सध्या आपल्या नवनवीन वादग्रस्त विधानांनी राजकीय सामाजिक वातावरण तापवू पाहत असलेले खासदार ओवेसी मिडिया च्या उपलब्धते मुळे सगळी कडे गाजत असले तरी ह्या एमआयएम चे हे प्रकार काही नवीन नाहीत. आपली धर्मांध वक्तव्यं ही एमआयएम च्या इतिहासाला साजेशीच ठरत आहेत. हा इतिहास बोलला गेला नाही तरी तो फार काही लपून राहणारा नाही, अनेकवेळा मिडिया आणि वृत्तपत्रे असद-उद्दीन ओवेसीना ‘कासीम रझवी’ नामक इतिहासातल्या कुण्या व्यक्ति बद्दल विचारतात, पण असद-उद्दीन ओवेसीने ‘आपण रझवी चे कुणी लागत नाही,रझवी आणि एमआयएम चा काही संबंध नाही’ इतके बोलून एमआयएम चा काळा इतिहास (बहुधा त्यांनाही तो सांगण्यास लाज वाटत असावी) लपून राहत असेल असे कदापि नाही. या निमित्ताने या ‘एम-आय-एम’ बद्दल बरेच प्रश्न मनात येतात, त्या निमित्ताने या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुसलमीन (AIMIM) एमआयएम चा इतिहास मांडण्याचा केलेला हा प्रयत्न.
काय आहे एमआयएम चा इतिहास?
एम आय एम ह्या राजकीय पक्षाची सुरुवात आत्ता नजीकच्या काळात नव्हे तर थेट स्वातंत्र्य पूर्व निजाम काळात १९२७ हैदराबादला झाली. मुसलमान समाजाचे संघटन, सशक्तीकरण असे साधे मुद्दे घेऊन नवाब मेहमूद नवाज खान यांच्या पुढाकाराने मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुसलमीन या संघटनेची उभारणी केली गेली. ह्या संघटनेच्या स्थापनेला सातवा निजाम मीर उस्मान अली खान याचं समर्थन होतं असंही बोलल्या जातं, कारण ह्याच संघटनेच्या माध्यमातून आपली धार्मिक महत्वाकांक्षा निजाम राबवू शकणार होता. सुरुवातीला साधी उद्दिष्ट्ये घेऊन तयार झालेली ही संघटना नंतर मात्र अधिकाधिक कट्टर होत गेली ती १९३८ नंतर जेव्हा नवाब बहादूर यार जंग याच्याकडे ह्या संघटनेचं अध्यक्षपद आलं. ‘हैदराबाद हे मुस्लीम राज्य म्हणून घोषित झालं पाहिजे’,हैदराबाद चा निजाम हा भारतातीलं इतर सर्व राज्यकर्त्यापेक्षा उच्च ठरवून त्याला ब्रिटिशांनी ‘His Exalted Highness(HEH)’ ऐवजी ‘His Majesty’ ची पदवी द्यायला हवी अन निजामाला ‘दख्खन चा राजा’ घोषित करायला हवा अशा प्रकारच्या अवास्तव घोषणा बहादूर यार जंग ने देण्यास सुरुवात केली. त्याच्या ह्या विधानांना भुलून अगोदर निजाम उस्मान अली खान त्याच्यावर खुश होता, त्याकरिता मजलिस ला बरेच स्वातंत्र्य सुद्धा दिलं गेल होतं जेणेकरून ती संघटना अधिकाधिक धर्मांध होत गेली.
बहादूर यार अध्यक्ष असतानाच ह्या संघटनेत सामील झाला होता तो हैदराबाद च्या इतिहासातील सर्वात मोठा खलनायक. मूळ लातूरचा असलेला पण उत्तर प्रदेशातील अलिगढ विद्यापीठातून पदवी केलेला कासीम रझवी. बहादूर यार च्या भाषणांमुळे भावूक होऊन कासीम रझवी मजलिस मध्ये सामील झाला, इतकेच नव्हे तर लातूर मध्ये आपल्या राहत्या घरात ह्या मजलिस चे कार्य सुरु करण्यापर्यंत त्याचा सहभाग वाढला होता. पुढे चालून १९४४ मध्ये मजलिसचा अध्यक्ष बहादूर यार जंग याचा विषारी हुक्का घेतल्या मुळे गूढ मृत्यू झाला, ह्या मृत्यू मागे निजामाचाच हात असल्याची शंका व्यक्त केली जात होती कारण मजलिसची शक्ती एवढी वाढली होती की आता की हैदराबादचे नियंत्रण निजाम कमी ह्या संघटनेतूनच जास्त होऊ लागले. निजामाला नसलेले लोकांचे समर्थन मजलिस ला मात्र भरपूर प्रमाणात मिळाले होते. बहादूर यार जंग च्या मृत्यू नंतर त्याचे अध्यक्षपद आले ते कासीम रझवी कडे आणि सुरुवात झाली एका अत्याचारांनी भरलेल्या काळ्या इतिहासाला!
कासीम रझवी नेतृत्वपदी येताच त्याने मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुसलमीन ची एक सैनिक आघाडी देखील उघडली, अन त्याला नाव दिले ‘रझाकार’. ह्या रझाकारी बद्दल मराठवाड्यात तरी फारसे काही सांगायला नकोच, पाशवी अत्याचार ह्या शब्दाला समानार्थी शब्द म्हणून कुठला शब्द तयार झाला असेल तर तो आहे ‘रझाकार’. कासीम रझवी हा दिसायला खुज्या, अंगाने कृश अन गर्दीत अजिबातच उठून न दिसू शकणाऱ्या प्रकृतीचा होता, पण शरीराने न मिळणारे उठावदार व्यक्तिमत्व त्याने आपल्या वाणीने भरून काढले होते. वाणी म्हणजे त्याची अत्यंत असंबद्ध, आक्रमक, अस्थिर अन असंतुलित भाषण पद्धती, कसलेही तर्क वितर्क नसलेले केवळ अशिक्षित सामान्य मुसलमानांना भडकावणारी भाषणे करून त्याने मोठा जन समुदाय आपल्या पाठी उभा केला होता. ह्या रझाकारी सैन्याला अफगाणिस्तानात तालिबान मध्ये करतात तसे युवकांना सहभागी करून, त्यांची माथी भडकावून प्रेरित करायचे, अन त्यांना सैनिकी प्रशिक्षण देऊन धार्मिक लढाई करण्यास तयार केले जात होते. १९४८ पर्यंत सुमारे २ लक्ष सैन्य ह्या रझवी ने रझाकारांच्या रुपात उभे केले होते.
एव्हाना ह्या रझवी अन रझाकार एम-आय-एम चा दबदबा इतका प्रचंड होता की खुद्द निजाम सुद्धा ह्या रझवी ला उत्तरे द्यायला घाबरत असे. निजामानेच पाळलेली ही सापाची औलाद आता त्यालाच संपवायला निघाली होती. रझाकारांची मर्दुमकी अशी वाढली की अगदी सामान्यातला सामान्य मुसलमान देखील स्वतःला राजा समजून इतरांशी व्यवहार करत होता. (रझाकारी अत्याचारांबद्दल इथे न लिहिता त्याची पुनश्चः माहिती देईनच.)
हैदराबाद व भारत सरकार मधील बोलणी सुरळीत होत नाहीत म्हणून ‘जैसे थे’ करार करायचे ठरले त्यातही हस्तक्षेप करत ह्या कासीम रझवीने हैदराबादच्या निजामातर्फे बोलणी करण्यासाठी जाणाऱ्या समिती मधील सदस्यांच्या घरावर मोर्चे करून, त्यांनाच जीवे मारण्याची धमकी देऊन तो करार देखील होऊ दिला नाही, अन वरून ‘लाल किल्ल्यावर निजामाचा असफजाही झेंडा फडकवू, बंगालचा उपसागर निजामाचे पाय धुण्यास येईल’ अशी अन ह्याहून भडकावणारी विधाने, थेट हिंदूंच्या कत्तली करण्याची विधाने तो भाषणामधून करत सुटला होता. आता गेल्या वर्षी अकबर-उद्दीन ओवेसी ने केलेलं विधानं म्हणजे ह्या कासीम रझवीचाच अजून एक नमुना होता.
ह्या रझाकारांच्या अत्याचारांचे स्तोम माजतेय हे पाहून सरदार पटेलांनी भारतीय सैन्याला हैदराबादवर चढाई करण्याची परवानगी दिली अन फक्त ४ दिवसांत हे काही शेकडा वर्ष जुनं साम्राज्य भारतीय सैन्यासमोर गारद झालं.
ओवेसी संबंध कुठून आला?
१९४८ साली, ऑपरेशन पोलो समाप्त होताच कासीम रझवीला तत्काळ अटक करून खटले चालवण्यात आले, त्याला तत्काळ शिक्षादेखील करण्यात अली, त्यात काही काळ हैदराबाद च्या चंचलगुडा व नंतर पुण्याच्या येरवडा मध्ये त्याला कैदेत ठेवले होते.१९४८ सालीच स्वतंत्र भारतात ह्या ‘एम-आय-एम’ मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुसलमीन वर बंदी घालण्यात अली होती ती बंदी पुढे १९५७ साली उठवली गेली.
१९५७ साली कासीम रझवी ह्याला तत्काळ पाकिस्तानात निघून जाण्याच्या अटीवर कैदेतून सोडण्यात आले. पण बाहेर येताच त्याने तत्काळ मजलिस प्रमुख सदस्यांची बैठक बोलावली. त्यात १४० पैकी केवळ ४० सदस्य उपस्थित होते. कासीम रझवी ने ह्या बैठकीत इतरांपुढे अध्यक्ष होऊन संघटना पुढे नेण्याचा पर्याय ठेवला, पण कुणीही पुढे आले नाही तेव्हा सर्वानुमते रझवीच्या मर्जीतील अब्दुल वाहेद ओवेसी यांना मजलिसचे अध्यक्षपद दिले गेले, अन अशा प्रकारे ओवेसी घराण्याकडे रझवीचा वारसा चालत आला. अब्दुल वाहेद ओवेसी नंतर त्यांचे पुत्र सलाह-उद्दीन अन तद्नंतर असद-उद्दीन असे घराणेशाहीने अध्यक्षपद चालत राहिले. रझाकारी नष्ट झाली, रझवी सुद्धा देशाबाहेर हाकलून दिल्या गेला पण त्याचा वारसा बहुधा आजही चालवण्याचा ठेका एमआयएम ने घेतला असावा.
कारण भडकाऊ वक्तव्यं करणं हे काही एम-आय-एम ला नवीन नाही. एमआयएम चा ताबा आपल्याकडे येताच अब्दुल वाहेद ओवेसी ने ह्या एमआयएम च्या नावात एक ‘ऑल इंडिया’ जोडून आत्ताचा AIMIM हा राजकीय पक्ष सुरु केला. त्यात पुनःश्च मुस्लीम समाजाला भडकावणारी भाषणे दिल्या संबंधी अब्दुल वाहेद ओवेसीला १४ मार्च १९५८ रोजी अटक करण्यात आली होती अन ११ महिने कारावासात काढावी लागली होती.
बहुधा अशीच भडकाऊ भाषणे देऊन इस्लाम धर्मी समाजाला एकत्र करण्याचा चंगच जणू एम-आय-एम चे ओवेसी घराणे करत आले त्यामुळे आत्ताच्या काळात देखील अकबर-उद्दीन ओवेसी आणि असद-उद्दीन ओवेसी हे बंधू देखील हाच राजकीय ‘फोर्मुला’ वापरत असावेत. कारण काही तथ्य नसलेली, सामाजिक सलोख्याला धरून नसलेली मनमानेल तशी विधानं करायची अन एका विशिष्ट समाजातल्या तरुणांची डोकी फितवायची त्यावर राजकारण करून आपणच कसे मुसलमानांचे तारणहार म्हणून राजकीय पोळ्या भाजायच्या, निवडणुका जिंकायच्या एवढेच बहुधा एमआयएम च्या इतिहासातच नव्हे वर्तमानात सुद्धा लिहिले आहे. आपण एमआयएम चे संकेतस्थळ तपासून पहा,ओवेसीने मुलाखतींमध्ये दिलेली उत्तरे तपासून पहा,कासीम रझवीला आपल्या इतिहासातून दडवण्याचा पुरेपूर प्रयत्न एमआयएम करते,पण मांजराने डोळे झाकून दूध पिले म्हणजे ते इतरांना दिसत नाही असे मुळीच नाही, इतिहासातील अनेक संदर्भ तपासले असता ही झाकली मूठ अपोआप उघडते हे स्पष्ट आहे, कासीम रझवी चा संबंध नाकारून पुन्हा त्याच्याच पावलावर पाउल टाकण्याने ओवेसी बंधू सुद्धा सामान्य भारतीयाच्या मनात खलनायकच ठरत आहेत.
(वरील माहिती करिता अनेक संदर्भ पुस्तके,वर्तमानपत्रे यांचा आधार घेतला आहे)