चाकोरी बाहेरचा प्रवास

तीन वर्षांपूर्वी पावसाळ्यात पोलादपूर महाबळेश्वर रस्त्याने ड्राईव्ह करून गेलो होतो. त्यावेळी मला या भागाची शून्य कल्पना होती. रस्ता कसा आहे, कुठून जातो, वातावरण कसे असते याची काहीही कल्पना नव्हती. लोणावळा ते महाबळेश्वर मला जायचे होते, पुणे मार्गे जाण्याऐवजी आपण थोड्या वेगळ्या रस्त्याने जाऊ म्हणून मी पाली-माणगाव-महाड-पोलादपूर असा रस्ता निवडला. नवीन रस्त्याने जायचं म्हणजे थोडी धाकधूक असतेच, त्यात मुंबई गोवा महामार्ग खूप खराब आहे वगैरे हूल ट्विटरवर उठलेली असतेच.

पण मी जेव्हा गेलो, त्या नवीन भागातून जाण्याची धाकधूक तर सोडाच पण एका अविस्मरणीय प्रवासाचा अनुभव घेतला. अर्ध आयुष्य मराठवाडा आणि तेलंगणा सारख्या रुक्ष भागातूनच प्रवास केलेल्या आमच्या डोळ्यांना हा देखणा हिरवागार निसर्ग पहायची सवय नव्हती. पहावे तिकडे हिरव्या रंगाची मुक्तहस्त उधळण. माणगाव महाड रस्त्याने सुंदर अशा कोकणची पहिली झलक मी अनुभवली. रस्त्याच्या कडेला स्पर्श करत जाणारी सावित्री नदी म्हणजे सासरी लाजत मुरडत निघालेली नवविवाहित असते तशी वाटत होती.

पोलादपूरला वळण घेऊन महाबळेश्र्वरचा रस्ता धरला तो प्रवास मी आयुष्यात कधीही विसरणार नाही. महाराष्ट्रात मोठे डोंगर आहेत आणि त्यात भलेथोरले घाट आहेत हे माहित होतं, पण गाडीचे स्टिअरिंग हातात असताना त्यातलाच एक अवघड वळणांचा आंबेनळी घाट मी पहिल्यांदा अनुभवला. निसर्गाने हिरवी चादर पांघरलेली, त्यात धुके, हलका पाऊस, मध्येच नागमोडी वळणे आणि घाटातले चढ चुकवत मी माझ्या ड्रायव्हिंगचे कसब पणाला लावणारा हा प्रवास करत होतो. स्वर्ग कुठे आहे तर तो इथे आहे म्हणावे लागेल असेच माझे मत झाले. प्रत्येक वळणावर गाडी थांबवून एखादी दरी, धुक्यांचे आच्छादन असलेला डोंगर अशी दृश्ये डोळ्यांत साठवायचा मी प्रयत्न करत होतो. मजल दरमजल करत मी धुक्यात हरवलेल्या महाबळेश्वरला जाऊन पोचलो. पण खरे तर हा प्रवास कधी संपूच नये असं मला मनोमन वाटत होतं.

तीस चाळीस की पन्नास एक किमी लांब असा हा रुबाबदार घाट मला अनपेक्षित भेटला होता. एकदा का आपण इथे गाडी चालवली तर यापुढे आपला रोजचा दौलताबादचा घाट म्हणजे काय, अतिसामान्य!!!

या एका अविस्मरणीय प्रवासामुळे मी आपलीच एक थिअरी मांडली. प्रवास हे दोन प्रकारचे असतात. एक तुमच्या माहितीतला, नेहमीचा, ओळखीचा, ठरवून केलेला. जिथे आपल्याला काय अनुभव येतील याचा एका लागेबंध, ताळमेळ आपल्या मनाला आधीच झालेला असतो. तो प्रवास किती सोपा किंवा अवघड असला तरी आपले मन जणू पूर्ण तयारीनिशी त्या प्रवासात उतरलेले असते. तिथले नदी नाले, खाचखळगे यांची जणू आपल्याला सवय झालेली असते आणि एक प्रकारे,’हे तर आपलं नेहमीचंच’ असा तो प्रवास असतो.

प्रवासाचा दुसरा प्रकार आहे,तो न आखता, अज्ञात रस्त्याने घडलेला, त्यात खरी मजा आहे. पुढे येणारा रस्ता कसा, डोंगर आहे की दरी याची अजिबात कल्पना नसताना, अगदी मोकळ्या मनाने समोर येईल ते स्वीकारायची तयारी ठेवलेला अकल्पित प्रवास. एखादे मुक्तछंद काव्य लिहावे, शब्द सुचतील तसे यमक जुळवावे आणि कल्पनाविश्वाच्या पलीकडे जाऊन विस्मयकारक अनुभव मिळावा तसा हा दुसरा प्रवास. हा दुसऱ्या प्रकारचा प्रवास तुम्हाला हमखास आश्चर्यचकित करायला भाग पाडतो. कधी विचारही केला नसेल असा अनुभव देतो, एका चाकोरी बाहेरचे आयुष्य जगण्याची एक संधी, चाकोरीमुक्त स्वातंत्र्य, एखाद्या पाखराला पिंजऱ्यातून मुक्त होऊन जाळीच्या पलीकडचे आयुष्य स्वीकारण्याचा पहिला अनुभव हा न ठरवलेला, न आखलेला प्रवासच देऊ शकतो.

आयुष्य हा देखील असाच एक प्रवास आहे. या प्रवासात एक ठरलेली चाकोरी तर आहेच, तेच रोजचं जगणे आहे. या चाकोरीबद्ध जगण्याचा एक शीळ या आयुष्यावर चढलेला आहे. एकदा चाकोरी बाहेर पडलो तर मात्र एक अविस्मरणीय, स्वतंत्र, मुक्त आणि आपण कल्पना केली नसावी त्यापेक्षाही सुंदर असा एक प्रवास या आयुष्यात दडलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.