समुद्राच्या अथांगतेला,दूर दिसणाऱ्या क्षितिजाला,आकाशाच्या अनंततेला जशा सीमा नसतात तशीच या महामानवाच्या धाडसाच्या गगनभरारीला कुठलीही सीमा नाही,एका भरारीनिशी इतिहास घडवणारा हे महात्मा शतकात एखादा जन्माला येतो,अन या जन्मीचा तो वीर,क्रांतिवीर म्हणजे विनायक दामोदर सावरकर…! सावरकर म्हटलं की आठवते ती जगप्रसिद्ध उडी,उडी नव्हे ती तर गगनभरारी,कारण याच गगनभरारी ने इंग्रजांच्या साम्राज्याचा अस्त करणारा तो क्रांतीसूर्य आता जन्माला आला असल्याचे दाखवून दिलं,मार्सेलिस ची गगनभरारी,पंच महाभूतांपैकी एक असलेल्या त्या अथांग जल महाभूताला छेदून,सावरकरांनी घेतलेली ती भव्य झेप,इतिहासात अजरामर होऊन गेली, क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत “चातुर्या वाचून केलेला पराक्रम म्हणजे पशुचा गुण होतो” अन आपले हेच शब्द खरे करणारे कृत्य दिसले,त्या मार्सेलिसच्या गगनभरारीत…! ही वरकरणी जरी केवळ धैर्य अन धाडसाने भरलेली झेप वाटत असली तरी त्यात त्या गोष्टीचा पूर्व अभ्यास देखील महत्वाचा होता. आपल्याला जहाजातून नेले जाणार, ते जहाज मार्सेय अर्थात मार्सेलीस च्या बंदरावरून जाणार अन इथेच,इथेच ब्रिटीश सरकारला अडचणीत आणता येऊ शकते याची पूर्ण कल्पना सावरकरांच्या डोक्यात होती. कारण मार्सेलिस म्हणजे फ्रांस, अन फ्रान्सच्या भूमीवर ब्रिटीश पोलिसांना काडीचीही किंमत नाही,त्या भूमीवर ते आपल्याला अटक करू शकत नाही,म्हणजे आपण सहजासहजी निसटू शकतो,तेव्हा आपण काहीतरी करून मार्सेलिस मध्ये जहाजावरून पलायन करून आपली सुटका करून घेऊ शकतो,अन ब्रिटीश पोलिसांना हातावर हात ठेऊन घडत्या गोष्टी बघत राहण्या पलीकडे काही करता येणार नाही, ही ती अद्वितीय योजना,हेच ते चातुर्य जे ह्या धाडसा पूर्वी अत्यंत निष्णातपणे योजलं होतं.
झाले तर मग,ठरले भारतमातेसमर्पीत हे धाडस करायचेच,
भारतात पाठवणी होण्याअगोदर सावरकरांच्या भेटी आलेल्या त्यांच्या सहकार्यांना ‘शक्य झाले तर लवकरच मार्सेय ला भेटू’ असा संदेश वजा कल्पना देउन झाली,सहकारी आचार्य काय ते समजून चुकले, अन ८ जुलै,तो शतकांतुन एक येणारा पराक्रमाचा दिवस उजाडला,8 जुलै रोजी सकाळीच बंदिवासातील सावरकरांना भारताच्या दिशेने घेऊन निघालेले एस एस मोरिया ही बोट फ्रांस च्या मार्सेय बंदराजवळ खलबत घालून उभे होते.त्यावेळी हीच योग्य संधी आहे हे लक्षात घेऊन सावरकरांनी योजना डोक्यात चालवली.त्यांनी पोलिसास शौचालयात जाण्याची परवानगी मागितली.ती त्यांना दिली गेली.
शौचालयात भिंतीच्या वरच्या बाजूस एक पोर्ट होल अर्थात समुद्राच्या बाजूने उघडणारी एक खिडकी ज्यात एक माणूस कसाबसा मावू शकेल असे पोर्ट होल होते.याच पोर्ट होल मधून निसटण्याचा निश्चय सावरकरांनी केला.सहा साडेसहा फुट उंचीवर असलेलं ते पोर्ट होल चढण्यास सोपे तर अजिबात नव्हते,आधीच उंच त्यात सरपटतच बाहेर पडायचे अन पलीकडे अथांग समुद्र,हे म्हणजे वाटते तितके सोपे काम नक्कीच नव्हते,अत्यंत धाडसाचे अन तेवढेच जोखमीचे कारण उडी थोडी जरी चुकली तरी बोटीच्या खालून बाहेर आलेल्या राम्पवर डोके आपटून थेट मृत्यू ओढवू शकला असता,हे कितीही जोखमीचे काम असले तरी ते आव्हान पेलणारा कुणी साधा सुधा मनुष्य नव्हता,राष्ट्रासाठी थेट मृत्युलाच आव्हान देण्याची हिम्मत करणारा विनायक दामोदर सावरकर होता !
योजना तर आखली अन तत्काळ अंमलबजावणी,शौचालयाच्या दारावर,जिथून बाहेर उभे पोलीस आतल्या कैद्यावर लक्ष ठेऊ शकत होते त्या दारच्या खाचेवर सावरकरांनी कपडे अडकवून ठेअले जेणेकरून पोलिसांना आतले काही दिसणार नाही, अन बघता बघता सावरकर त्या साडेसहा फुट उंच पोर्ट होल च्या खिडकीत चढले अन बाहेरच्या बाजूस सरकून पुढच्या क्षणात खालचा राम्प चुकवत झेपावले,ते थेट त्या मार्सेलिस च्या अथांग समुद्रात! हीच टी उत्तुंग भरारी,वरकरणी एका राजकीय कैद्याचे पलायन म्हणवली जाणारी झेप,जिने इतिहास घडवला,अख्ख्या जगात जी बराच काळ चर्चेचा विषय बनून राहिली,पण इथेच हे शौर्य संपत नाही,खरा पराक्रम तर पुढची अनेक आव्हाने पार करुन सुखरूप फ्रान्सच्या च्या किनाऱ्यावर पोहोचण्यात होता.
एव्हाना सावरकर निसटले ही खबर पोलिसांना मिळालीच होती कारण शौचालयात खूप वेळ लागतो आहे म्हणून दार तोडून आत आलेल्या पोलिसाने सावरकरांचे पाय पोर्टहोल मधून बाहेर पडताना पहिले होते,लगोलग पोलिसांनी बोटीवरून सावरकरांच्या दिशेने गोळीबार सुरु केला,छोट्या होड्या देखील पाण्यात उतरवण्यास तयार केल्या,पण त्यांना पाठलाग करायचा होता तो सावरकर नामक असामान्य धैर्याच्या भारतीय क्रांतिकारकाचा, जहाजापासून फ्रान्सच्या मार्सेलिस किनाऱ्याचे अंतर सुमारे ५०० यार्ड सावरकरांनी ते समुद्र पोहत पार केलेच,पण त्याहून मोठे आव्हान होते,समोर किनार्याला लागून भिंत उभी ठाकली होती,8 फुट उंच आणि गुळगुळीत दगडाची,मागाहून येत असलेले पोलीस अन त्या समुद्राच्या थंड पाण्यात देह भिजलेला,विचार करवत नाही की त्या असामान्य देहाला कित्येक यातना होत असाव्यात,पण हा महामानव जो मृत्यूला कधी घाबरला नाही,अन संसाराची राखरांगोळी करून देशप्रेमापोटी सर्वस्व अर्पिलेला तो क्रांतिसूर्य ती भिंत कशी काय जणू ती सुद्धा पार करून फ्रान्सच्या किनाऱ्यावर पोहोचला.हे एक अचाट शौर्य होतं,ह्या बद्दल लिहावे तेवढे थोडेच अत्यंत निष्णात पाने योजना आखून ती तडीस नेणारा क्रांतिवीर आता फ्रान्सच्या भूमीवर कैदी नव्हता,मुक्त होता,इथे त्याला ते ब्रिटीश पोलीस हातही लावू शकणार नव्हते,पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते,थोड्याच वेळात ब्रिटीश पोलीस किनाऱ्यावर पोहोचले,अन सावरकरांचा पाठलाग सुरु केला,सावरकरही धीराने धावत सुटले कारण योजनेचा दुसरा भाग,इंग्लंड मधील त्यांचे सहकारी शामजी कॄष्ण वर्मा आणि मॅडम कामा त्यांना येऊन मदत करणार होते,पण त्यांना पोहोचायला नेमका उशीर झाला होता,त्यात सावरकरांना फ्रान्सच्या पोलिसांनी अडवले,सावरकरांनी इंग्रजी मध्ये त्यांना परिस्थिती समजावून सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण पोलिसांना ते समजेना त्यात ब्रिटीश पोलिसांनी फ्रेंच पोलिसांना थोडीफार लाच देऊन सावरकरांचा ताबा घेतला,फ्रान्सच्या भूमीवर अनधिकृतपणे सावरकरांना अटक केले,व परत मोरिया बोटीवर आणले गेले.
सावरकरांचा हा पराक्रम किंचित अपयशी वाटत असला तरी यातून अनेक गोष्टी साध्य केल्या गेल्या,ब्रिटीश सरकारची प्रचंड प्रमाणात छी-थू केल्या गेली,ब्रिटीश सरकार भारता प्रती कसे अनैतिक कार्य करते आहे हे जगापुढे आले,जगभरातील वृत्तपत्रांत या महापराक्रमी उडीचे वर्णनं छापली गेली,प्रकरण हेग च्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यावे लागले,परकीय देशाच्या एकट्या पुरुषा मुळे दोन राष्ट्रांत भांडणे लागण्याचे दुसरे कुठलेही उदाहरण इतिहासात सापडणार नाही,काहीजण तर असेही म्हणतात की सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा होऊन जेव्हा भारतातून बोटी द्वारे अंदमानात पाठवले जात होते त्यावेळी फ्रान्सची एक पाणबुडी सावरकरांच्या बोटी मागून पाठवली गेली, कारण फ्रान्सला असे वाटत होते की ह्या मानवाची शाश्वती नाही,कदाचित हा मनुष्य पुन्हा बोटीवरून समुद्रात झेपावेल अन आपण त्याला परत मुक्त करून फ्रान्समध्ये आणू.
अखंड विश्वात खळबळ माजवणारे हे असामान्य शौर्य करू शकणारा हा सुपुत्र भारतमातेला लाभला,इंग्लंडच्या पार्लमेंट मध्ये हा व्यक्ति आपल्याला शत्रू म्हणून लाभला याकरिता आभार व्यक्त केले जातात हे थोडे थोडके नव्हेच. अशा या अचाट कामगिरी निभावलेल्या क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आज आत्मार्पण दिवस. आपल्या ‘अनादी मी अनंत मी’ मध्ये सावरकर लिहितात त्याप्रमाणे खरोखरच ‘भिऊनि मला भ्याड मृत्यू’ पळत सुटावा,असे ओजस्वी पराक्रमी अचाट साहसी आयुष्य घालवलेले सावरकर,त्या आयुष्यातला क्षण अन क्षण देशप्रेमाने ओतप्रोत भरलेल्या अश्या या वीर पुरुषाकडून आपण शिकावे तेवढे थोडेच. अगदी १५ व्या वर्षी लिहिलेले स्वातंत्र्याचे स्तोत्र असो,भारतातच काय पण इंग्रजांच्या घरात राहून केलेली क्रांती असो,त्यांचे लेखन असो,वर उल्लेखलेली ती मार्सेलिसची जगप्रसिद्ध उडी,त्यांची काळ्यापाण्याची शिक्षा किंवा त्या नंतर केलेले समाजसुधारणा कार्य या वीर पुरुषाच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाने सूर्याप्रमाणे तळपत हिंदुस्थान राष्ट्राला प्रकाशमान करण्याचे काम सदैव केले.या क्रांतीसुर्य सावरकरांबद्दल आपण काही लिहावे म्हणजे त्या सूर्यासमोर आपण आपली एक पणती घेऊन बसण्यासारखे आहे.हा क्रांतिसूर्य आमच्या मनामनातून सदैव असाच तळपत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.