आशुतोष ब्लॉग

आपली मराठी ओळख

आपली-ओळख-मराठी

माझ्याकडे तेलंगणाचा क्रमांक असणारी चारचाकी आहे. ती घेऊन मी महाराष्ट्रात भरपूर फिरत असतो. माझी गाडी महाराष्ट्र पोलिसांनी अडवली नाही असं शक्यच नाही. तपासणी चालू असलेला प्रत्येक पॉइंटवर मी हमखास थांबवला जातो. यामुळे माझे आणि अनोळखी पोलिस मामांचे जणू वेगळेच ऋणानुबंध तयार झाले आहेत.

दरवेळी पोलिसांशी बोलल्यावर वेगवेगळे अनुभव येतात. आज पुणे महामार्गाने नाशिक कडे येताना सिन्नरजवळ पोलिसांनी हात दाखवला गेला. मी गाडी बाजूला घेऊन खिडकी खाली केली, एक पोलिस आले. मी नेहमी सारखे “नमस्कार साहेब..” म्हणालो आणि परवान्याचे कार्ड पुढे केले.

तसे ते साहेब हसत हसत म्हणाले “आता तुम्ही मराठीच बोलू लागले म्हटल्यावर काय बघणार..”

“होय साहेब, आम्ही इथलेच..” त्यांनी आरामात जाऊ द्या असा इशारा केला आणि मी मार्गस्थ झालो.

आजवर कित्येकवेळा मला असाच अनुभव आला आहे. कुठलेच कागद न तपासात मी पोलिसांशी मोकळ्या मनाने दोन क्षणांची मैत्री करून निघालो आहे.

आपण मराठी बोलतो हे एक रसायन आहे. केवळ मराठी बोलतो म्हणून आपल्यात आपुलकीची भावना निर्माण होते. अगदी अनोळखी माणूस सुद्धा आपला माणूस वाटू लागतो. आपली भाषा, आपला पेहराव ही आपली ओळख असते. ते एक प्रकारचे आय कार्ड आहे जे आपली ओळख पटवू शकते. ही ओळख आपण जपली पाहिजे. परकीय भाषा बोलून आपणच आपल्या राज्यात पाहुणे तर आपल्याला बनायचे नाहीच.
कर्तृत्वाचे झेंडे रोवायला जगात कुठेही गेलो आणि समोर मराठी माणूस दिसला की तो परकीय राहत नाही.

आपली मराठी असण्याची ओळख जपणं, आणि ती ओळख अभिमानाने दाखवणं हे एक न बोललं गेलेलं रहस्य आहे. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन ते आपल्याला एकत्र बांधून ठेवतं. ही आपली मऱ्हाटी ओळख कधीही पुसायला नको, जगात कुठेही गेलो तरी!

Exit mobile version