शिकण्याची बदललेली पद्धत

आज एका सोबतच्या इंजिनियर मुलाशी बोललो. नुकताच नौकरीला लागला आहे आणि चांगलं कामही करतो. हा मुलगा माझ्यापेक्षा १० – १२ वर्षे लहान आहे, म्हणजे एक पिढी मागे. याच्याशी बोलण्यातून मला नवीन शिकायला मिळाले.

वर्तमानकाळात एखाद्याला नवीन तंत्रज्ञान, प्रोग्रामिंग, किंवा एखादे नवीन डोमेन आत्मसात करायचे असेल, तर त्यांना आता पूर्वीसारखे अख्खे पुस्तक वाचून सर्वकाही शिकत बसण्याची गरज नाही. तुम्हाला त्या तंत्रज्ञानाचे मूलभूत ज्ञान (Basic), मूलभूत संकल्पना माहित हव्यात. दुसरे जे शिकत आहात त्याचे विन्यास (सिंटॅक्स Syntax) वगैरे वापरता यायला हवे. आणि तिसरे, या संकल्पना वापरून त्याचा उपयोग कसा करायचा हे समजायला हवे. इतके जमले तरी तुम्ही त्या तंत्रज्ञानावर काम करू शकता. पुस्तकातून मिळणारे बारीक ज्ञान तुम्हाला आज गुगलवर, चॅट जीपीटी (Google, ChatGPT) सारख्या मंचाच्या मदतीने सहज उपलब्ध होते. ते उपलब्ध होणारे ज्ञान वापरायचे कसे हे एकदा समजले तरी तुम्ही चांगले काम करू शकता. हेच काम करता करता तुम्ही आणखी पुढे शिकत जाता आणि आपोआप त्या तंत्रज्ञानावर तुमची पकड बसते.
इंटरनेट वापरून असं शिकता येतं हे किमान संगणक शास्त्राला तरी लागू होतं आहे. एकीकडे चॅटजीपीटी, डीपसिक (DeepSeek) सारखी कृत्रिम बुद्धिमत्तेची साधने तर आहेतच, पण त्या पूर्वीच आंतरजालावर इतक्या मोठ्या प्रमाणात साहित्य निर्माण केलं आहे की एखादी गोष्ट शिकायची म्हटली तरी हजारो ब्लॉग, व्हिडियो सर्वकाही उपलब्ध आहे.

येत्या पिढीला ही शिकण्याची साधने उपलब्ध झाल्याने कमी वेळात जास्त वेगाने शिकता येते, फक्त त्यांचा योग्य वापर करून घेता आला पाहिजे. मी वर उल्लखलेल्या मुलाने देखील असेच काही दिवसात पायथॉन आज्ञावलीचा (Python Programming) आधार घेतला. त्याला थिअरी माहित होती, त्याने केवळ चॅट जीपीटी वापरून आमच्या कडे असलेली एक तांत्रिक अडचण सोडवली. आमच्या कंपनीत कुणीही अनुदेशक (Programmer) नाही, की विकासक (Developer) नाही, म्हणून आम्ही अडून बसलो होतो. पण या मुलामुळे ही गोष्ट शिकायला मिळाली. एका रात्रीत काही आपण अनुदेशक होऊ शकत नाही, पण आपली अडचण सोडवता येण्या पुरते मार्ग तर आपण नक्कीच काढण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यासाठी तंत्रज्ञान आपल्या साथीला आहे.

गेल्या पाच वर्षांत तंत्रज्ञान वेगाने बदलले आहे, आणि त्याने माणसाचा भार हलका करून, वेळ वाचवण्यात बरीच मदत केली आहे. त्यामुळे शिक्षणाचे मार्ग देखील थोडे बदलले आहेत. आता काय दरवेळी जाडजूड पुस्तके वाचत बसण्याची गरज नाही, तासंतास घालवून सगळे ट्युटोरिअल संपवण्याची गरज नाही, त्याहून सोपे मार्ग उपलब्ध आहेत. पण हे करत असताना आपण मात्र केवळ चॅटजीपीटीच्या आधाराने अवलंबून राहायला नको. त्याचा वापर करून घ्यायचा आहे, त्याचे स्वामित्व स्वीकारायचे नाही हे आपण लक्षात ठेवावे.

नवीन मार्गांना आत्मसात करून आपण आपला फायदा करून घेतला तर आपली प्रगती अधिक वेगाने होईलच. सध्या शिक्षण घेत असलेल्या मुलांनी तर नक्कीच असे मार्ग आत्मसात करायला हवेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *