काल रात्री जेवायला एका हॉटेलात गेलो होतो. शेजारच्या टेबलवर एक आजोबा आणि त्यांची लाडकी नात येऊन बसले. नात लाडकीच होती, हे त्या आजोबांचे हावभाव पाहून समजत होतं.
नात उड्या मारत मारतच हॉटेलात आली होती. आजोबांनी नातीसाठी एक पावभाजी सांगितली. स्वतः मात्र काहीही न मागवता केवळ नातीच्या ताटातला एक घास घेऊन प्रेमळ पणे तिच्याशी बोलत होते. नात देखील मिटक्या मारत, आनंदाने पावभाजीचा आस्वाद घेत आजोबांशी लाडीक बोलत होती.
का कुणास ठाऊक पण मला कधी कधी भावनिक व्हायला होतं. त्या आजोबा आणि त्यांच्या नातीचे ते प्रेमळ क्षण बघून मला तसेच वाटले. आजोबांचे त्यांच्या नातीवरचे प्रेम, तिच्याशी असलेली मैत्री दिसत होती. ते तिचे लाड पुरवण्यात व्यस्त होते. त्या दोघांकडे बघून मी मात्र विचारात गर्क झालो.
कदाचित, आजोबांच्या नातीने घरी पावभाजी खाण्याचा खूप हट्ट केला असेल. रडारड केली असेल आणि आजोबांना तिचा हट्ट पुरवण्या वाचून पर्याय राहिला नसेल म्हणून ती दोघे इथे आली असावीत.
कदाचित, आजोबांनी आपल्या लाडक्या नातीला पावभाजीचे आश्वासन दिले असेल. तू परीक्षेत चांगले मार्क आणून दाखव मग मी तुला पावभाजी खायला घेऊन जाईन असं म्हणणारा आजोबा नातीला लाभला असेल.
कदाचित, तिची आई रागावली म्हणून रुसून बसलेल्या नातीच्या गालांवर हसू उमटवण्यासाठी आजोबा तिची आवडती पावभाजी खाण्यासाठी घेऊन आले असतील.
कदाचित, लाडकी नात बरेच दिवसांनी दिवाळीच्या सुट्टी आजोबांच्या गावाला आली म्हणून तिचे लाड पुरवायला आजोबा तिला पावभाजी खाण्यासाठी घेऊन आले असतील.
अशा अनेक ‘कदाचित’ विचारांच्या गर्दीत मी हरवलो होतो तोवर ती लाडकी नात तिच्या प्रेमळ आजोबांचा हात धरून, उड्या मारत आनंदात निघून गेली होती. आजोबा आणि नातीच्या प्रेमळ नात्याचे ते चित्र मी एक त्रयस्थ म्हणून अनुभवलं.
एका पावभाजीच्या निमित्ताने ते आजोबा त्यांच्या नातीवर किती जीव लावतात याची त्यांना जाणीव होत नसेल. त्या नातीच्या अजाणत्या मनाला आपल्या आजोबांच्या प्रेमाची त्याक्षणी जाणीव होत नसेल. एक त्रयस्थ म्हणून, चोरट्या नजरेने का होईना मी मात्र आजोबा आणि नातीमधल्या आदरयुक्त, प्रेमळ, जीव लावणाऱ्या एका निर्भेळ नात्याचा पूर्ण अनुभव घेतला होता.
त्या दोन अज्ञात व्यक्ती त्यांच्या आयुष्यातला खूप सुखाचा क्षण त्यांच्याही नकळत ते माझ्यासमोर जगले होते. त्यांनी जणू काही भविष्यात लागणाऱ्या आठवणीरूपी परताव्यासाठी एका छोट्या क्षणाची गुंतवणूक आज करून ठेवली होती.
तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात एक तरी असा लाड पुरवणारा आजा, आजोबा असणार ज्याने कुठल्याही परताव्याची अपेक्षा न करता आपल्या नातवंडांच्या आयुष्यात लडिवाळ प्रेमाची गुंतवणूक केलेली असेल, जी तुम्हाला आयुष्यभर पुरून उरेल.