आशुतोष ब्लॉग

आयुष्याची स्पर्धा

माझ्या आयुष्यातले पहिले परितोषक मला गणेशोत्सवात मिळाले होते. आम्ही सिडको मध्ये नवीन रहायला आलो तेव्हा आमच्या घराजवळ लोकमान्य गणेश मंडळ होते. तिथे गणेशोत्सवाचे दहा दिवस भरपूर सारे सांस्कृतिक कार्यक्रम असत. त्यात मी चार पाच वर्षांचा असताना तीन चाकी सायकल चालवण्याची स्पर्धा होती ज्यात मी दूसरा की तिसरा आलो होतो.

मला ही गोष्ट आठवते कारण ती विनोदी आहे. तीन चाकी सायकल स्पर्धेत मी मागून येणाऱ्या दुसऱ्या मुलासाठी बाजूला थांबून त्याला पुढे जाऊ दिलं होतं आणि मी खुद्द तिसरा आलो. त्यावेळी स्पर्धा काय हे माहीत नव्हतं, पण त्या एका घटनेने मला आयुष्यात स्पर्धा काय असते याची शिकवण मिळाली. मुख्य म्हणजे स्पर्धेत आपण जिंकायचं असतं हे कदाचित मी तिथूनच शिकलो असेल.

या स्पर्धेत तिसरा आलो म्हणून पारितोषिक वितरण समारंभ होता, आणि त्यात केवळ गळ्यात घालायचे मेडल मला मिळाले होते. हेच कदाचित आयुष्यात मिळालेले पहिले पारितोषिक. पण त्या गळ्यात घातलेल्या मेडलशी मला काही घेणेदेणे नव्हते, हे मेडल हे एक पारितोषिक आहे, त्याचा गवगवा करायचा हे माझ्या ध्यानीमनी नव्हते कारण त्या गोष्टीची जाणच नव्हती.

आज मी आयुष्याच्या स्पर्धेत अनेक अडचणी, स्पर्धक, अडथळ्यांना तोंड देत चालत असेन. आयुष्य जगण्यासाठी माणसाला न जाणे किती प्रकारच्या स्पर्धा कराव्या लागतात. कुणी बक्कळ पैश्यांच्या स्पर्धेत, कुणी रोजगाराच्या, कुणी एकवेळची भ्रांत मिटवण्याच्या, कुणी लाइक शेयर च्या, कुणी ९ ची लोकल पकडण्याच्या, कुणी अभ्यासाच्या कसल्या आणि किती स्पर्धा माणसाच्या आयुष्यात आहे देव जाणे. पण आपल्या आयुष्याची स्पर्धा ओळखून, तिच्यात भाग घेऊन त्या स्पर्धेलाच आपण सर्वस्व बनवतो. कुणी आयुष्यातली स्पर्धा जिंकतो कुणी मागे राहतो. हरतो केवळ तोच जो या स्पर्धेत भागच घेत नाही.

पृथ्वीवरचा प्रत्येक जीव हा कुठल्या न कुठल्या स्पर्धेचा भाग आहेच. भक्ष्य पकडण्यासाठी वाघ धावतो, तर जीव वाचवण्यासाठी हरिण. प्रत्येक जीवाचा जन्म ते मृत्यू या मध्ये केवळ एक स्पर्धा येत असावी असेच जणू हे रूप. या स्पर्धेनेच जणू हे आयुष्य भरलेलं बहरलेलं आहे.

त्यावेळी लहान असलेला मी स्पर्धा, पारितोषिक या सगळ्या गोष्टींची मला ओळख नसणारच, पण स्पर्धा काय असते या गोष्टीचे बाळकडू तिथेच मिळाले असणार. कारण त्या नंतर झालेल्या आयुष्याच्या कुठल्या स्पर्धेत मी कुणाला साइड देऊन पुढे जाऊ दिल्याचे मला आठवत नाही. 🙂

Exit mobile version