Site icon आशुतोष ब्लॉग

मराठवाडा मुक्तिसंग्राम – लेख १ – नळदुर्गची घटना

naldurg-pool-tt-moore-marathi-lekh

naldurg-pool-tt-moore-marathi-lekh

मराठवाडा मुक्तिसंग्राम – लेख १ – नळदुर्गची घटना

१३ सप्टेंबर १९४८ – पहाटेच्या चार वाजता मराठवाड्याच्या मातीत एका निर्णायक लढ्याची सुरुवात झाली. निझामी अन्यायाच्या अंधारी रात्र झुगारून स्वातंत्र्यरुपी सुवर्ण प्रभात जीवित करणारा हा लढा, ऑपरेशन पोलो. दोन-अडीचशे वर्ष जुनं, बलाढ्य हैदराबादच्या निजामाचे साम्राज्य अवघ्या १०९ तासांच्या लढाईत नष्ट करणाऱ्या लढाईची ही नांदी.

१३ सप्टेंबरच्या पहाटे भारतीय सैन्य हैदराबादवर पाच दिशांनी चाल करून गेले. त्यातील पहिली आणि मुख्य तुकडी सोलापूर वरून कूच करून सिकंदराबादच्या दिशेने निघाली. तिचे पहिले लक्ष्य तुळजापूर, पहिल्या तासाभरातच रझाकारांच्या ताब्यातून हस्तगत झाले. इथून पुढे मात्र एक महत्वाचा टप्पा होता – नळदुर्ग.

खंदक खोदून पाण्याने वेढलेला आणि दुहेरी तटबंदी असलेला भुईकोट किल्ला नळदुर्ग. नळदुर्ग किल्ल्याच्या शेजारूनच हैदराबाद कडे जाणाऱ्या रस्त्यावर एक महत्वाचा पूल लागतो. भारतीय सैन्य हैद्राबादेत प्रवेश करण्याआधी त्यांच्या मार्गांवर लागणारे महत्वाचे पूल उध्वस्त करून सैन्याला वाटचाल करताना अडचणी येतील अशी योजना निजामी लष्कराने आखली. त्याची जबाबदारी दिली होती ब्रिटिशांचा भाडोत्री सैनिक लेफ्टनंट टी. टी. मूर (T.T.Moore) याकडे. बरोबर, निजामाचे सैन्य इतके कुचकामी होते की अशी महत्वाची कामगिरी देखील भाडोत्री ब्रिटिश सैनिकांकडे सोपवण्याची नड भासावी.

मूरचा घात एका गोष्टीने केला, इंटेलिजन्स. या ‘टी. टी. मूर’ला मिळालेल्या गुप्त माहिती (Intelligence) नुसार भारतीय सैन्य १५ सप्टेंबरच्या सकाळी हैद्राबादेत प्रवेश करणार होते. त्यानुसार त्याने तयारी ठेवली. पण भारतीय सैन्याने त्याचा ठोकताळा साफ चुकवला. त्या माहितीच्या विरुद्ध भारतीय सैन्य दोन दिवस आधीच सोलापूर कडून चाल करून आले.

याच घाईगडबडीत, भारतीय सैन्य नळदुर्गवर पोचण्या आधीच, तो पूल उध्वस्त करण्यासाठी निघालेला ‘टी. टी. मूर’ , स्फोटकांनी भरलेल्या त्याच्या जीपसह रस्त्यातच पकडला गेला.

रस्त्यातले पूल उडवून देण्याचा घाट उधळला गेला. नळदुर्गचा पूल सुरक्षित राहिला. या एका चुकीच्या माहितीमुळे मराठवाड्याच्या इतिहासाची दिशा ठरली. सकाळी ९ वाजता नळदुर्गला पोचलेले भारतीय सैन्य रस्ता मोकळा होताच पुढे उमरग्या पर्यंत जाऊन धडकले. पुढे तीनच दिवसांत या सैन्याने हैदराबाद शहर देखील आपल्या नियंत्रणात आणले.

मूरचा बेत यशस्वी झाला असता, तर भारतीय सैन्याला हैदराबादेत विनासायास प्रवेश करता आला नसता. ऑपरेशन पोलो लांबलं असतं, रझाकारी सैन्याचा आणि ब्रिटिश भाडोत्र्यांचा प्रतिकार अधिक बळावला असता. जी लढाई अवघ्या १०९ तासांत संपली, ती कदाचित आठवडे चालली असती. आणि त्या अतिरिक्त दिवसागणिक मराठवाड्याच्या मातीने आणखी नुकसान पाहिलं असतं.

इतिहास घडवणाऱ्या घटना काही नेहमीच रणांगणातल्या युद्धात घटित होत नाहीत, नळदुर्गच्या घटनेत अशी चुकीची माहिती होती. अनेक अज्ञात लघु-घटनांतून अशा मोठ्या परिणामांचे बीज रोवलेले असते. मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास अशाच अनेक ज्ञात, अज्ञात रक्त-शृंगीत घटनांनी व्याप्त आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्रामातील अशाच काही अज्ञात, विस्मृतीत गेलेल्या घटनांचं वर्णन मी दररोज संध्याकाळी एका लेखातून १३ ते १७ सप्टेंबरपर्यंत करणार आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामाची ही अज्ञात गाथा तुम्हाला रोज वाचायला मिळेल. माझ्या अनुदिनीवर (ब्लॉगवर), थ्रेड्सवर आणि व्हॉट्सअप चॅनेलवर.

मला फॉलो करून ठेवा, हैदराबाद आणि मराठवाड्याच्या इतिहासातील अनेक कोपरे उलगडण्याचा मी प्रयत्न करत आहे.

– आशुतोष

संदर्भ: हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम आणि मराठवाडा – अनंत भालेराव

British mercenaries’ futile bid to keep Hyderabad independent – (The Hindu – 16 Sep 2020)

Exit mobile version