६ फेब्रुवारी १९३२ – कलकत्ता विद्यापीठाचा पदवीदान समारोह, पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदाने भरलेले उत्साही वातावरण अचानक झाडलेल्या पिस्तुलाच्या आवाजाने दणाणून गेले. समारोहाला आलेल्या एका तरुणीने पिस्तुल चालवलं तेही थेट बंगाल प्रांताचा गव्हर्नर स्टॅन्ले जॅक्सन याच्या वर! यात तो इंग्रज गव्हर्नर तर सुखरूप राहिला परंतु ती युवती भारतीय इतिहासात ‘अग्नीकन्या’ म्हणून अजरामर झाली, तिचं नाव बीना दास.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलांनीही तसेच शौर्य दाखवले होते अन त्यांपैकीच एक होती बीना दास. २४ ऑगस्ट १९११ रोजी बंगालच्या कृष्ण नगर मध्ये जन्मलेली ही भारतीय अग्निकन्या तरूणपणी ब्रिटीश विरोधी मोर्चे, आंदोलनांमध्ये सामील होत असे. पण ब्रिटीशांची पाळेमुळे उखडून फेकायची, त्यांच्या मनात धडकी भरायची तर केवळ मोर्चे काढून काम होणार नाही त्याकरिता सशस्त्र लढा दिलाच पाहिजे, याच विचारांनी बीना दास यांनी बंगाल मधील ‘छत्री संघ’ या सशस्त्र क्रांतिकारक संघटनेत सहभाग घेतला.
पूर्वी इंग्लंड क्रिकेट संघाचा कप्तान असलेला स्टॅन्ले जॅक्सन बंगाल प्रांताच्या गव्हर्नर पदी नियुक्त होता. याच स्टॅन्ले जॅक्सनचा वध करून सशस्त्र लढ्याची सुरुवात करण्याची योजना ‘छत्री संघ’ ने आखली.६ फेब्रुवारी १९३२ रोजी कलकत्ता विद्यापीठाचा पदवीदान समारोह स्टॅन्ले जॅक्सन च्या उपस्थितीत पार पडणार होता, अन याच समारंभात सर्वांसमक्ष त्याचा वध करण्याची ही योजना होती.
या समारंभात बीना दास यांनाही पदवी दिली जाणार असल्याने ही हत्या घडवण्याची जबाबदारी त्यांनीच उचलली. समारंभात आपल्या साडीत पिस्तुल लपवून न्यायचे आणि जॅक्सनची हत्या करायची अशी ती योजना होती. ठरल्याप्रमाणे समारंभाच्या दिवशी बीना दास यांनी पिस्तुल लपवून नेले. कार्यक्रमाचा मुख्य अतिथी असलेला गव्हर्नर स्टॅन्ले जॅक्सन भाषणाला उभा असतानाच बीना दास यांनी त्याच्यावर एका मागोमाग एक पाच फैरी झाडल्या परंतु पिस्तुल चालवण्याचे कधीच प्रशिक्षण न घेतलेल्या बीना दास यांचा नेम चुकला, गोळ्या जॅक्सन ला न लागता हवेत झाडल्या गेल्या आणि गव्हर्नर जॅक्सन सुखरूप राहिला. बीना दास यांना तत्काळ अटक केले गेले आणि पुढे त्यांना ९ वर्षे सश्रम कारावास भोगावा लागला.
गव्हर्नर स्टॅन्ले जॅक्सन च्या हत्येची ही योजना जरी अपयशी ठरली अन जॅक्सन सुखरूप जरी वाचला असला तरी ह्या घटनेनी ब्रिटीश शासनाच्या मनात दहशत बसवण्याचे काम मात्र चोख केले. ब्रिटीश शासन मन मानेल तसा कारभार करून भारतीयांवर अन्याय करतच राहील अन् भारतीय तो निमुटपणे सहन करतील ही अपेक्षाच त्यांनी करणं चूक ठरणार होतं. काट्यानेच काटा काढायची शिकवण भारतीय तरुणांच्या मनात घर करून होती अन् त्यासाठी पिस्तुलं हातात घ्यायलाही हे तरुण मागेपुढे पाहणार नव्हते.
बीना दास यांची १९३९ कारावासातून सुटका झाली. पुढे त्यांनी ‘चले जाव’ चळवळीतही मोठे योगदान दिले परंतु कालौघात इतर सशस्त्र क्रांतिकारकांच्या बाबतीत जे दुर्दैव घडले त्यातून बीना दास यांचीही सुटका झाली नाही. बहुसंख्य भारतीय नागरिकांना आजही अशा हजारो क्रांतिकारकांचे स्मरण नाही. स्वातंत्र्य पश्चात सामान्य आयुष्य घालवल्या नंतर २८ डिसेंबर १९८६ रोजी बीना दास यांचा हरिद्वार मध्ये मृत्यू झाला.
गव्हर्नर च्या वधाकरिता त्याच्यावर चालवलेल्या गोळ्यांमुळे,त्या शौर्यामुळे बीना दास यांना ‘अग्निकन्या’ हे नाम मिळाले. पिस्तुलाचा चुकलेला नेम नव्हे पण एका तरुणीने ब्रिटीश सरकारची उडवलेली झोप या अग्निकन्येला इतिहासात अजरामर करून गेली.