कॉग्निझंट आणि २.५ लाखांचे पॅकेज
करियरची सुरुवात कॉग्निझंट सारख्या मल्टीनॅशनल कंपनीत करायची संधी,भरपूर काही शिकण्याची संधी,२-४ वर्षांत सिव्हीचे वाढलेले महत्व,मिळणारे एक्सपोजर एवढे सगळे होणार असताना त्यावर विनोद करणाऱ्या लोकांच्या बुद्धीची खरेच कीव वाटते.
कॉग्निझंट ऑफ कॅम्पस प्लेसमेंट घेऊन फ्रेशर्स मुलांना २.५ लाख प्रतिवर्ष इतके पॅकेज देणार हा विषय सध्या ट्रेंड होतोय आणि त्यावरून कॉग्निझंट कंपनी वर खूप टीका सुरू आहे. यावर माझे मत मांडतो आहे. हे मत थोडे कठोर आणि प्रवाह विरोधी आहे.
बेरोजगार म्हणून बिनपगारी घरी बसण्या पेक्षा आता मिळत असलेले २.५लाख हे केव्हाही चांगलेच. आजच्या आयटी क्षेत्राची वस्तुस्थिती पाहता जिथे अनेकांची नौकरी जाते आहे, तिथे एक फ्रेशर म्हणून मिळालेले हे पॅकेज उत्तमच म्हणावे लागेल.
अनेकांनी यावर मीम, टीका करणाऱ्या ट्वीट आणि पोस्टचा भडिमार सुरू आहे. बहुतेक लोकांनी याची तुलना घरातल्या कामवाल्या मावशी, हॉटेल मधील वेटर इत्यादि लोकांशी केली.
एका इंजिनियरला मिळणाऱ्या पॅकेजची तुलना घरकाम करणारे, मजूर इ. करणे हास्यास्पद आहे. हा २.५लाख वाला इंजिनियर वर्षाला ५०-१००% पगारवाढ घेत मोठ्या पॅकेज वर निघून जाऊ शकतो, तुमच्या घरी काम करणाऱ्या मावशीला तुम्ही अशी पगारवाढ देणार आहात का?
२.५ लाखांचे पॅकेज ही केवळ सुरुवात आहे. ही नौकरी करत, नवीन स्किल शिकत या मुलांना खूप पुढे जाण्याची संधी आहे.आयुष्यभर याच पॅकेजवर काम करायचे नाही आहे. पण कुठे तरी करियर सुरू व्हायला पाहिजे, ती ही संधी आहे.
करियरची सुरुवात कॉग्निझंट सारख्या मल्टीनॅशनल कंपनीत करायची संधी मिळत आहे, काम करण्यासाठी उत्तम वातावरण, संपूर्ण जगातील प्रोजेक्ट्स वर काम करता येण्याची शक्यता, वेळेवर येणारा पगार, २-४ वर्षांत सिव्हीचे वाढलेले महत्व, भरपूर काही शिकण्याची संधी, वयाच्या विसाव्या वर्षी यापेक्षा अजून काय हवे आहे?
ज्या फ्रेशरला कसलाही अनुभव नसतो, त्याला शून्यातून सर्व काही शिकवावे लागते अशा उमेदवाराला एक कंपनी संधी देत आहे यातच खूप काही आले. ही गोष्ट केवळ पॅकेजची नसून करियरला मिळणाऱ्या किक स्टार्टची आहे. हे कुठलाही ट्वीटर इनस्टाचा सेलेब सांगणार नाही. जी संधी फार थोड्या लोकांना मिळेल,त्या संधीचे सोने कसे करता येईल याकडे आपण लक्ष दिले पाहिजे.
कॉग्निझंटच काय कुठल्याही कंपनी कडून चालून आलेली ऑफर ही खूप मोठी संधी आहे असेच मी मानतो. ती घेऊन तिथून आपले करियर घडवणे ही आपल्या भविष्यातल्या यशस्वी आयुष्याची पहिली पायरी आहे.