मराठवाडा मुक्तिसंग्राम – लेख 3 –
हुतात्मा गोविंदराव पानसरे: जनक्षोभाची ठिणगी
मराठवाडा मुक्तिसंग्राम हा निजामी अत्याचारांविरुद्ध जनतेने दिलेला लढा, त्यात जनतेचा आक्रोश होता. अनेक प्रकारे जुलूम केले जात असताना जनतेच्या मनात असंतोष खदखदत असतो, त्या असंतोषाला केवळ आणखी एका अत्याचाररुपी ठिणगीची गरज असते. एक अशी ठिणगी पडली की मनात दडलेल्या त्या असंतोषाचा उद्रेक व्हायला वेळ लागत नाही. त्याचे उदाहरण म्हणजे हुतात्मा गोविंदराव पानसरेंचा खून.
गोविंदराव पानसरे हे स्टेट काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद, मुधोळ, शेजारच्या निजामाबाद आणि आदिलाबाद जिल्ह्यातील अनेक तालुके हे त्यांचे कार्यक्षेत्र. त्यांना मराठी, हिंदीप्रमाणेच तेलुगूही येत असे. याच भागात त्यांनी महाराष्ट्र परिषद व स्टेट काँग्रेसची सभासदनोंदणी फार मोठ्या प्रमाणावर केली. लोकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी ते जवळजवळ दररोजच निजामी शासनाशी भांडत असत. रेसिडेंट, व्हाइसरॉय आणि हैदराबादच्या पंतप्रधानांना त्यांचं आठवड्यातून एक तरी पत्र किंवा तार जात असे. लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचा त्यांना मनस्वी तिरस्कार होता. मुधोळच्या तहसीलदाराने म्हैसा येथील व्यापाऱ्यांकडून लाच घेतल्याचं कळताच त्यांनी सर्वत्र अर्ज करून त्याचा अक्षरशः घाम काढला.
पानसरेंचे कार्य इत्तेहादुल मुसलमीन आणि निजाम सरकार यांच्या डोळ्यात खूप लागले होते.
पानसरेंनी मुधोळ तालुक्यातील कोंडलवाडी येथे एका सभेत भाषण केलं. सरकारला ते आक्षेपार्ह वाटलं आणि त्यांना १४ ऑक्टोबर १९४६ रोजी अटक करण्यात आली. साधारणपणे अशा प्रकरणांत सरकार अटक करून जामिनावर सोडून देत असे, पण पानसरेंना जामिनावर सोडू नये अशी पोलिसांनी भूमिका घेतली. त्यांना पोलीस कोठडीतच ठेवण्यात आलं. शेवटी २१ ऑक्टोबरला बिलोली कोर्टाने त्यांना जामिनावर सोडलं.
नेमक्या त्याच दिवशी कोंडलवाडीला इत्तेहादुल मुस्लिमीनची सभा ठेवण्यात आली होती. पानसरे केव्हा सुटणार याचा त्यांना अंदाज होता. त्या सभेत इत्तेहादच्या नेत्याने पानसरेंविरुद्ध प्रक्षोभक भाषण करून, “तुम्ही असताना तो जिवंत राहतो कसा,” अशी उघड फूस दिली.
कोर्टाचं काम संपवून पानसरे बैलगाडीने कोंडलवाडीकडे निघाले. सोबत हंगरग्याचे कार्यकर्ते पुंडलिक पाटील आणि माधवराव मेणकुदळे होते. गाडी अर्जापूरनजीक पोहोचली आणि त्यावेळी रझाकारी मुसलमीनची एक माथेफिरुंची टोळी त्यांना आडवी आली “तुमच्यात पानसरे कोण आहे?” अशी त्यांनी विचारणा केली आणि त्या दोघांवर तलवारीने हल्ला केला.
आणि इथे जे घडलं ते विलक्षण होतं. पुंडलिक पाटील या तरुणाने पानसरेंच्या अंगावर पडत सर्व वार आपल्या पाठीवर झेलले. हे पाहून पानसरे ओरडले “मी पानसरे आहे. तो नव्हे. तुम्हाला मारायचे असेल तर मला मारा.” असं म्हणायचा अवकाश, की पानसरेंवर तलवारीचे एकामागून एक वार झाले. गोविंद पानसरे हुतात्मा झाले.
हा हल्ला शासन संगनमताने पूर्वनियोजित होता. त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा देह परत धर्माबादला नेऊ द्यायचा नाही आणि बेवारशी म्हणून तिथेच विल्हेवाट लावायची अशीही तयारी नांदेडच्या डीएसपीने केलेली होती. शेवटी घाईत बिलोली मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूनंतरही पानसरेंचा छळ थांबला नाही.
पानसरेंचा खून तर झाली, परंतु त्यांच्या मृत्यूनेच मराठवाड्यात एक प्रचंड तुफान निर्माण केलं. त्यांच्यामागून हुतात्म्यांची एक मालिकाच तयार झाली.
गोविंदराव पानसरेंच्या हौतात्म्याचे प्रतिध्वनी संपूर्ण मराठवाड्यातच नव्हे, तर खुद्द हैदराबाद शहरात आणि तेलंगण व कर्नाटकातही उमटले. सर्वत्र मोठमोठ्या निषेध सभा झाल्या, ठराव झाले. तरुणांमधील असंतोष अनेक मार्गांनी व्यक्त झाला. हा खून निजाम सरकारला खूप महागात पडली.
अर्जापूरला खुनाच्या जागी लोकांनीच एक दगड ठेवून, शेंदूर लावून स्मारक उभारलं. खून सोमवारी झाला होता, म्हणून दर सोमवारी तिथे शेकडो लोक जमू लागले, लोकांनी सोमवारचे उपवास धरले आणि जणू त्या जागेला यात्रेचे स्वरूप आले. दर सोमवारी पानसरेंचा आत्मा तिथे येतो अशी अफवा आसपासच्या क्षेत्रात पसरली आणि लोकांचे जथ्थे तिथे दर्शनाला येऊ लागले.
अशाच एका सोमवारी, ६ जानेवारी १९४७ रोजी अर्जापुरी प्रचंड यात्रा जमली. सरकारी अंदाजानुसार दहा-पंधरा हजार, इतरांच्या मते चाळीस हजार ते लाखभर लोक. बिलोलीचा फौजदार जैदी याने ही यात्रा बंद करूनच दाखवण्याची प्रतिज्ञा केली होती. सायंकाळी चारपर्यंत सर्व सुरळीत होतं, पण जैदीने पोलिसांची व्हॅन लोकांच्या अंगावरच घातली आणि गोळीबार सुरू केला. पोलीस चार जणांचा जीव घेऊन बिलोलीस पळून गेले.
सरकारने हे पाप लपवण्याचा कसून प्रयत्न केला, पण काँग्रेसच्या चौकशी समितीने तपशीलवार चौकशी करून सरकारच्या जातीयवादाचे पुरते वाभाडे काढले.
पानसरेंच्या खुनात नांदेडजवळच्या उमरीचा तत्कालीन फौजदार बद्रुद्दीन याचा हात होता. तो नंतर परभणी जिल्ह्यातील बोरी येथे बदलून आला आणि त्याने तिथेही दडपशाही सुरू केली.
त्याचा काटा काढण्यासाठी स्टेट काँग्रेसच्या परभणी जिल्हा केंद्राने मनमाड येथील बैठकीत एक गुप्त योजना आखली. आनंदराव कौसडीकर, मधुकर औंढेकर आणि द. रा. मेढेकर या तीन तरुण सैनिकांना दोन पिस्तुलं आणि सात हँडग्रेनेड देण्यात आले. लपत-छपत, बतावणी करत ते मनमाड-रोटेगावमार्गे सेलूला उतरले आणि आडमार्गाने १४ डिसेंबर १९४७ रोजी सायंकाळी बोरीला पोहोचले.
रात्री साडेआठच्या सुमारास बद्रुद्दीन घरासमोरच्या ओट्यावर बसला असताना, दोघे त्याच्या अगदी जवळ गेले आणि लागोपाठ गोळ्या झाडल्या. तो टेबलाआड लपला, तेव्हा दुसऱ्याने आणखी दोन गोळ्या झाडून हँडग्रेनेड फेकलं. तिसऱ्याने पोलीस ठाण्याच्या दिशेने ग्रेनेड फेकलं. एकच धुमाकूळ माजला आणि त्या गडबडीत तिघेही पसार झाले. पाठलाग होऊनही कोणी हाती लागलं नाही. बद्रुद्दीन जबर जखमी झाला आणि दीड महिन्यानंतर दवाखान्यातच मरण पावला.
आज अर्जापूरच्या त्या मैदानाला ‘पानसरे मैदान’ असं नाव पडलं आहे. तिथे त्यांची समाधी आहे, शासनातर्फे हुतात्मा स्मारक आहे, त्यांच्या नावे महाविद्यालय आणि हायस्कूल आहे.
पण त्यापेक्षाही मोठं स्मारक जनतेच्या हृदयात निर्माण झालं. गोविंद पानसरेंच्या हत्येच्या बातम्या पसरताच अवघा मराठवाडा पेटून उठला, अन्यायाविरुद्धचा जनतेचा रोष अत्यंत तीव्र झाला आणि याच प्रचंड जनक्षोभाच्या व विद्रोहाच्या आगीत अवघ्या काही काळातच क्रूर निजाम सरकारचा कायमचा अंत झाला.
– आशुतोष (इडलीवाला अण्णा)
मराठवाडा मुक्तिसंग्रामातील अशाच काही अज्ञात, विस्मृतीत गेलेल्या घटनांचं वर्णन मी दररोज संध्याकाळी एका लेखातून १७ सप्टेंबरपर्यंत करणार आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामाची ही अज्ञात गाथा तुम्हाला रोज वाचायला मिळेल. माझ्या अनुदिनीवर (ब्लॉगवर), थ्रेड्सवर आणि व्हॉट्सअप चॅनेलवर.
मला फॉलो करून ठेवा, हैदराबाद आणि मराठवाड्याच्या इतिहासातील अनेक कोपरे उलगडण्याचा मी प्रयत्न करत आहे.
