आशुतोष ब्लॉग

अँटीव्हायरस बद्दल सर्वकाही

अँटीव्हायरस बद्दल सर्वकाही

संगणक वापरणारा आणि व्हायरसचे नाव न ऐकलेला मनुष्य शोधून सापडणार नाही. व्हायरस येऊ द्यायचे नसतील तर अँटीव्हायरस वापरायचा हे माहित नसणारा माणूस केवळ परग्रहावर सापडावा. व्हायरस हा काही आजकाल आलेला प्रकार नाही,संगणक लोकप्रिय होत गेले तसे व्हायरस पसरत गेले. ह्या व्हायरसच्या मागोमाग नवीन संज्ञा उदयास आली, ती अँटीव्हायरस. ह्या अँटीव्हायरस बद्दल थोडी खोलातली माहिती लिहिण्याचा प्रयत्न मी करत आहे.

अँटीव्हायरस म्हणजे काय?

संगणकात व्हायरस येण्यापासून रोखणे आणि संगणकात व्हायरस असतील तर ते शोधून त्यांना हटवणे हे काम करणारे सॉफ्टवेअर म्हणजे अँटीव्हायरस अशी तोंडओळख सर्वांनाच असते. व्हायरसच्या विरुद्ध काम करतो म्हणून तो अँटीव्हायरस. आपल्या संगणकात चालू असणाऱ्या वेगवेगळ्या प्रक्रिया (प्रोसेस) ह्यांवर लक्ष ठेऊन, त्यांत एखादा व्हायरस आहे का तपासणे हे अँटीव्हायरसचे मुख्य काम. सोबतच संगणकात असणाऱ्या फाईल स्कॅन करून त्यांपैकी कुठली व्हायरस निर्मित आहे का हे तपासणे, तसेच आपण भेट देत असलेल्या विविध वेबसाईट(संकेतस्थळे) मालवेअर तर पसरवत नाहीत ह्यावर लक्ष ठेवणे अशी इतर कामे देखील अँटीव्हायरस करतात.
व्हायरस रोखणे हे मुख्य काम असले तरी सुरक्षेच्या दृष्टीने इतर बरीच कामे अँटीव्हायरस करतात. प्रत्येक अँटीव्हायरस कुठली कामे करतो ह्यावरून त्यांचे प्रकार देखील पडतात. आपण केवळ घरगुती वापराच्या अँटीव्हायरस बद्दल जाणून घेऊया.

अँटीव्हायरस कसे काम करतात?

आपल्याला एखाद्या खाजगी कार्यालयाला भेट द्यायची असेल तर आपण तिथल्या सुरक्षा तपासणी मधून जावे. त्या कार्यालयात कुणाला प्रवेश द्यायचा, कुठून आणि कसा प्रवेश द्यायचा आणि कार्यालयात वावरताना कोणत्या गोष्टी करायच्या ह्याचे नियम ठरलेले असतात. आपण ते नियम पाळूनच कार्यालयात वावरू शकतो. आपण ह्यातील एखाद्या गोष्टीची पूर्तता करण्यात कमी पडलो, किंवा नियम धुडकावले तर त्या कार्यालयाचे सुरक्षा रक्षक आपल्याला बाहेरचा रस्ता दाखवतील.

अँटीव्हायरस देखील थोडेफार अशाच सुरक्षा रक्षकांप्रमाणे काम करतात. एखाद्या संगणकात कुठल्या फाईल्स असाव्यात, कुठल्या प्रक्रिया (प्रोसेस) आणि कशा प्रकारच्या प्रक्रिया चालवाव्यात ह्या सगळ्यांचे नियम अँटीव्हायरस ठरवतो, आणि एखाद्या प्रोसेसने अथवा फाईलने हे नियम मोडले, की त्यांना व्हायरस अशी खूण करून त्या फाईल्स अथवा प्रोसेस हटवतो.

कोणत्या गोष्टींना व्हायरस म्हणायचे ह्याची एक यादी आपल्या अँटीव्हायरस कडे असते. त्याला म्हणतात “व्हायरस डेफिनेशन्स”. ही यादी सातत्याने अपडेट करत राहावी लागते. संगणकात होणारी प्रत्येक प्रक्रिया आणि येणाऱ्या सर्व फाईल्सना अँटीव्हायरस ह्या यादी सोबत पडताळून पाहतो. एखादी फाईल अथवा प्रक्रिया ह्या यादी मध्ये असली की त्वरित त्यावर प्रतिबंध घालतो. ही “व्हायरस डेफिनिशन्स”ची यादी अँटीव्हायरसच्या प्रक्रियेत अत्यंत महत्वाची असते आणि अँटीव्हायरस ह्याच व्हायरस डेफिनिशन्सच्या आधारे काम करतो. म्हणून ही यादी सातत्याने अद्ययावत (अपडेट) करत राहावी लागते. ही यादी अद्यययावत असली की त्यात नवीन नवीन सापडलेल्या व्हायरसच्या डेफिनिशन्स ची भर पडत राहते आणि आपला अँटीव्हायरस अधिक जास्त व्हायरस शोधून काढू शकतो.

आपला अँटीव्हायरस सातत्याने अद्ययावत करण्याच्या सूचना करत राहतो, त्यातून त्याची कार्यक्षमता वाढणार असते.

अँटीव्हायरस सर्वच व्हायरस शोधू शकत नाहीत

अँटीव्हायरस सर्वच व्हायरस शोधू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. वर मी उल्लेख केला त्याप्रमाणे अँटीव्हायरस फक्त त्याच व्हायरस ना ओळखू शकतो ज्यांच्या डेफिनिशन्स त्याच्याकडे उपलब्ध आहेत. परंतु अँटीव्हायरस कंपन्या आपली व्हायरस डेफिनिशन्सची यादी सतत अद्ययावत करत राहतात त्यामुळे असा प्रसंग फार क्वचित येतो. आपणही आपला अँटीव्हायरस सतत अद्ययावत करत राहावा लागतोच, अन्यथा त्याचा पुरेपूर उपयोग करून घेता येत नाही.

एखाद्या व्हायरसची ओळख अँटीव्हायरस डेफिनिशन्स मध्ये नसण्याचे मुख्य कारण असते तो व्हायरस आंतरजालावर अत्यंत नवीन आहे आणि अजून सुरक्षा कंपन्यांच्या नजरेत आलेला नाही. त्यामुळे त्या व्हायरस ना रोखण्याचा उपाय आणि त्याची ओळख ह्या व्हायरस डेफिनिशन्स मध्ये समाविष्ट झालेली नसते. थोड्या काळाने ह्या नवीन व्हायरसची ओळख काही काळाने यादीत सामाविष्ट होते आणि अँटी व्हायरस त्यांना ओळखू लागतो.

अँटीव्हायरस विरुद्ध व्हायरस म्हणजे टॉम आणि जेरी चा खेळ

व्हायरस शोधून काढणे हे एक जिकिरीचे काम असते. आपल्या घरात आपली नेहमीची हरवलेली वस्तू शोधून काढायची झाली तर आपण मनात त्याचे चित्र समोर आणतो आणि तशीच दिसणारी आकृती असणाऱ्या वस्तू शोधू लागतो. परंतु हेच इतरांची कुठली वस्तू, जी आपण कधीहि पाहिलेली नाही, अशी वस्तू शोधायची वेळ आली तर? त्यावेळेस आपल्याला इतरांनी सांगितलेल्या वर्णनाचा आधार घेऊन ती वस्तू शोधावी लागते, आपण कधीही न पाहिलेली वस्तू केवळ वर्णन ऐकून शोधून काढणे जरा अवघड जाते. ह्याहून अधिक अवघड शोधकार्य म्हणजे ते जिथे तुम्हाला वस्तूचे वर्णन अथवा त्याचे रंगरूप ह्याची कसलीही माहिती नाही. हेच अवघड काम अँटीव्हायरसला करावे लागते.

ज्या व्हायरसची आधीच ओळख आहे त्यांना शोधणे सोपे जाईल, पण एखादी फाईल व्हायरस असून देखील त्याची ओळख जर व्हायरस डेफिनिशन्स मध्ये नसेल तर अँटीव्हायरसचे काम अवघड होते. आणि ह्याच गोष्टीचा गैरफायदा व्हायरस तयार करणारे हॅकर्स घेतात. ज्या गोष्टी अजून अँटीव्हायरसच्या नजरेत आलेल्या नाहीत त्या गोष्टींना वापरून हॅकर्स नवीन नवीन व्हायरस बनवून ते पसरवतात. थोड्या काळाने अँटीव्हायरसना ह्या नवीन व्हायरसची ओळख पटते, ते व्हायरस देखील ओळखले गेले की मग हॅकर्स इतर कुठल्या व्हायरसची निर्मिती करतात आणि अँटीव्हायरस कंपन्या त्यांना ओळखण्याच्या स्पर्धेत उतरतात. अशाप्रकारे व्हायरस बनवणे आणि त्यांना ओळखणे हा हॅकर्स आणि अँटीव्हायरस कंपन्या ह्यांच्या मधला न संपणारा पाठशिवणीचा खेळ आहे. सध्या जगभर धुमाकूळ घालत असलेला एक नवीन व्हायरस म्हणजे रॅन्समवेअर, ज्या बद्दल मी पूर्वी लिहिलेले आहे.

ज्याप्रमाणे टॉम आणि जेरी च्या खेळात, जेरी उंदराला पकडण्यासाठी टॉम मांजर नवनवीन क्लुप्त्या लढवतो आणि दरवेळेस जेरी उंदीर त्यावर इतर कुठल्या मार्गाने टॉम मांजराची छेड काढतो तसा हा न संपणारा खेळ आहे आणि हा असाच चालू राहणार आहे.

आपल्या संगणकाच्या सुरक्षेसाठी अँटीव्हायरस आवश्यक वाटतो. मात्र तो चांगल्या कंपनीचा आणि सतत अद्ययावत असणार हवा. आणि इतके होऊन देखील हॅकर्स व्हायरस च्या रूपाने आपल्या संगणकाचा माग काढतीलच. त्यामुळे केवळ अँटीव्हायरस च्या भरवश्यावर ना राहता, आपण संगणक वापराच्या काही चांगल्या सवयी पाळल्या तर हे आपल्या संगणकाची सुरक्षा अधिक भक्कम करण्यास मदत होईल.

ह्या विषया संदर्भात माझे इंग्रजी ब्लॉग


Exit mobile version