगापूरचा आनंद घेतला. शेवटी त्या तीन संशयांच्या भूतांचे काय झाले? एकतर रविवारच्या दुपारी, भर उन्हात विमानतळावर जाणाऱ्या मेट्रोमध्ये गर्दी करून कोण जाईल? दुसरं, लोक मास्क वरात नव्हते, कारण मास्क ना वापरता स्वतः सुरक्षित कसे राहायचे हे त्यांना ठाऊक होते. आणि जशी ती रविवारची दुपार संध्याकाळ मध्ये बदलली, त्याच एकांत रुक्ष सिग्नलवर बऱ्यापैकी वाहनांची वर्दळ वाढली होती. ह्यावरून मीच निर्माण केलेली ती संशयाची भुतं मी काढून फेकळीणी निश्चित झालो.
कोरोना ही एक साथ आहे, ह्यात आपण स्वतःची काळजी तर घ्यायलाच हवी. मात्र त्यासाठी सर्व सामाजिक जीवनाचा त्याग करावा असेही नाही. प्रत्येकाने स्वतःची काळजी घेत आपले नित्य जीवन तसेच चालू ठेवले तरी कोरोना पासून फारसे अवघड नाही. स्वच्छ हात धुवा,सॅनिटायझर्स वापरा, गरज भासेल तेव्हा मास्क वापरा,आणि हो ज्यांना सर्दी खोकला अशी लक्षणे वाटतील, त्यांनी, स्वतःला घरातच स्थानबद्ध करून हेल्पलाईनला फोन करा. कोरोना विरुद्ध भारताचा लढा फार काही अवघड नाही!