क्रांतिकारी मंगल पांडे
आज ८ एप्रिल, भारताच्या इतिहासात क्रांतीची बीजे रोवणाऱ्या क्रांतिकारी मंगल पांडे यांचा बलिदान दिवस. ज्यांच्या साम्राज्यावर कधीही सूर्य मावळत नाही अशी म्हण असलेल्या इंग्रजांच्या पतनाचा सूर्य बनून आलेल्या मंगल पांडे यांनी इंग्रजांविरुद्ध क्रांतीची मशाल पेटवून दिली. २९ मार्च १८५७ रोजी मंगल पांडेच्या बंदुकीतून निघालेल्या त्या गोळीने संपूर्ण उत्तर भारताला इंग्रजांच्या विरोधात उभे केले, ती गोळी चालली नसती आणि भारतीय स्वातंत्र्याचा पहिला संग्राम म्हणवला गेलेला हा उठाव झाला नसता तर कदाचित १९४७ साली झालेली सोनेरी पहाट उजाडायला आणखी अवधी वाट पहावी लागली असती.
उत्तर प्रदेश चा बलिया जिल्हा अर्थात ज्या भूमीत भगवान विष्णुंना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणारे महर्षी भृगु यांचा जन्म झाला त्याच बलिया च्या नगवा गावात जन्मलेल्या ह्या क्रांती सूर्याने दिल्ली पासून लंडन पर्यंत इंग्रजांच्या पायाखालची वाळू सरकवली. स्वातंत्र्य लढ्याच्या यज्ञात त्यांनी दिलेल्या प्राणाहुतीने या ऐतिहासिक यज्ञाच्या ज्वाळा सर्वदूर पसरल्या आणि गोऱ्या सरकारला गिळून टाकायला सिद्ध झाल्या.
अशा ह्या क्रांतीसुर्याला इंग्रज सरकारने ८ एप्रिल १८५७ रोजी फाशी चढवले आणि आपल्या साम्राज्याच्या अस्ताची सुरुवात केली. अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या, पेटून उठणाऱ्या ह्या वीराला शतशः नमन. केवळ ह्या वीराचे स्मरण करून न थांबता, ज्या ज्या वेळी अन्याय होईल,त्या त्या वेळी बंड करून पेटून उठण्याची शिकवण घेणे गरजेचे आहे. कारण अन्याय सहन करणे हे एक महापाप आहे, त्या विरुद्ध पेटून उठलेच पाहिजे.
केवळ एका गोळीच्या जोरावर इंग्रजांच्या पायाखालीची वाळू सरकावणाऱ्या त्या असामान्य सैनिकाला पुनश्च नमन.