१३ सप्टेंबर १९४८
१३ सप्टेंबर १९४८,संभाजीनगर अर्थात औरंगाबादच्या इतिहासात हि तारीख सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवण्याजोगी आहे.कारण शेकडो वर्षांपासून चालत आलेले निजामी व मुघल राज्याचा खात्मा होऊन सोनेरी स्वतंत्र भारताचे द्वार खुले झाले तो हा दिवस.औरंगाबाद शहरापासून केवळ १०० कि.मी. अंतरावर वर्षांपासूनच स्वातंत्र्याचे वारे वाहिले असताना औरंगाबाद व मराठवाडा मात्र अजूनही निजामी अत्याचाराच्या पारतंत्र्यात खितपत होता.निजाम कमी म्हणून काय आता कासीम रझवीचे हैवान रझाकार देखील सामान्य जनतेला पिडत होते.त्यात निजामाने भारतीय संघराज्यात सामील होण्या ऐवजी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला,त्या उपर ह्या कासीम रझवीच्या भडकाऊ वल्गना यामुळे वातावरण अत्यंत कलुषित होत गेलं.हैदराबाद च्या निजामाला दूर सारून तो आपल्या ताब्यात घेण्याची स्वप्ने पाहणारा हा कासीम रझवी आणि त्याचे अत्याचारी रझाकार आता हैदराबाद वर निजामाचे नसून रझवीचेच राज्य असल्याप्रमाणे वागत होते.हिंदू जनतेवर मनमानी अत्याचार सुरु करण्याचे आदेश रझवीने देताच सरदार पटेल खवळले अन तत्काळ पोलीस कारवाईला आरंभ केल्या गेला.
आधीच तयारीत असलेले भारतीय सैन्य चहूबाजूंनी हैदराबाद राज्यावर चाल करून गेले.सोलापुरातील नळदुर्ग व विजयवाडा येथून दोन मुख्य हल्ले तर बाकी चहुबाजूनी छोटे हल्ले करत तयारीचे भारतीय सैन्य निजामी संस्थानात घुसले.औरंगाबाद जिल्ह्याच्या सरहद्दीवरील देऊळगाव, नांदगाव, अजिंठा, चाळीसगाव, टोका, वैजापूर इत्यादी बाजूंनी भारतीय सैन्य रझाकारांच्या सरहद्दीत घुसले. इकडे रागाच्या भरात कसलीही तयारी नसलेले काही शेकडा रझाकार विद्यार्थी,त्यांचा म्होरक्या सय्यद बिलग्रामी ने वैजापूरच्या दिशेने धाडले.माळीवाडा जवळ झाडाझुडपात लपून यांनी दगडधोंडे फेकून भारतीय सैन्याचा हास्यस्पद प्रतिकार केला,लष्कराने विनंती करूनही न ऐकल्याने काही वेळातच हे इस्लामधर्मी तरुण हकनाक मारल्या गेले.
काही वेळात भारतीय सैन्य गावे दर गावे करत औरंगाबाद शहरात दाखल झाले,औरंगाबाद शहरातील बिलग्रामी,प्रो. इब्राहीम सह सर्व रझाकारी नेत्यांना तुरुंगात डांबण्यात आला, हर्सुलचा तलाव,मध्यवर्ती कारागृह,नवखंडा,सुभेदारी,शहागंज आदि सर्वच ठिकाणी आता तिरंगा मोठ्या अभिमानाने फडकवला गेला,औरंगाबाद स्थित निजाम रेडियो च्या केंद्रावरून ‘वंदे मातरम” चे सूर कानी पडू लागले,सर्वत्र भारतीय सैन्याचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले गेले,आनंदीआनंद पसरला.
हि १३ सप्टेंबरची सकाळ सोन्याची सकाळ होती,मराठवाड्याचा एक मोठा भूभाग निजामाच्या अन कासीम रझवीच्या अत्याचारातून आता कायमचा मुक्त झाला होता,अन्यायाची काळी छाया दूर होऊन स्वतंत्र भारताची सोनेरी पहाट आता उगवली होती…!
‘आजचे पहा उद्याचा कशाला विचार करता‘ असल्या विचारधारेच्या निजामाने कधी स्वप्नातही आपल्या जनतेचा विचार केला,पुढे सरकणाऱ्या काळाचा,बदललेल्या वाऱ्यांचा जराही विचार केला नाही,अन शेकडो वर्षांपासून सुरु असलेली आपली भव्य सत्ता फक्त चार दिवसांत धुळीस मिळवली.१३ सप्टेंबर रोजी अवघ्या काही तासांत मराठवाड्याच्या मोठा भूभागावर भारतीय सैन्याने ताबा मिळवला व पुढच्या ३ दिवसात निजामाला शरण येण्यावाचून पर्याय उरला नाही.