डॉस DoS हल्ला – इंटरनेटवरचा अदृश्य गोंधळ

गेल्या दोन दिवसांत आपलं “एक्स” म्हणजे ट्विटर वापरताना अडचणी येत होत्या ना? त्यानंतर बातमी आली की एक्स वर सायबर अटॅक झाला आहे? आपण एक्सचा अनुप्रयोग उघडतोय, किंवा वेबसाईट उघडत तर ते चालतच नाही, बाकी इंटरनेट व्यवस्थित आहे पण एक्स चालत नाही, हा तर ट्विटरच्या सर्वरचा प्रॉब्लेम असेल यामागे कुठला आलाय सायबर हल्ला?

सायबर हल्ल्याच्या या प्रकाराला नाव आहे “डिनायल ऑफ सर्विस” सोप्या शब्दांत DoS Attack(डॉस अटॅक). आंतरजालावरची एखादी सुविधा वापरू न देणे, त्यातून लोकांचे किंवा त्या सेवेचे नुकसान करणे हा उद्देश ठेवून एखादा सायबर हल्ला केला जात असेल तर त्याला म्हणतात डॉस (डिनायल ऑफ सर्विस).

हा हल्ला समजून घ्यायचा तर एक साधं उदाहरण घेऊ. कल्पना करा, तुम्ही मेट्रो स्टेशनवर आहात आणि तुम्हाला ट्रेनमध्ये चढायचंय. पण तिथे हजारो लोक अचानक गर्दी करतात आणि त्या गर्दीमुळे तुम्हाला मेट्रोच्या दारातून आत जाणं अशक्य होतं. ही सगळी गर्दी विनाकारण आणि मुद्दाम उभी केलेली आहे, त्या गर्दीला मेट्रोने कुठेही जायचे नाही, मात्र खऱ्या प्रवाशांना मेट्रो मध्ये जाता यायला नको म्हणून ते तिथे जमले आहेत! हाच असतो DoS Attack – बनावट ट्रॅफिकचा पूर निर्माण करून खऱ्या लोकांना सेवा मिळू न देणे.

तुम्हाला मेट्रोने जायचे आहे, तुमच्याकडे तिकीट आहे, तुम्हाला घाई आहे, समोर रिकामी मेट्रो सुद्धा वेळेवर उभी आहे, पण तुम्ही जाऊ शकत नाही. तुमचेही नुकसान आणि मेट्रोचेही नुकसान! डिनायल ऑफ सर्विस हल्ला असाच असतो – हल्लेखोर एखाद्या संकेतस्थळावर इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट किंवा अनावश्यक विनंत्या (requests) पाठवतात की खऱ्या युजर्सना सेवा मिळूच शकत नाही.

थोडक्यात बघा, काल आणि परवा आपल्या पैकी अनेक जणांना एक्सचा अनुप्रयोग (ऍप) वापरताच येत नव्हते. म्हणजे काही काळासाठी ट्विटर ही सुविधा आपल्याला वापरता आली नाही, म्हणजे आपली ‘सर्विस डिनाय’ केली गेली. त्यामुळे एक्सचे आर्थिक नुकसान झाले, कारण त्यांच्या जाहिराती चालल्या नाहीत, अनेक जणांना काहीतरी लिहायचे असेल ते लिहिता आले नाही म्हणून ते लोक चिडले असतील, यातले बरेच जण हे संकेतस्थळ सोडून दुसरीकडे निघून जातील असे अनेक परिणाम ह्यातून होऊ शकतात.

ट्विटर हे केवळ सोशल मीडिया आहे म्हणून आपल्याला ह्याची झळ फार मोठी वाटत नाही. पण जर हाच हल्ला बँक, हेल्थकेअर किंवा सरकारच्या ऑनलाइन सेवांवर झाला तर? विचार करा, तुम्हाला तातडीने पैशांची गरज आहे आणि अचानक बँकेचं नेट बँकिंगच बंद पडलंय! किव्हा एखाद्याला अर्ज भरायचा आहे आणि सरकारी वेबसाईट उघडतच नाहीये! हॉटेलमध्ये कॅशलेस पेमेंट करायला जावं तर UPI कामच करत नाहीये! अशा वेळी डिनायल ऑफ सर्विस (DoS) हल्ला किती गंभीर ठरू शकतो याची कल्पना येईल.

ट्विटरसारख्या प्लॅटफॉर्मसाठी हा त्रास तात्पुरता वाटू शकतो, पण बँकिंग, हेल्थकेअर किंवा सरकारी सेवांसाठी याचे परिणाम मोठे असू शकतात. एखाद्या कंपनीला मोठी आर्थिक झालं बसू शकते. एखाद्या शहराचा वीज पुरवठा यंत्रणा कोलमडू शकते, एखाद्या देशातील बँकांचे अंतर्गत नेटवर्क पूर्णतः कोलमडू शकते, वरवर सामान्य वाटत असला तरी हा डिनायल ऑफ सर्विस फार घातक ठरू शकतो. अशा हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी कंपन्यांना सुरक्षा उपाय करता येतात.

सायबर सुरक्षा फक्त तंत्रज्ञांसाठी नाही, तर आपल्यासाठीही महत्त्वाची आहे. सतर्क राहूया, सुरक्षित राहूया!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *