आशुतोष ब्लॉग

आमचा स्वातंत्र्यदिन

काल संध्याकाळी शाळेच्या बाजूने येणे झाले. शाळेचे मैदान चुन्याने रेषा ओढून आखून ठेवलेले होते. झेंड्याचा खांब लावून तयार केला होता. एव्हाना तिथे लेझिम, कवायतीची रंगीत तालिम होऊन गेली असेल. ते आखलेले मैदान,ती रंगीत तालिम ह्यांनीच मला शिस्त शिकवली.

त्या आखलेल्या मैदाना शेजारून जाताना मनात वेगळाच स्वाभिमान होता. एक क्षण मनात येऊन गेले, उद्या सकाळी लवकर उठायचे आहे, पांढरा गणवेश, पांढरे बूट, घालून ७ वाजताच रांगेत उभे राहायचे आहे. मनात ही जी ऊर्जा तयार झाली तीच आमच्या देशभक्तीची निशाणी आहे.

आमचा स्वातंत्र्यदिन,आमचे राष्ट्रप्रेम त्या आखलेल्या मैदानावर गिरवले गेले. त्या सरळ रेषांसारखे रांगेत चालणारे नागरिकत्व आम्हाला शिकवले गेले. पांढऱ्या शुभ्र गणवेशासारखी स्वच्छ, निर्मळ देशभक्ती आमच्यात रुजवली. शाळेतला स्वातंत्र्यदिन हाच खरा स्वातंत्र्यदिन असे माझे ठाम मत आहे.

मी चालत पुढे आलो तशी माझी शाळा दूर गेली, ते आखलेले मैदान लांब गेले. चालत चालत मी पुढे राष्ट्राचा जबाबदार नागरिक कधी झालो हे कळले नाही. एक नागरिक म्हणून मी शिस्तीचे पालन करायची शिकवण, हा देश सर्वप्रथम हा विचार घेऊन मला पुढे चालायचे आहे.

शाळेचे आखलेले मैदान सोडले म्हणजे शिस्त सोडली असे होता कामा नये. गणवेश सुटला म्हणजे राष्ट्रभक्तीची निर्मळता नाहीशी झाली असे होता कामा नये.

आपल्या सर्वांच्याच आयुष्यात कधी ना कधी एक शाळा येऊन गेली, एक आखलेले मैदान येऊन गेले, त्या स्वातंत्र्यदिनासाठी सजलेल्या मैदानाची शिकवण आपण विसरता कामा नये.

शाळेतला तो स्वातंत्र्यदिन, त्याची उत्सुकता, त्यावेळी उत्स्फूर्तपणे येणारे ते देशप्रेम आपल्याला आयुष्यभर पुढे न्यायचे आहे. मैदानाची साथ सोडता सोडता आपले राष्ट्र आपल्यालाच आखायचे आहे, अत्यंत शिस्तीत,एकजूट होऊन, निर्मळ मनाने!

Exit mobile version