पत्रपेटीच्या आकारात असलेला हा एक गल्ला आहे. मी लहान असताना आमच्या घरी काचेचं कपाट होतं, त्यात दिखाव्यासाठी म्हणून आईने हा आणला होता. नंतर तो अडगळीत पडला होता, मला सापडला तेव्हा मी ह्याला उचलून टेबलवर ठेवण्यास सुरुवात केली. त्यात मी सुटे नाणे टाकतो. सहा महिने वर्षभरात हा गल्ला भरतो, ते पैसे मी दुसरीकडे जमा करून पुन्हा त्यात नव्याने नाणे टाकतो. चांगले शेकड्याने रुपये जमतात.
मी एक सामान्य नौकरदार माणूस आहे. आज अर्थसंकल्प सादर होईल, त्यात मोठी आकडेमोड सांगून निर्मलाताई अर्थकारण शिकवतील. अर्थसंकल्प चांगला की वाईट यावर चर्चा होतील. आपल्यासारख्याला ते समजत नाही, पण आपण तो विषय सोडून चालणार नाही.
फायनान्स, सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट या गोष्टी आपल्याला समजल्या नाहीत, तरी प्रत्येकानं एक करावं. कमावलेल्या पुंजीतली थोडी का होईना रक्कम कायम अशा एखाद्या गल्ल्यात, बँकेत जमा करत राहावी. तिकडे अर्थसंकल्प खाली वर होतील, सामान्य माणसाला फायदा की नुकसान होत राहील. पण पै पै ने जमवलेली ही संपत्ती सामान्य माणसाला आधार देत राहील.
माझ्यासारख्या ज्याला अर्थकारण काही कळत नाही, त्याने पैसे जमा करत राहण्याचा सोपा मार्ग धरावा. हा गल्ला सामान्य माणसाच्या सुरक्षित भविष्याचा आधार असतो. हा गल्ला भरलेला असताना आपल्याला आत्मविश्वास देतो, भरून रिकामा झाला की त्याला पुन्हा भरण्याची प्रेरणा देतो. मेहनत करून हळू हळू तो गल्ला भरावा, तो रिकामा झाला की शून्यापासून मेहनतीने तो पुन्हा भरावा हेच सामान्य माणसाच्या आयुष्याचे अर्थकारण असते. सामान्य माणूस ह्या गल्ल्यातल्या सेव्हिंग रूपाने आत्मविश्वासाने जगतो.
सेव्हिंगच्या रुपातला असा एक गल्ला प्रत्येकाकडे असावा, टेबलावर कायम!