सामान्य माणसाला सायबर जागरूकता का महत्वाची आहे?

डिजिटल अरेस्टची आणखी एक घटना कानावर आली. रोज रोज येणाऱ्या बातम्या पाहिल्या तर हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि याला मुख्यत्वे उच्चशिक्षित बळी पडत आहेत.

आपल्या शिक्षणासोबतच सायबर जागृतीची गरज निर्माण झाली आहे. ही जागृती केवळ एकदा केली म्हणजे पूर्ण झाली असेही नसते. याला सतत नवीन प्रकारे, नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी पुन्हा पुन्हा करत राहणे आवश्यक असते.

सायबर क्षेत्रात एक तत्व आहे, Security is not an activity, its a journey. सायबर सुरक्षा हा कायम चालू राहणारा प्रवास असतो आणि सायबर जागृती हा त्याचाच भाग आहे.

आज डिजिटल अरेस्ट, शेयर मार्केट फ्रॉडला लोक बळी पडत आहेत त्यासाठी जागृती आवश्यक आहे. भविष्यात दुसऱ्या प्रकारचे फ्रॉड येतील त्यावेळी त्याच्या अनुसार जागृती आवश्यक असेल. पूर्वी केवळ ओटीपी स्कॅम होते, पण आता लोक ओटीपी बद्दल जागरूक झाले म्हणून गुन्हेगारांना नवीन रस्ता काढावा लागला. त्यांनी जो नवीन रस्ता काढला त्याला अनुसरून आपण जागरूक होणे महत्वाचे ठरते.

सायबर जागरूकता ही एक न संपणारी आणि सतत अद्ययावत करावी लागणारी प्रक्रिया आहे. आपण सायबर जागरूक आहोत असे आपल्याला वाटत असले तरी आपण बळी पडू शकतो. त्यासाठी वेळोवेळी स्वतःला वृत्तपत्रे, सोशल मीडिया, सायबर जागरूकता कार्यक्रम सुरू आहेत तिथून स्वतःला अद्ययावत (अपडेट) ठेवणे गरजेचे आहे.

-> मी खूप शिकलेला आहे. माझ्या बाबतीत फ्रॉड होणार नाही.
-> मी अत्यंत जागरूक व्यक्ती आहे.
-> मी खूप शिकलेला आहे. माझ्या बाबतीत फ्रॉड होणार नाही. जागरूकता म्हणजे तेच नेहमीचे पासवर्ड, ओटीपी अशा गोष्टी शिकवतात.
-> मी कॉम्प्युटर, फोन फारसे वापरत नाही मला याची काय गरज?
-> माझ्याकडे काय पैसेच नाहीत मला कोण हॅक करेल?
अशा अनेक सबबी सांगून आपण सायबर जागरूक होण्यापासून पळ काढतो पण अशाने आपण एका नवीन सायबर फ्रॉडचे द्वार उघडतो. कारण आपल्या सारखे सामान्य लोक जागरूक नसतात म्हणून त्यांना हॅकरला वाट मोकळी होते.

आपले आरोग्य चांगले राहावे म्हणून आपण स्वच्छता ठेवतो, स्वतःची काळजी घेतो, एखादी रोगाची साथ पसरली तर विशेष काळजी घेतो, अगदी तसेच आपला महत्वाचा डेटा, आपण कष्टाने कमवलेली संपत्ती, पैसे, मान मरातब केवळ एका सायबर हल्ला, किंवा फ्रॉड मुळे खराब होऊ नये यासाठीच आपण स्वतःला जागरूक, आणि अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.