राघवेंद्र भीमसेन जोशी लिखित गाणाऱ्याचे पोर चरित्रात्मक पुस्तक नुकतेच वाचनात आले. भीमसेन जोशी हे नाव काही अपरिचित नाही मात्र हे पुस्तक वाचल्या नंतर आपल्या आवडत्या व्यक्तिमत्वाच्या अपरिचित आयुष्याची कहाणी समोर येते. आजवर भीमसेन जोशी-भीमण्णा म्हणजे भारदस्त आवाजातली अभंगवाणी इतकीच काय ती ओळख होती. त्यांच्या सुमधुर अभंगाच्या नादात विठ्ठल भक्तीत इतके तल्लीन झालो की कधी भीमसेन जोशींच्या खाजगी – वैयक्तिक आयुष्यात कधी डोकावून पहावेसे वाटले नाही.
भीमसेन जोशी म्हणजे माझे आवडते गायक, मुखपृष्ठावर त्यांचा रेखलेला फोटो पाहून हे मी हातात घेतलं आणि वाचायला सुरुवात केली. आपल्या आवडत्या गायकाचे आयुष्य कसे होते ह्याची मला उत्सुकता लागली होती. त्यात गायकाच्या मुलाने लिहिलेले पुस्तक म्हटल्यावर उत्सुकता शिगेला पोचली होती. हे संपूर्ण पुस्तक भीमसेन जोशींच्या एका अज्ञात,अपरिचित व्यक्तिमत्वाच्या जवळ घेऊन जाते. प्रसिद्ध व्यक्तींच्या खाजगी आयुष्यातल्या आपल्या माहित असलेल्या अनेक गोष्टी असतात, पण भीमण्णांच्या माहित नसलेल्या एका अंगाची ओळख या पुस्तकातून झाली.
भीमण्णांचे ज्येष्ठ पुत्र श्री.राघवेंद्र जोशी ह्यांनी आपल्या वडिलांसोबतच्या अनेक आठवणी ह्या पुस्तकातून मांडल्या. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात उडालेला गोंधळ ह्या आठवणी रूपाने समोर येतो. आपले आवडते गायक म्हणून भीमसेन जोशी आपल्याला माहित आहेत, पण एक पिता म्हणून, त्यातही भीमसेन जोशी यांचा दुसरा विवाह झाल्या नंतर पहिल्या पत्नी व त्यांच्या मुलाबाळांची झालेली फरपट यातून कळते. भीमण्णा स्वतः सामाजिक आयुष्यात प्रसिद्धीचे, समृद्धीचे उंच उंच आलेख गिरवत असताना त्यांच्या आयुष्यात पडद्यामागे झालेल्या अनेक आठवणी ह्या पुस्तकरूपाने समोर आल्या. भीमसेन जोशींचे पुत्र म्हणून पं.श्रीनिवास जोशी हे नाव चर्चेत आणि राघवेंद्र जोशी हे नाव कायम अंधारात राहिल्या सारखे वाटते. त्यांनी स्वतः वर्णन केल्या प्रमाणे भीमसेन जोशींच्या प्रथम पत्नी आणि त्यांची मुले ह्यांना जणू काही सामाजिक अस्तित्वच नव्हते असा देखावा उभा केला होता.
‘गाणाऱ्याचे पोर’ ह्या पुस्तक रूपातून मात्र पहाडी आवाज असणारे भीमण्णा मनातून किती मृदू स्वभावाचे असावेत याचा अंदाज बांधता येतो. पुस्तकाच्या बहुतांश भागात राघवेंद्र जोशींच्या आत्मचरित्राच्या अनुषंगाने भीमण्णांची एक वेगळीच ओळख होत जाते. पुस्तकाच्या शेवटाकडे जाताना मात्र भीमण्णा आयुष्यात किती हतबल असावेत, जणू काही इतरांच्या हातातले बाहुले! अशी प्रतिमा बघून मात्र आपल्या सारख्या सामान्य श्रोत्याला वाईट वाटू शकते. भीमसेन जोशी हे तुमचे आवडते गायक असतील आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक वेगळी ओळख करून घ्यायची असेल तर हे पुस्तक वाचणे अनिवार्य आहे.