सावरकर आम्हाला माफ करा! पण कुठल्याही मोफत मिळालेल्या गोष्टीची किंमत न ठेवायची आम्हाला सवयच आहे,भारतीय स्वातंत्र्याचं सुद्धा तसंच झालं बहुतेक. ८० ९० च्या दशकात जन्मलेल्या आम्हाला करिअर ची चिंता असताना कसलं आलंय स्वातंत्र्य की पारतंत्र्य? ते तर १९४७ लाच मिळालं ना?
अहो जिथं स्वातंत्र्य काय ह्याचीच आम्हाला किंमत नाही तिथे त्यासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या तुमच्या सारख्या वीरांचा कोण विचार करतोय?
तुम्ही म्हणालात हाती शस्त्र घ्या,इंग्रजांना संपवा,पण अहो सहज सोपं ‘बिना खड्ग बिना ढाल’ स्वातंत्र्य मिळत असताना हे तुम्ही ब्रिटन मधून लपवून पिस्तुलं काय भारतात पाठवत बसलात,त्यात जॅक्सन वगैरे एक दोन गोरे मेले पण त्या हत्यांना आम्ही जास्त महत्व देत नाही.
तात्याराव,अहो तुम्ही बोटीतून थेट समुद्रात झेपावलात,ब्रिटन च्या पंतप्रधानालाही अपमान स्वीकारून माफी मागायला लावलीत,पण तुम्ही जसं अंदमानाच्या काळकोठडीत कैद झालात,तसं आम्हीही तुम्हाला आमच्या मनातल्या अंधार कोपऱ्यात अडगळीत ठेवून दिलं.स्वातंत्र्य पश्चात तुम्ही कुठल्या अंधार खोलती हरवलात कुणालाच माहित नाही!
तात्याराव,आम्हाला खरंच माफ करा,पण तुम्ही १८५७ चा अख्खा इतिहास मोठ्या कष्टानं आम्हाला शिकवलात, पण आमच्या इतिहासाच्या पुस्तकात तुमची पानभर माहिती देखील आम्ही कधी लिहू शकलो नाही,दोन जन्मठेपा भोगताना सोसलेले तुमचे कष्ट तुम्हाला मिळालेल्या दोन परिच्छेदाच्या जागेत मावणार कसे?
तुम्ही देशभक्ती जागृत केलीत,आम्हाला स्वाभिमान शिकवलात,पण आम्ही तर अब्राहम लिंकन चेही फोटो शाळेत लावलेत पण तुमचं जयोस्तुते मुलांना शिकवायचं आम्ही विसरलो!
अहो तात्याराव,तुम्ही फक्त राष्ट्रभक्त नव्हे,मोठे साहित्यिक सुद्धा होतात,खूप मोठी अभ्यासपूर्ण पुस्तकं लिहिली,कवितांची संख्या तर अगणित आहे,अगदी मराठी भाषेला नवीन शब्द देऊन,मराठीला शुद्ध रूप देण्यात तुमचं मोठं योगदान,पण आताच्या कॉन्व्हेंट अन मिशनरी स्कुल वाल्या आम्हाला मराठीमधलं तुमचं साहित्य वाचता कुठे येतंय?
तुम्ही जेलबाहेर स्थानबद्ध होतात,तिथेही समाजसुधारणा तुम्ही घडवलीत,अहो जात्युच्छेदन काम करणारे तुम्ही फक्त ब्राह्मण म्हणून बदनाम झालात,कारण तुमच्या नावाला राजकीय ‘व्हॅल्यू’ नाही,तुमच्या नावावर कोणी व्होट टाकत नाही!
तुम्ही काळाच्या गरजेला शोभणारी विज्ञानवादी दृष्टी दिलीत,पण ती पाहायला लागणारे चष्मे आज आमच्याकडे नाहीत,
तात्याराव, आम्हाला खरंच माफ करा,तुमचं देशप्रेम,तुमची राष्ट्रभक्ती,तुमची स्वातंत्र्याची तळमळ,तुमचं साहित्य,तुमच्या कविता,ती ‘ने मजसी ने’ मधली अगतिकता,ते ‘जयोस्तुते’,ते जात्युच्छेदन,ती आधुनिक दृष्टी,अहो तात्याराव ते सगळं सगळं आज आम्ही आऊटडेटेड करून टाकलं आहे,थोडक्यात तात्याराव,जन्माची राखरांगोळी करून,घरदारावर पाणी सोडून जगलेला तुम्ही,जितेपणी अंदमानच्या काळकोठडीत अन आत्मार्पणानंतर राजकारणाच्या अडगळीत राहिलात!
तात्याराव तुम्हीच,फक्त तुम्हीच आम्हाला स्वातंत्र्य दिलंत,आम्ही तुम्हाला चार पानांची जागाही देऊ शकलो नाही,
तात्याराव आम्हाला माफ करा,तुम्हाला पाहून अंदमानच्या दगडी भिंतींनाही पाझर फुटेल,पण आमच्या पाषाण हृदयाला तुमच्या आयुष्यभराच्या कार्याची किंमत कधी कळाली नाही,कळणार नाही!