काल दिवसभर ( दिनांक १९ जुलै २०२४) सगळीकडे बंद पडलेल्या संगणकांची चर्चा होती. संगणक बंद पडल्यामुळे विमानतळाचे कामकाज अडकले, कंपन्यांची कामे थांबली अशा अनेक बातम्या होत्या.आम्ही आयटीवाले त्यावर विनोद करून आनंद घेत होतो. हा प्रकार पाहून नॉन आयटीवाले अनेक जण गोंधळून गेले. ज्यांना कालचा हा प्रकार उमगला नाही त्यांच्यासाठी ही कहाणी.
या कहाणीचा नायक (किंवा खलनायक) आहे, क्राऊड स्ट्राईक!
क्राऊड स्ट्राईक ही एक सायबर सुरक्षा क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी आहे. ती इतर कंपन्यांना सायबर सुरक्षेसाठी लागणारे सॉफ्टवेअर पुरवते. जगभरातील बहुसंख्य कंपन्या यांचे सॉफ्टवेअर वापरतात. त्यात फाल्कन नावाचे एक ‘ईडीआर’ सॉफ्टवेअर आहे जे एका अँटीव्हायरस सारखे काम करते. कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेले लॅपटॉप, संगणक, कंपनीचे सर्व्हर आणि इतर सर्वच संगणकांवर हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतात. यामुळे त्या सगळ्या संगणकांत व्हायरस, हॅकिंग वगैरे प्रकार होत नाही.
क्राऊड स्ट्राईकचे हे सॉफ्टवेअर खूप प्रसिद्ध आहे. आयटी – नॉन आयटी अशा सर्वच प्रकारच्या कंपन्या हे सॉफ्टवेअर वापरतात. या सॉफ्टवेअर मध्ये काल एक तांत्रिक चूक झाली. त्यांनी त्यांच्या सॉफ्टवेअर साठी एक अपडेट उपलब्ध केला. आपल्या फोन मधले ऍप प्लेस्टोअर मधून अपडेट होतात तसाच हा एक अपडेट होता. पण या अपडेट मध्ये एक चूक होती, त्यामुळे ज्या ज्या संगणकांवर हा अपडेट गेला ते संगणक अचानक बंद पडले. हे सगळे संगणक विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणारे होते. जगभरात हे तांत्रिक दोष असणारे अपडेट एकाच वेळी उपलब्ध झाल्यामुळे मोठ्या संख्येने संगणक एकाचवेळी बंद झाले.
संगणक बंद झाले म्हणून हे सॉफ्टवेअर वापरणाऱ्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना काम करता आले नाही. अनेक कंपन्यांचे विंडोज ऑपरेटिंग सिस्टम वाले सर्व्हर ज्यात हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल होते ते देखील बंद झाले. परदेशातल्या अनेक रेल्वे कंपनी, हॉस्पिटल इत्यादी ठिकाणचे सर्व्हर बंद झाल्यामुळे त्यांची वाताहत झाली. भारतातील इंडिगो, एअर इंडिया सारख्या विमानवाहतूक कंपन्या, विमानतळे, जेएनपीटी सारखी आस्थापने, शेअर बाजार ब्रोकर्सचे सर्व्हर बंद पडले. जिथे जिथे हे सॉफ्टवेअर अपडेट झाले तिथे गोंधळ तयार झाला. या संगणकांवर आधारित सगळीच यंत्रणा काम करायची थांबली.
अख्ख्या जगात सर्वत्र हा प्रकार घडल्यामुळे त्याची भरपूर चर्चा झाली. काहींनी तर ही आजवरची सर्वात मोठी ‘सिस्टम डाउन’ घटना असल्याचे संकेत दिले.
ज्या संगणकांवर हा प्रकार झाला, ते चालू केले असता, त्यावर एक निळी स्क्रीन दिसत होती. ही निळी स्क्रीन म्हणजे मायक्रोसॉफ्ट विंडोज मध्ये काहीतरी गडबड आहे असे दर्शवते. त्यामुळे बहुतेकांचा गैरसमज झाला की मायक्रोसॉफ्टच्या चुकीमुळे हा प्रकार होत आहे. काही तासांच्या तपासानंतर यामागचे खरे कारण लक्षात आले. क्राऊड स्ट्राईक कंपनीने त्यावर एक तोडगा काढला आणि बंद झालेलं संगणक पुन्हा सुरु कसे करायचे हे सुचवले. हळू हळू करत सर्वच सर्व्हर पूर्ववत केले जात आहेत आणि संगणक देखील लवकरच नीट केले जातील.
या कहाणीत संगणक बंद होऊन दिसणारी निळी स्क्रीन मायक्रोसॉफ्टची दिसते. त्यामुळे त्याचीच चर्चा होऊन मायक्रोसॉफ्ट विंडोज नाहक भरडला गेला. विंडोजची काही चूक नसताना सगळं खापर त्यांच्यावर फोडलं जात आहे. या गोष्टीत खरा दोषी तर ‘क्राऊड स्ट्राईक’ आहे.
या सगळ्या गोंधळात कर्मचाऱ्यांची कामे खोळंबली. कित्येक व्यवहार ठप्प झाले त्यामुळे नुकसान देखील झालेच. हा सगळा प्रकार पूर्ववत होईल, पण यातून शिकण्यासारखे बरेच काही आहे. आजच्या काळातली प्रत्येक गोष्ट तंत्रज्ञानावर अवलंबून आहे, आणि तंत्रज्ञानात झालेली एक चूक किती महागात पडू शकते हे आपण यावरून समजू शकतो.