एका नंतर एक चेंगरा चेंगरीच्या होणाऱ्या घटना पाहता, शाळेत शिकवलेली रांगेत चालण्याची शिस्त आपण लोक शाळा संपताच विसरून गेलो का असे वाटून जाते. सार्वजनिक ठिकाणी प्रशासनाने कितीही व्यवस्था केली तरी आपण धावपळ, ढकलाढकली करू नये, रांगेत संयम ठेवून वागावे इतके केले तरी बराच गोंधळ कमी होईल.
तुम्ही गर्दी असणाऱ्या कुठल्याही प्रसिद्ध मंदिरात जा,तिथे रांगा असताना सुद्धा जेव्हा शेवटी दर्शन मंडपात पोचता तेव्हा ढकलाढकली होतेच. एकमेकांच्या अंगचटीला गेल्या शिवाय आपण देवाचे दर्शन घेऊ शकत नाही, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली वगैरे तक्रारी करताना आपण स्वतः त्यात दोषी आहोत हे आपल्याला समजायला हवे.
एखाद्या ठिकाणी खूप गर्दी असेल तर आपण गर्दीत कसे वागायला हवे, ढकलाढकली झालीच तर त्यातून कमीत कमी गोंधळ उडेल याची प्रत्येकाने काय खबरदारी घ्यावी, तणावाची स्थिती उत्पन्न करू नये याचे प्रशिक्षणच असायला हवे. प्रचंड लोकसंख्या, गर्दी, हे आपल्या रोजच्या जीवनाचे भाग आहेत, हे आपण मान्य करायला हवे. मोठ्या इमारतीत आग लागल्यावर काय करायचे ह्याचे प्रशिक्षण असते, विमानात बसल्यावर अपघात समयी काय करायचे याची शिकवण ते दर विमानात देतात, तसे सामान्य माणूस म्हणून रोजच्या गर्दीत चेंगराचेंगरी होऊ नये याचे किमान लेखी, मौखिक मार्गदर्शन, जागरूकता व्हायला हवी. त्यासाठी नियंत्रक व्यक्तिंना गर्दी नियंत्रणाचे प्रशिक्षण आणि सामान्य लोकांसाठी जागरूकता जागोजागी करता येऊ शकते.
अनेक घटना या केवळ एखादी गोष्ट अनपेक्षित घडल्याने, घबराटीने किंवा ऐनवेळी काय करावे याचे मार्गदर्शन नसल्याने होतात. मुंबईत २०१७ च्या एल्फिन्स्टन रस्ता – परळ स्थानकांच्या पादचारी पुलावर झालेल्या दुर्घटनेची आठवण झाली. एक अफवा पसरल्याने चेंगराचेंगरी झाली अशी बातमी त्यावर आली होती. ह्या घटनांतून आपण शिकायला हवे, त्या वेळी झालेली चूक दुरुस्त करता यायला हवी. आपण गर्दीचा भाग आहोत, आपणच ती गर्दी आहोत हे भान ठेवून आपण गर्दीच्या ठिकाणी वागायला हवे. भारता सारख्या देशात गर्दी टाळता येऊ शकत नाही मात्र तिला तोंड देऊन काही वाईट होऊ नये याची काळजी आपण स्वतः घेऊ शकतो.