गणेशोत्सव साजरा करणे हा मराठवाड्यात एकेकाळी राजद्रोह ठरू शकत होता. राजकीय आणि सामाजिक जागृती व्हावी या उद्देशाने टिळकांनी पुण्यात गणेशोत्सव सुरु केला. त्याचे लोण मराठवाड्यात पोचले नसते तर नवलच.
निजामाच्या आधिपत्याखाली असलेला मराठवाडा सामाजिक पार्शवभूमीवर भारताच्या इतर क्षेत्रांपेक्षा जरास अलिप्त राहिला असता. १८९३-९४ दरम्यान लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव पुढे एक दोन वर्षांतच मराठवाड्यात आणि खुद्द हैदराबाद शहरात पोहोचला. गणेशोत्सव मराठवाड्यात विशेषतः संभाजीनगर (तत्कालीन औरंगाबाद) शहरात सुरु झाला. हैदराबाद शहरातील शिवराम शास्त्री गोरे यांनी सुरु केलेला शालीबंडा, चादरघाट येथील गणेशोत्सव देखील याच काळात सुरु झालेला.
गणेशोत्सवाचा मोठा परिणाम झाला तो टिळकांच्या औरंगाबादभेटी दरम्यान. १९०१ दरम्यान ताई महाराजांच्या दत्तक विधान प्रकरणात लोकमान्य टिळक औरंगाबादला आले. या काळात लोकमान्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली होती. लोकमान्य टिळक औरंगाबादला आल्यामुळे स्थानिक मराठवाड्यातील कार्यकर्त्यांना एक नवी ऊर्जा मिळाली आणि त्या भेटीनंतर तिथे सार्वजनिक उत्सवाची बीजं अधिक घट्ट रुजली.
टिळकांच्या स्वदेशी आणि बहिष्कार चतुःसूत्रीचा प्रभाव इथेही दिसू लागला. १९०८ मध्ये टिळकांना राजद्रोहाखाली सहा वर्षांची मंडालेत शिक्षा झाली, तेव्हा मराठवाड्यात हा उत्सव पसरत होता. प्रतिकूल परिस्थितीतही टिळकांच्या शिक्षेच्या निषेधार्थ गंगापूर, औरंगाबाद, जालना व परभणीत विद्यार्थ्यांनी बहिष्कार टाकून निदर्शने केली. निजामाबाद, हैदराबाद, रायचूर, गुलबर्गा व बीदरमध्येही याचे पडसाद उमटले. पुढे अनंत कान्हेरे यांनी केलेला जॅक्सनचा वध ही याच असंतोषाची तीव्र प्रतिक्रिया होती.
हा काळ म्हणजे सहावा निजाम मीर मेहबूब अली याचा उत्तरार्ध, त्यामुळे वातावरण अनुकूल नसले तरी काही खटपटी करण्याला भरपूर वाव होता. याच काळात हैदराबादमधील विवेक वर्धिनी (१९०७) आणि गुलबर्ग्यातील नूतन विद्यालय (१९०८) या शैक्षणिक संस्था स्थापन होऊ शकल्या. पुढे आलेल्या सातव्या निजामाच्या काळात तर अशा संस्थांवर सरसकट बंदी आली असती.
गणेशमंडळांतून एकत्र आलेल्या लोकांनी वाचनसंस्कृती उभी केली. टिळकांच्या निधनाच्या दिवशी, १ ऑगस्ट १९२० रोजी औरंगाबादमध्ये बलवंत वाचनालय स्थापन झाले, जे पुढे आनंद कृष्ण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली देशभक्तीचे केंद्र बनले. तसेच कंधारचे शारदा वाचनालय (१९४१), बीडचे साहित्य निकेतन, अंबेजोगाईचे वाचनालय (१९४५) व वैजापूरचे वैजनाथ वाचनालय यांसारख्या अनेक वाचनालयांची मराठवाड्यात स्थापना झाली.
१९०५-१९०७ च्या काळात हैदराबादेत हनुमान व्यायामशाळा सुरू झाली. देशभक्तीचा भाग म्हणून बलोपासना मानल्याने आखाडे व व्यायामशाळा देशभक्तीची केंद्रे बनली. पुण्याहून आलेले दत्तो अप्पाजी तुळजापूरकर आणि श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी ही चळवळ संपूर्ण हैदराबादेत आणि मराठवाड्यात पसरवली.
लातूर, औसा, नळदुर्ग यांसारख्या छोट्या गावांपासून ते मोठ्या शहरांपर्यंत, जवळपास प्रत्येक तालुक्यात एक तरी व्यायामशाळा किंवा आखाडा उभा राहिला. याच काळात गावोगावी मराठी आणि उर्दू माध्यमांच्या शाळाही उभ्या राहू लागल्या. काही ठिकाणी तर सरकारी परवानगीविना शाळा सुरू केल्याबद्दल खटलेही भरले गेले, तरी लोकांनी हे प्रयत्न सोडले नाहीत.
१९३०-४० च्या दशकात रझाकारांच्या हल्ल्यांच्या भीतीमुळे औरंगाबाद, नांदेड व हैदराबादमध्ये आखाड्यातील तरुण गणेशमंडपांचे रक्षण करत. निजाम सरकारने गणेशोत्सवावर कडक निर्बंध लादले; सार्वजनिक गणपतीसाठी पोलीस आयुक्तांची किंवा जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी अनिवार्य केली आणि भाषणे व गाण्यांची यादी सादर करणे बंधनकारक केले. पुढे विसर्जन मिरवणुकीत वाद्य वाजवण्यास व मशिदींसमोरून मिरवणूक नेण्यास बंदी घालून उत्सव दडपण्याचा प्रयत्न झाला.
याशिवाय, १९२१ च्या गश्ती निशाण ५२ अन्वये सभा, मिरवणुका, व्यायामशाळा, आखाडे, खासगी शाळा व ग्रंथालयांवर परवानग्यांची सक्ती लादली गेली. तसेच १९२९ च्या गश्ती निशाण ५३ द्वारे पूर्वपरवानगीशिवाय राजकीय सभा घेण्यावर बंदी घालून, उल्लंघन करणाऱ्यास २०० रुपये दंड किंवा १ महिन्याच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली.
निजाम स्वतःच्या फर्मानात ‘माझा देश आणि माझी प्रजा’ असे शब्द वापरत असला, तरी त्याच प्रजेने सुरु केलेल्या एका वाचनालयाला, एका आखाड्याला तो इतका घाबरत होता, यापेक्षा सामाजिक ताकदीचा दुसरा पुरावा तो काय असणार? आणि तरीही हे लोण थांबलं नाही. निजामाने कितीही फर्मानं काढली, तरी वाचनालयांची, व्यायामशाळांची, विद्यालयांची संख्या वाढतच राहिली.
याच वाचनालयांतुन बंदी असणारी पुस्तके चोरून वाचणारा एखादा तरुण, याच विद्यालयांतून शिकणारे कित्येक विद्यार्थी, याच आखाड्यांत कुस्तीच्या डावांबरोबर देशभक्तीचे धडे गिरवणारा एखादा पैलवान, याच व्यायामशाळांत शरीर कमावता कमावता मनगटात एक वेगळाच जोश साठवणारा एखादा कार्यकर्ता, पुढे मुक्तिसंग्रामाच्या लढ्यात उतरला, तेव्हा त्याच्या हातातलं शस्त्र नवं असेल, पण मनातली जिद्द याच गणेशमंडपांतून, याच वाचनालयांतून घडलेली होती.
सार्वजनिक गणपती बसवणं ही निव्वळ धार्मिक कृती राहिलीच नव्हती. ते एक सामाजिक अस्त्र बनलं होतं. या गणेशोत्सवाच्या उत्सवाच्या मंडपाखाली मुक्तिसंग्रामाचा पाया घातला जात होता.
मराठवाडा मुक्तिसंग्रामातील अशाच काही अज्ञात, विस्मृतीत गेलेल्या घटनांचं वर्णन मी दररोज संध्याकाळी एका लेखातून १७ सप्टेंबरपर्यंत करणार आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामाची ही अज्ञात गाथा तुम्हाला रोज वाचायला मिळेल. माझ्या अनुदिनीवर (ब्लॉगवर), थ्रेड्सवर आणि व्हॉट्सअप चॅनेलवर.
मला फॉलो करून ठेवा, हैदराबाद आणि मराठवाड्याच्या इतिहासातील अनेक कोपरे उलगडण्याचा मी प्रयत्न करत आहे.
– आशुतोष
संदर्भ:
हैदराबादचा स्वातंत्र्य संग्राम आणि मराठवाडा – अनंत भालेराव
