भारतमातेच्या स्वातंत्र्याकरिता लढलेल्या अनेक क्रांतीकारकांचे आज आपल्याला झालेले विस्मरण हे काही नवीन नाही.त्यातल्या त्यात सशस्त्र क्रांती करू इच्छिणाऱ्या क्रांतिकारकांचे इतिहासातून गायब झालेले (का करवले गेलेले?) अस्तित्व म्हणजे अत्यंत दुःखाची बाब म्हणावी लागेल.स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या महापुरुषाची स्वतंत्र भारतात झालेली उपेक्षा पाहता इतर अनेक छोट्या मोठ्या घटनांतून लढलेल्या हजारो क्रांतीकारकांची साधी ओळखही आम्हाला नसणार हे अवचित आलेच. सशस्त्र क्रांती केलेल्या तरुणांच्या यादीत आम्ही एकवेळ भगतसिंह व त्यांच्या सोबत राजगुरू,सुखदेवांना वर्षातून एकदा मार्च मध्ये आठवण काढतो,पण असे कित्येक क्रांतिकारक होऊन गेले ज्यांच्यावर इतिहासात एक पानभर माहिती सुद्धा नशिबात आली नाही.
पंजाबात एक हुसैनीवाला म्हणून ठिकाण आहे.होय जिथे भगतसिंह,राजगुरू अन सुखदेव यांची स्मृतीस्थाने आहेत,पण त्याच हुसैनीवाला मध्ये आणखी एका व्यक्ती चे स्मृतीस्थळ आहे ते म्हणजे ‘बटुकेश्वर दत्त‘.
शालेय इतिहासाच्या पुस्तकात अवघ्या अडीच पानात संपलेल्या सशस्त्र क्रांतीच्या पाठात ‘बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंह यांनी दिल्लीत केंद्रीय संसदेत बॉम्बस्फोट घडवून आणला,त्याबद्दल त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली‘ एवढी एक ओळ काय ती बटुकेश्वर दत्त यांच्या वाट्याला आली.त्यावेळी दोन मार्क मिळावेत म्हणून इतिहासाची हि ओळ तोंडपाठ केलेल्या आम्हाला बटुकेश्वर दत्त आणि संसदेतला बॉम्बस्फोट एवढीच काय ती ओळख.किंबहुना शालेय विद्यार्थ्यांना याच्या पुढची ओळख करून देण्याची गरज बहुदा पुस्तक लिहिणाऱ्या मंडळाला वाटली नसावी.पारतंत्र्यात ब्रिटीश सरकार कडून काळ्या पाण्याच्या शिक्षेवर अंदमानात धाडलेल्या या तरुण क्रांतीविराला स्वातंत्र्यात मायभूमीत झेलाव्या लागलेल्या मरणयातना जास्त वेदनादायक आहेत.
बटुकेश्वर दत्त यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९१० मध्ये बंगाल मधील ओरी गावात झाला होता.यांचे वडील गोष्ठ बिहारी हे कानपूर मध्ये नौकरी करत असल्याने ते कानपूर मध्ये राहत असत.१९२४–२५ च्या सुमारास बटुकेश्वर दत्त यांचे मॅट्रिक चे शिक्षण झाले त्यावेळी त्यांच्या आई व वडिलांचे निधन झाले होते.या नंतर कानपूर च्या पी.पी.एन. महाविद्यालयात शिकत असताना त्यांची ओळख भगतसिंहांशी झाली व त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन ते ‘हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन‘ या क्रांतिकारी संघटनेत कार्य करू लागले.याच दरम्यान त्यांनी बॉम्ब बनवण्याचे तंत्र शिकून घेतले व त्यांच्या पुढाकाराने आग्रा येथे एक गुप्त बॉम्ब बनवण्याचा कारखाना चालू केला होता.
बटुकेश्वर दत्त यांना मुख्यत्वे ओळखलं जातं ते म्हणजे ब्रिटीशांच्या केंद्रीय विधानसभेत (आजच्या संसदेत) त्यांनी भगतसिंहांना सोबत करत केलेल्या बॉम्बस्फोटा मुळे.तत्कालीन ब्रिटीश सरकारने ‘पब्लिक सेफ्टी बिल और ट्रेड डिस्प्यूट बिल‘ नावाने दोन बिलं संसदेत मंडळी होती ज्यामुळे मजुरांच्या उपोषण करण्यावर सरकार निर्बंध घालून आणि क्रांतिकारकांच्या विरुद्ध पोलिसांना अनावश्यक अधिकार मिळवून द्यायचा प्रयत्न सरकार करत होतं. याचा निषेध म्हणून भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी 8 एप्रिल १९२९ रोजी कुणालाही हानी होणार नाही अशा पद्धतीने संसदेच्या प्रेक्षक दिर्घेतून बॉम्ब फेकून गोंधळ उडवला.या गोंधळात आपल्या विचारांची पत्रके उधळून त्यांनी बॉम्बस्फोटाचा उद्देश सर्वाना कळवण्याचा प्रयत्न केला.अन तिथून पळून न जाता स्वतःला अटक करून घेतली.
या सर्व घटनेत दोषी म्हणून भगतसिंह व बटुकेश्वर दत्त या दोघांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. परंतु त्याच वेळी लाला लजपतराय यांच्या मृत्युचा बदला म्हणून केलेल्या सॉंडर्स हत्येच्या लाहोर कटात सहभागी असल्याचा ठपका ठेऊन भगतसिंह यांना फाशीची शिक्षा झाली तर बटुकेश्वर दत्त यांना अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली.
याही बाबतीत आपल्याला फाशी झाली नाही म्हणून बटुकेश्वर दत्त दुःखी होत, परंतु भगतसिंहानी त्यांची ‘आत्महत्या म्हणजे पारतंत्र्यातून मुक्तीचा मार्ग नव्हे, क्रांतिकारकांनी हे दाखवून दिले पाहिजे कि ते फासावर लटकूनच नाही तर जिवंतपणी कारागृहात मरणयातना भोगून सुद्धा लढा देत असतात‘ अशा शब्दात त्यांची समजूत घातली.
पुढे अंदमान च्या कारागृहात १९३३ व १९३७ साली उपोषण करून त्यांनी इंग्रज सरकार विरुद्ध आवाज उठावाला,परंतु १९३८ साली महात्मा गांधींच्या हस्तक्षेपामुळे त्यांना कारागृहातून मुक्त करण्यात आले.अंदमानच्या कारागृहात क्षयरोगाने जर्जर झालेले असताना देखील बाहेर येताच त्यांनी आपले क्रांतिकार्य पुनःश्च सुरु केले अन १९४२ साली त्यांनी असहकार्य चळवळीत त्यांनी उडी घेताच त्यांना ४ वर्षांकरिता पुन्हा कारागृहात डांबले गेले. नंतर स्वातंत्र्याच्या अगदी थोडे आधी १९४५ साली त्यांची मुक्तता करण्यात आली.
नंतर पुढे १९४७ साली भारत स्वतंत्र झाला,पण भगतसिंहां च्या खांद्याला खांदा लावून क्रांतिकार्यात मोलाची कामगिरी करणाऱ्या या तरुणाच्या वाट्याला मात्र उपेक्षाच आली. स्वातंत्र्यप्राप्ती पश्चात बटुकेश्वर दत्त यांनी १९४७ साली विवाह करून पटना येथे ते स्थायिक झाले.
पुढच्या काळात त्यांनी बिस्किटांची छोटी बेकरी सुरु केली मात्र अल्पावधीतच ती नुकसानीत जाऊन बंद पडली.तदनंतर सिगारेट कंपनीची डीलरशिप घेऊन पाटण्याच्या रस्त्यावर फिरण्याची वेळ या क्रांतिकारकावर आली.मोठ्या धाडसाने संसदेत बॉम्बस्फोट करणारा हा क्रांतिवीर दुर्लक्षितच राहिला.
हे कमी म्हणून कि काय,परिस्थिती इतकी बिकट झाली शेवटी पटना परिवहन विभागात एक साधी नौकरी अन पुढे चालून पुनश्च पाटण्याच्या रस्त्यांवर पर्यटन गाईड म्हणून बटुकेश्वर दत्त फिरत राहिले.
ब्रिटीश सरकारला हादरे देणारे सशस्त्र हल्ले करून तिकडे गोऱ्यांची झोप उडवणारे बटुकेश्वर दत्त आपल्या भारतमातेच्या स्वतंत्र भूमीत आपल्याच सरकार कडून मात्र वंचित राहिले.
एक कहाणी तर अशीही सांगितली जाते, एकदा पटना शहरात बस चे परमिट वाटण्यात येणार होते,त्यावेळी बटुकेश्वर दत्तांनिही त्याकरिता अर्ज केला. परंतु स्थानिक आयुक्ताने बटुकेश्वरांकडे आपले स्वातंत्र्य सैनिक असल्याचा पुरावा घेऊन या अशी मागणी केली.इतका अपमान वाट्याला येणे म्हणजे अशा थोर क्रांतीकारकांनि भारतमातेच्या पोटी जन्म घेऊन मोठीच चूक केली असे म्हणावयास हरकत नाही,
पण ही उपासमार,वंचना इथवर थांबली नाही, १९६४ साली कसल्याश्या आजाराने त्रस्त हा क्रांतिवीर पाटण्याच्या सरकारी दवाखान्यात खितपत पडला होता,शेवटी त्यांचे आझाद नावाचे मित्र यांनी वर्तमानपत्रात लेख लिहून या उपेक्षेविरुद्ध आवाज उठावाला, तेव्हा कुठे सरकारला जाग आली,पण तोवर वेळ निघून गेली होती.त्यांना कर्करोग झाल्याचे निदान केले गेले, म्हणून दिल्लीच्या सफदरजंग इस्पितळात हलवण्यात आले, याही क्षणी “ज्या दिल्लीत मी बॉम्बस्फोट करून आवाज उठावाला त्या दिल्लीत पुन्हा स्ट्रेचर वरून असे आणले जावे” हि खंत त्यांनी बोलून दाखवली.
पण सरते शेवटी मृत्यूपश्चात आपले अंतिम संस्कार हे भगतसिंह,सुखदेव,राजगुरू या आपल्या मित्रांच्या शेजारी हुसैनीवाला येथेच करावेत हि इच्छा व्यक्त केली अन २० जुलै १९६५ साली आपले प्राण त्यागले.
भारतमातेच्या स्वातंत्र्याकरिता घरादारावर तुळशीपत्रे ठेऊन सशस्त्र उठाव करणाऱ्या या तरुणांना स्वतंत्र भारतात मात्र किती हाल अपेष्टा अन उपेक्षा सोसाव्या लागल्या.काही मोजके क्रांतिकारक सोडले तर इतरांचे कर्तुत्व इतिहासात दोन ओळीत लिहून संपविल्या गेले.असे शेकडो हजारो क्रांतिकारक असावेत ज्यांच्या वाटेला एक ओळही पुस्तकात येऊ नये,हे आपल्या स्वतंत्र भारताचे दुर्दैव म्हणूया.जिवंतपणी उपेक्षा मिळालेल्या या सर्व वीरांचे प्रतिक म्हणून बटुकेश्वर दत्त यांच्याकडे पाहता येईल,जिवंतपणी उपेक्षा अन मरणानंतर मात्र यांचं इतिहासातलं पार अस्तित्वच नष्ट करण्यात आले आहे.
२०१० साली बटुकेश्वर दत्त यांचे जन्म शताब्दी वर्ष होऊन गेले पण क्वचितच कुणाला त्यांची आठवण झाली असावी.त्यांच्यावर अनिल वर्मा यांनी लिहिलेले एक पुस्तक अन बिहार सरकार ने तीन महिन्याकरिता दिलेले विधान परिषदेचे सदस्यपद या व्यतिरिक्त बटुकेश्वर दत्त यांच्या वाट्याला काहीही आले नाही.
आज १८ नोव्हेंबर बटुकेश्वर दत्त यांची जयंती त्यानिमित्त हा लेख प्रपंच.अशा विस्मृतीत गेलेल्या थोर वीर पुरुषांना उजेडात आणण्याचे कार्य सदैव करत राहूया.