आशुतोष ब्लॉग

सायबर गुन्हे आणि मानवी भावना

सायबर गुन्हे आणि मानवी भावना

सायबर गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. फ्रॉड करणारे रोज नवीन क्लृप्त्या लढवून लोकांचे पैसे पळवतात आणि या घटना वाढतच आहे. कधी विचार केला आहे का, की हे सायबर गुन्हेगार आपल्या मानवी भावनांचा, विचार करण्याच्या पद्धतीचा आधार घेऊन आपल्याला फसवतात? आर्थिक सायबर गुन्ह्यांना बळी पडताना एखाद्याच्या डोक्यात काय विचार येत असतील. फसवणूक होत असताना माणसाला स्वतःला का लक्षात येत नसेल याचा विचार मी करत होतो.

या सायबर चोरट्यांची काही मोडस ऑपरेंडी असावी ज्यातून त्यांना नवनवीन सावज मिळतच राहतात. नवीन सावज शोधताना गुन्हेगार नेमकी कोणती गोष्ट हेरतात याचा मी विचार करत होतो. त्यासाठी मी काही महिन्यांपासून वर्तमानपत्रांतील बातम्यांवर नियमित लक्ष ठेवले. या बातम्यांत दिलेले तपशील नोंद केले आणि त्यातून काही निष्कर्ष काढले. 

सायबर गुन्ह्यांना जेव्हा सुरुवात झाली तेव्हा छोट्या किमतीचे फसवे युपीआय व्यवहार करून, ओटीपी मागवून लोकांची लुबाडणूक केली जात होती. हातातील फोन आणि युपीआय कसे वापरावे याची फारशी जाण नसलेले लोक अशा स्कॅमला बळी पडत. ओटीपी कुणालाही सांगायचा नाही हा धडा बहुतेक लोकांपर्यंत पोचला तसे या प्रकारचे स्कॅम हळू हळू कमी होत गेले. ओटीपी – ओटीपी खेळणं अवघड झालं तसं सायबर गुन्हेगारांनी आपल्या मोर्चाची दिशा बदलली.

मी ज्या बातम्या गोळा केल्या त्यातील बळी पडलेले लोक सर्व उच्च शिक्षित आहेत असे दिसून येते. यात त्यांनी गमावलेली रक्कम देखील हजारांत नाही, तर लाख आणि कोटींच्या घरात आहेत, म्हणजे मोठ्या रकमांचे व्यवहार करण्याची क्षमता असलेले हे सधन लोक आहेत. या सायबर गुन्ह्यांत फसवणूक केवळ तांत्रिक गोंधळ उडवून केलेली नाही, तर बळी पडलेल्या व्यक्ती स्वतःहून पैसे देऊन त्यात अडकल्या आहेत. यावरून फसलेला माणूस कोणत्या तरी इतर कारणाने त्यात ओढला जातो हे नक्की. ती गोष्ट म्हणजे मानवी भावना, स्वभाव किंवा एखाद्याची विचार करण्याची पद्धत. 

सध्या होत असलेले गुन्हे हे आंतरजालाद्वारे, संकेतस्थळे, चॅटिंग अनुप्रयोग वापरून केले जात असल्यामुळे त्याला सायबर गुन्हा म्हटले जाते, पण हीच फसवणूक इतर मार्गांनी करणे देखील शक्य आहे. आंतरजालाची सुविधा नसती तर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे हे प्रत्यक्षच केले जात होतो. त्यामुळे तिथे देखील मानवी भावनांचा दुरुपयोग केला जात होताच. एखाद्या गोष्टीचे आकर्षण निर्माण करून, एखादे वेळी भीती दाखवून, लालसा तयार करून फसवणूक केली जाते त्यामुळे आपल्या भावना, विचार करण्याची शक्ती यात वापरली जाते. हीच गोष्ट आता काही उदाहरणे घेऊन आपण पाहूया. 

पुढे वापरलेली उदाहरणे ही दिव्य मराठी वर्तमानपत्रातून घेतली आहेत आणि संदर्भ म्हणून मी वापर केला आहे. अनेक उदाहरणांचे संदर्भ कात्रण स्वरूपात नाहीत तिथे मी ते दिलेले नाहीत. 

सायबर गुन्हे आणि माणसाची लालसा

सायबर गुन्हा आणि मानवी भावना यांचा संबंध असावा असा विचार माझ्या डोक्यात आला तो जळगावच्या एका बातमीवरून. या नोंदी घेण्याची सुरुवातच मी ही बातमी वाचून केली. बातमी देखील तशी विशेष आणि लक्ष वेधून घेणारी होती. जळगावात सायबर सुरक्षा विषयाचे धडे देणाऱ्या एका प्राध्यापिकेलाच सायबर चोरांनी फसवलं. ही बातमी वाचून माझ्या मनात कुतुहूल निर्माण झाले, की या घटनेत चोरांनी अशी काय करामत दाखवली की सायबर जागृती करणाऱ्या व्यक्तीलाच फसवलं. पूर्ण बातमी वाचली तर लक्षात येईल की यात कुठेही ओटीपी, मालवेअर किंवा तत्सम हॅकिंगचा प्रकार झालेला नसून चोरांनी बळी पडलेल्या प्राध्यापिकेच्या मनात बख्खळ पैसे कमावण्याची लालसा निर्माण केली होती.

थोडे अधिक पैसे मिळावेत असा लोभ कुणालाही असू शकतो आणि नेमकं हेच हेरून ती लालसा पूर्ण होऊ शकते याचं आमिष दाखवलं गेलं. हे उदाहरण एक विशेष असलं तरी याच पटीत अनेक उदाहरणे मला वर्तमानपत्रांतून मिळाली. शेअर ट्रेडिंग मधून माणूस कमी कालावधीत मालामाल होऊ शकतो असा समज (गैर-समज) अनेकांना असतो, आणि त्याच शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने झटपट श्रीमंत होण्याची लालसा खूप सहज खपवली जात आहे. केवळ एकाच महिन्यात अशी २२ उदाहरणे मला वर्तमानपत्रात मिळाली. यातून हा शेअर मार्केट मध्ये झटपट श्रीमंत होण्याच्या लालसेला अनेक जण सहज बळी पडत आहेत हे स्पष्ट होतं.

सायबर गुन्हे आणि माणसाच्या मनातील लालसा

त्यातील काही उदाहरणे मी इथे देतो. यातील उल्लेखनीय बाब म्हणजे त्यात नागरिकांनी गमावलेल्या पैश्यांचा आकडा आणि फसवल्या गेलेल्या उच्च शिक्षित व्यक्ती!

देहादीक प्रपंच हा चिंतियेला।
परी अंतरी लोभ निश्चित ठेला॥
सायबर गुन्हे शेयर ट्रेडिंग

मी हा लेख लिहून पूर्ण करत असतानाच एक सविस्तर बातमी आली आहे, “पुण्यात शेअर ट्रेडिंगच्या नादात दररोज नागरिक गमावतात ५० लाख”. या बातमी मध्ये गेल्या वर्षभराची आकडेवारीच प्रसिद्ध केली आहे. 

सायबर गुन्हे आणि माणसाला वाटणारी भीती 

सायबर गुन्हेगारांचे दुसरे शस्त्र म्हणजे समोरच्याचा मनात भीती निर्माण करणे. लालसा निर्माण करण्या नंतर सोपे अस्त्र माणसाला वाटणारा भीती! काहीतरी घटना झाली आहे आणि तिच्यामुळे आपण अडचणीत येऊ असा बनाव तयार करायचा, त्या अडचणीतून बाहेर पडण्याचा एक सोपा मार्ग पैसे दिल्याने आहे असे सांगायचे. हे समोरच्याला पटवून देण्यासाठी केवळ एक नाही तर अनेक जण मिळून बनाव रचला जातो. शेअर ट्रेडिंगच्या नंतर सध्या जोमात असलेला फसवणुकीचा प्रकार म्हणजे ड्रग रॅकेट मध्ये अडकवण्याची भीती घालणे.

अनेक जणांना फोन येतो, तुमच्या पत्त्यावर जाणारे पार्सल विमानतळावर आले आहे आणि कस्टम्सला त्यात ड्रग्स सापडले आहेत त्यामुळे तुमच्यावर गुन्हा नोंद होणार आहे अशी कहाणी कथन केली जाते. सोबत दोन, तीन वेगवेगळ्या व्यक्ती अधिकारी असल्याचे सांगून ही घटना खरी असल्याचे भासवतात आणि त्यातून सुटका होण्यासाठी दंड म्हणून काही हजार अथवा लाख रुपयांची मागणी करतात. हे प्रकार मुख्यतः वृद्ध व्यक्ती, निमशहरी, अथवा ग्रामीण भागातील व्यक्तींना ओळखून केले जातात. फोन, व्हिडियो कॉल करून नागरिकाच्या मनात भीती निर्माण केली जाते. आपल्यावर कारवाई होईल, आपण गुन्ह्यात अडकू, पोलीस पकडतील असा समज होऊन माणूस यात फसवला जातो. 

सायबर गुन्हे ड्रग्ज स्कॅम
सायबर गुन्हे ड्रग्ज स्कॅम
सायबर गुन्हे ड्रग्ज स्कॅम

याच संदर्भात थोडी वेगळी घटना मी वाचली होती, नाशिकची. त्या बातमीचा संदर्भ माझ्याकडे नाही, पण ती ऑनलाईन वाचली होती. नाशिकच्या एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना एकाच दिवशी फोन करून सायबर चोरांनी, तुमचा पाल्य मारामारी करत असताना किंवा शाळेजवळ नशा करत असताना ड्रग्ज सोबत पकडला गेला असल्याची बतावणी केली. त्याला अटक करून पोलीस ठाण्यात आणले असून, पैसे दिले तर मॅनेज करू, मुलाला सोडून देऊ अशी कथा रंगवली गेली होती. त्यातील केवळ एका महिलेचे काही हजार रुपये इतकीच फसवणूक झाली होती. एकाच वेळी एकाच शाळेतील अनेक पालकांना फोन गेले होते हे विशेष.

सायबर गुन्हे आणि मनात निर्माण होणारी चिंता 

एखाद्याची फसवणूक होण्यासाठी लागू होत असलेले तिसरे कारण म्हणजे चिंता. हा तसा जुना प्रकार आहे. वर उल्लेखलेल्या भीती या भावनेशी मिळता जुळता. भीती दाखवून फसवणूक आणि चिंता निर्माण करून फसवणूक यात फरक इतकाच आहे की, या प्रकारात अगदीच गुन्ह्यात अडकण्याची भीती घातली जात नाही, तर केवळ तुम्ही पैसे दिले नाहीत तर तुमचे काम अडकून पडेल अशा आशयाचे संभाषण केले जाते. एटीएम कार्ड बंद पडेल, त्यासाठी ओटीपी द्या हा जुना फंडा सायबर चोर वापरतात. यात एटीएम कार्ड बंद होऊ शकते याची चिंता निर्माण झाल्याने माणूस त्या कथेला भुलतो आणि फसवणुकीला बळी पडतो. 

या प्रकारची अनेक उदाहरणे आहेत, तुमचे सिम कार्ड बंद पडेल, बँक खाते बंद पडेल, विद्युत जोडणी आणि मीटर काढले जाईल, पाण्याची जोडणी तोडली जाईल अशा काही कहाण्या तयार करून अनेकांची फसवणूक केली जाते.

सायबर गुन्हे आणि तरुणाईला असणारे आकर्षण

हा विशेषतः तरुण पिढीला शिकार बनवतानाचा प्रकार आहे. चकचकीत गोष्टींचे आकर्षण कुणाला नसते, आणि आकर्षण असणे ही अगदी सामान्य भावना आहे. तरुण मुलांतील याच भावनेला हेरून आर्थिक फसवणूक सर्रास केली जाते. विशेषतः, इंस्टाग्राम, टेलिग्राम, फेसबुक अशा माध्यमातून तरुणांना संपर्क करून तरुण मुले भुलतील अशा गोष्टींकडे आकर्षित करून त्यांना लुबाडणे हे देखील सर्रास चालते. एखाद्या तरुणी सोबत मैत्री, मॉडेल सोबत अश्लील व्हिडियो कॉल, चॅटिंग इत्यादी गोष्टींचे प्रलोभन दाखवून त्या करीत छोटी मोठी करत पैश्यांची मागणी करणे हे प्रकार अनेक तरुणांसोबत घडले आहेतच. 

अनेकांना इंस्टाग्रामवर प्रसिद्ध होण्याचं स्वप्न असतं त्याकरिता फॉलोअर्स मिळवून देण्याची बतावणी करणं, रिल्स किंवा पोस्ट वायरल करण्याचं अमिश दाखवणं अशा स्कीम देखील तरुणांच्या माथी मारल्या जातात आणि त्यातून बरेच पैसे उकळल्या जातात. काही वर्षांपूर्वी मी एक घटना जवळून पाहिली होती, ती म्हणजे माझ्या एका मित्राला हॅकिंग कशी करायची, फेसबुकच नाही तर बँक अकाउंट कसे हॅक करायचे याचं प्रशिक्षण देतो असे सांगून दोन हजार रुपये उकळले होते. हॅकिंग करणारा स्वतः बँक खाते हॅक करून पैसे न कमवता लोकांकडून दोन दोन हजार रुपये का घेत होता हे आजवर न उलगडलेलं कोडं आहे.!

तात्पर्य

हा छोटासा प्रयोग होता ज्यात सायबर गुन्ह्यात फसवले जात असताना मानवी भावनांचा काही उपयोग केला जातो का हे तपासून पाहायचे होते. लोभ, भीती, चिंता, आकर्षण अशा काही मानवी भावना आहेत ज्यांच्या आधाराने एखाद्या व्यक्तीला फसवणे शक्य आहे हे काही उदाहरणे पाहून आपण सांगू शकतोच. या व्यक्तिरिक्त कुतूहल, शंका अशा काही भावना आहेत ज्याद्वारे फसवणूक केल्याची उदाहरणे मिळातात. तसे एक उदाहरण द्यायचे झाले म्हणजे, अयोध्येतील राम मंदिर सोहळा होण्याच्या पार्श्वभूमीवर राम भक्तांना प्रसाद वाटप, मंदिर देणगी अशी कारणे सांगून खोट्या संकेतस्थळांवरून देणग्या जमवल्या गेल्या होता.

हा अभ्यास करण्यामागचे एकच उद्दिष्ट होते, की तांत्रिक चुकांव्यक्तिरिक्त एखाद्या माणसाचा स्वभाव, मनात येणारी एखाद्या भावनेचा वापर करून एखाद्याला फसवले जाऊ शकते का हे तपासणे. सायबर सुरक्षेत हॅकिंग होऊ नये म्हणून जागृती कार्यक्रम आम्ही घेतोच, पण हे कार्यक्रम मुख्यत्वे तांत्रिक गोष्टी कशा हाताळाव्यात यांचे मार्गदर्शन करतात. जसे ओटीपी कुणालाही देऊ नका, पासवर्ड कसा ठेवावा, माहिती गोपनीय कशी ठेवावी अशा संदर्भातले मार्गदर्शन केले जाते. पण वरील उदाहरणे पाहता तांत्रिक चुकांच्या तुलनेत आपल्या मनावर नियंत्रण न ठेवल्याने खूप जास्त लोक सायबर गुन्ह्यांना बळी पडले आहेत. आयटी, विज्ञान, मेडिकल असे उच्च शिक्षण घेतलेल्या व्यक्ती बळी पडल्या आहेत. त्यामुळे तांत्रिक ज्ञानाच्या जागृती बरोबरच भावनिक गोष्टींकडे लक्ष देणेही गरजेचे आहे. 

सायबर सुरक्षेसाठी फायरवॉल, अँटी व्हायरस सारखे खूप मोठे तंत्रज्ञान वापरले जाते पण शेवटी आपणच स्वतःहून पैसे देऊन फसवणुकीच्या चक्रव्यूहात अडकणार असलो तर?

अती मूढ त्या दृढ बुद्धि असेना।
अती काम त्या राम चित्ती वसेना॥
अती लोभ त्या क्षोभ होइल जाणा।
अती वीषयी सर्वदा दैन्यवाणा॥
Exit mobile version