Site icon आशुतोष ब्लॉग

मराठवाडा मुक्तिसंग्राम – लेख ५ – ऑपरेशन पोलोच्या नोंदवहीतली अल्पज्ञात पानं

operation-polo-muktisangram

मराठवाडा मुक्तिसंग्रामाची गोष्ट सांगताना आपण नेहमी १३ ते १७ सप्टेंबर या पाच दिवसांवर थांबतो. पण या पाच दिवसांच्या नोंदवहीत काही अशी पानं आहेत, ज्याची फारशी चर्चा होत नाही. अशा काही पानांची नोंद आज आपण घेऊया. 

ऑपरेशन पोलो : ऑपरेशन पोलोच्या आधी केलेले ऑपेरेशन कबड्डी

ऑपरेशन पोलो सुरू होण्याआधी सरहद्दीवर एक वेगळीच कारवाई चालू होती. निजामी हद्दीतून हैदराबादचे सैन्य आणि रझाकार भारतीय हद्दीत घुसून हल्ले आणि लुटमार करत होते. त्यांचा बंदोबस्त करावा आणि सीमांचे रक्षण करावे या हेतूने भारतीय लष्कराला असा आदेश देण्यात आला होता की जिथून हल्ले होतात तिथपर्यंत जावे, मुळावर आघात करावा आणि परत यावे.

या कारवाईला लष्कराने जे नाव दिले, ऑपरेशन कबड्डी. सैन्य लहान लहान तुकड्यांत विभागून, गरज पडल्यास सरहद्द ओलांडून पुन्हा परत यायचे, आणि म्हणूनच या संपूर्ण कारवाईला तुकडीने ‘कबड्डी’ असे सांकेतिक नाव दिले.

पुढे प्रत्यक्ष कारवाईचे नाव ठरले ऑपरेशन पोलो, आणि ती संपल्यानंतर तिचा उल्लेख ‘कॅटरपिलर’ या नावाने केला गेला.

ऑपरेशन पोलो : “मी तुम्हाला पोलीस पाठवू शकत नाही, पण वीस रझाकार पाठवतोय”

रझाकार ही केवळ एक खाजगी संघटना असून सरकारचा तिच्याशी काडीचाही संबंध नाही, असा आभास हैदराबाद प्रशासनाकडून निर्माण केला जात होता. परंतु, भारतीय सैन्याच्या हाती लागलेल्या एका डी.एस.पी.च्या पत्राने या लबाडीचा बुरखा पार फाडून टाकला. “I can send you no policemen but I am sending you 20 Razakars” हे पत्रातील वाक्य म्हणजे निजामी शासन, पोलीस यंत्रणा आणि हिंसक रझाकार यांच्यातील अभद्र युतीचे उघडेनागडे वास्तव वेशीवर टांगणारी जिवंत साक्ष होती.

निजामाची खरी ताकद किती होती?

ऑपरेशन पोलोचे प्रमुख जनरल चौधरींनी हैदराबादच्या लष्करी ताकदीची यादी दिली आहे. नियमित सैन्य बावीस हजार, अनियमित तुकड्या दहा हजार, सशस्त्र अरब दहा हजार, पैगा फौजा आणि सशस्त्र पोलीस मिळून दहा हजार, आणि रझाकार दोन लाख.

यात आणखी एक भर होती. ऑस्ट्रेलियन हस्तक सिडने कॉटन कडून निजामाने बरीच शस्त्रे आणि दारूगोळा मिळवला होता. त्या यादीत हजार रणगाडाविरोधी सुरुंग, दोन आणि तीन इंची मोर्टार, अडीच हजार बॉम्ब, ब्राउनिंगचा पाच हजार दारूगोळा, पाचशे स्फोटक गोळे, दोन विमानविरोधी तोफा आणि सहा रणगाडाविरोधी तोफा यांचा समावेश होता.

भारतीय बाजूनेही तयारी तशीच होती. लष्कराची विभागणी पाच गटांत करण्यात आली होती, ज्यांची नावे होती स्ट्राईक फोर्स, स्मॅश फोर्स, किल फोर्स, वीर फोर्स आणि रिअर फोर्स.

ऑपरेशन पोलो : एका संस्थानाला संपवायला दुसऱ्या संस्थानांच्या फौजा

आपला असा एक समज असतो की ऑपरेशन पोलोची संपूर्ण कारवाई केवळ भारतीय लष्करानेच पार पाडली. परंतु, या मोहिमेत विविध संस्थानांच्या सैन्यांनी देखील थेट भाग घेतला होता.

रणांगणावर प्रत्यक्ष उतरलेल्या फौजांमध्ये ग्वाल्हेर लान्सर्स, म्हैसूर लान्सर्स, मेवाड इन्फंट्री, ग्वाल्हेर इन्फंट्री, म्हैसूर इन्फंट्री आणि कोल्हापूरची राजाराम रायफल्स यांचा सहभाग होता. याशिवाय, बडोदा इन्फंट्री, त्रावणकोर इन्फंट्री आणि जोधपूर इन्फंट्री या तुकड्यांनी अप्रत्यक्षरीत्या मोलाचे सहकार्य केले होते.

थोडक्यात सांगायचे तर, एका संस्थानातील जुलमी राजवटीचा अंत करण्यासाठी इतर अनेक संस्थानांची सैन्ये एकत्र येऊन लढली होती.

ऑपरेशन पोलो : भूमिगत चळवळीचे स्वतःचे युद्धयंत्र

स्टेट काँग्रेसच्या कृती-समितीला लष्करी कारवाईची पूर्वकल्पना होती. संपूर्ण संस्थानाचे ‘ॲक्शन इनचार्ज’ डॉ. मेलकोटे यांनी ३१ जुलै १९४८ रोजी confidential circular no. 13 द्वारे निवडक कार्यकर्त्यांची शिस्तबद्ध युनिट्स उभारण्याचे निर्देश दिले.

यानुसार औरंगाबाद (मध्यप्रांत) ५०, नांदेड व परभणी प्रत्येकी १२५, मुंबई सरहद्दीवरील औरंगाबाद व बीड प्रत्येकी ७०, अंबेजोगाई ४० आणि उस्मानाबादसाठी १५० कार्यकर्ते निश्चित केले गेले. वाढत्या अत्याचारांपासून संरक्षणासाठी प्रत्येक जिल्हा केंद्राला त्वरित १,००० हातबॉम्ब पाठवण्याचे सांगण्यात आले.

पुढील परिपत्रकात या कार्यकर्त्यांना हेरगिरी, हल्ले, पोलिसिंग व पेट्रोलिंगचे प्रशिक्षण देण्याची सोय केल्याचे कळवले गेले. या ऑपरेशन पोलोची तयारी केवळ भारतीय सैन्याकडूनच नव्हे तर अंतर्गत स्टेट काँग्रेस आणि लढ्यात इतर सहभागी सर्वांनीच चालवली होती.

ऑपरेशन पोलो : औरंगाबादच्या प्राध्यापक इब्राहीम आणि त्याचा वेडगळपणा

१५ सप्टेंबर १९४८ रोजी भारतीय लष्कराने औरंगाबाद शहरावर कब्जा केला. त्याच दिवशी या शहरात एक विलक्षण आणि अस्वस्थ करणारा प्रसंग घडला.

भारतीय सैन्य औरंगाबादेत आले असताना, रझाकारांनी शरणागतीचा पांढरा ध्वज दाखवून त्यांना जाळ्यात अडकवण्याचा कट रचला, पण सैन्याने तो उधळून लावला.

यानंतर, औरंगाबादच्या इंटरमीजिएट कॉलेजमधील इतिहासाचा प्राध्यापक इब्राहीम याने विद्यार्थ्यांच्या हातात भाले देऊन त्यांना भारतीय रणगाड्यांसमोर उभे केले. समोर भारतीय सैन्याचे रणगाडे असताना हातात भाले आणि दगड घेऊन लढण्याची तयारी म्हणजे निव्वळ वेडगळपणा होता. 

भारतीय अधिकाऱ्याने मुलांना परिस्थिती समजावून सांगून जीव वाचवण्याचा सल्ला दिला. यानंतर बहुतांश मुले पळून गेली, तर काही पुढे गेली. विद्यार्थ्यांना मृत्यूच्या तोंडी ढकलणारा प्राध्यापक इब्राहीम स्वतः पळून जाताना पकडला गेला. 

ऑपरेशन पोलो : खोट्या बातम्यांच्या आडून दाखवलेला लष्करी पोकळपणा

नळदुर्गच्या घटनेत उल्लेखलेल्या दिवशी, १४ सप्टेंबरच्या सकाळी उमरग्याहून कूच करणाऱ्या सैनिकी तुकडीला जनरल चौधरींचा तातडीचा निरोप मिळाला, “कुठेही न थांबता वेगाने पुढे चालत राहा!

यामागील पार्श्वभूमी नंतर स्पष्ट झाली. जनरल चौधरींनी हैदराबाद रेडिओवरील बातमी ऐकली होती; त्यात दावा केला गेला होता की, “आम्ही जोरदार प्रतिकार केला, परंतु शेवटी आम्हाला ‘तळमूड’ सोडावे लागले आणि त्यावर भारतीय सैन्याने ताबा मिळवला.”

वास्तविक पाहता तेव्हा भारतीय सैन्याने तळमूड घेतलेलेच नव्हते. मात्र, या खोट्या बातमीमुळे भारतीय सैन्याला तात्काळ ती परिस्थिती प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळाली.

स्वतःच्याच खोट्या प्रसिद्धीच्या जाळ्यात अडकून निजामी सैन्य आतून कसे ढासळले, याचे हे एक अत्यंत उत्तम उदाहरण आहे.

१३ सप्टेंबर १९४८ रोजी पहाटे चार वाजता सुरू झालेली ही वादळी कारवाई १७ सप्टेंबरच्या सायंकाळी ५ वाजता निजामांच्या औपचारिक शरणागतीने शमली. शेकडो वर्षांची जुलमी घराणेशाही आणि अढळ वाटणारा असफशाहीचा तख्त अवघ्या १०९ तासांत पत्त्यांच्या बंगल्यासारखा पुरता कोसळला.

अथांग संपत्ती, अनियंत्रित सत्ता आणि रझाकारांच्या हिंसक ताकदीच्या अहंकारावर उभा असलेला निजामाचा साम्राज्यदुर्ग अखेर भारतीय सैन्याच्या निग्रहापुढे धुळीस मिळाला. ज्या हैदराबाद संस्थानाचा सूर्य कधी मावळणार नाही असे निजाम समाजात होता, त्या जुलमी राजवटीचा अस्त मराठवाड्याच्या स्वातंत्र्यसंग्रामातील बलिदानाने घडवून आणला.

इतिहासाच्या पुस्तकांत केवळ विजय आणि तारखांची नोंद उरते; पण एका लढ्याचे खरे मोल त्याच्या नैतिक चारित्र्यात असते. सामाजिक चळवळीतून होत गेलेली जनजागृती, हळू हळू उभा राहिलेला लढा, अनेक लहान मोठ्या लढाया, सत्याग्रहांची मालिका, अनेकांना आलेले हौतात्म्य, शेवटाला घडत आलेला प्रचंड रक्तपात, या सर्व पानांतूनच असफशाहीच्या राखेतून स्वतंत्र भारताच्या लोकशाहीची नवी पहाट उगवली.

मराठवाडा मुक्तिसंग्रामाची धगधगती गाथा सांगताना इतिहास नेहमी १३ ते १७ सप्टेंबर या केवळ १०९ तासांच्या वादळी पटावर येऊन स्थिरावतो. पण विजयी आरोळ्या आणि तारखांच्या गर्दीमागे या रक्तरंजित संघर्षाची अशी अनेक धुळीने माखलेली पानं दडली आहेत, ज्यांवरचा काळोख अजून पूर्णपणे हटलेला नाही. निजामाची दडपशाही, रझाकारांचा नंगानाच आणि स्वातंत्र्यासाठी पेटून उठलेला मराठवाडा या संपूर्ण प्रवासाच्या नोंदवहीत अशी कित्येक मौन दालनं आहेत, जी आज पुन्हा एकदा उघडून पाहण्याची गरज आहे. 

याच काही अल्पप्रचलित पानांचा उलगडा करण्याचा माझा प्रयत्न या लेखमालिकेतून मी केला. मी आपल्यापर्यंत नवीन माहिती पोचवू शकलो असेल मी मानतो. धन्यवाद.

– आशुतोष

Exit mobile version