छत्रपती संभाजीनगर: जर तुम्हाला कुणीही अनोळखी व्यक्ती भेटली आणि तुम्हाला वेळ घालवण्यासाठी चर्चा करायची असेल तर एक हमखास विषय म्हणजे संभाजीनगरचा पाणीप्रश्न! कधीही, कुठेही, कुणाहीसोबत या विषयावर सहज चर्चा करू शकता. तुम्ही हॉटेलात, ऑफिसात, बागेत, स्मशानात कुठेही असा. तुमच्या सोबत म्हातारे आजोबा, तरुण मुले, एखाद्या काकू कुणीही असू देत. तुम्ही फक्त एवढाच शब्द काढायचा आहे, “तुमच्या कडे पाणी किती दिवसाला येते?” आणि पुढे तासभर तरी या विषयावर चर्चा आरामात रंगतात.
हा विषय संभाजीनगर करांच्या अगदी मनातला, प्रत्येकाच्या घरातला, आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे कुणीही या विषयावर गप्पा मारायला तयार असतोच. एव्हाना हातातले काम सोडून दोन मिनिटे काढून का होईना पण संभाजीनगरचा माणूस या विषयात उडी घेतोच. या विषयावर आपले मत नसणारा संभाजीनगरकर शोधून देखील सापडणार नाही. प्रत्येकाने या विषयाचा भरपूर अभ्यास केलेला असतोच. पाणीप्रश्न कसे सुटू शकतात या विषयावर जगात कुणाला मार्गदर्शनाची गरज असेल तर त्यासाठी संभाजीनगर हे एका विद्यापीठासारखे आहे. इथे ज्ञानाची काहीही कमी नाही.
तुम्ही संभाजीनगर मध्ये असाल तर तुम्हाला काही गोष्टींची अद्ययावत आणि किमान आकडेवारी कायम जवळ ठेवावी लागते. जसे की, यावर्षी जायकवाडी किती टक्के भरले, आज पाईपलाईन कुठे फुटली, सातारा-बीड बायपासला नळ कनेक्शन कधी देणार आहेत, वगैरे वगैरे…
येता जाता तुम्हाला काही गणिते देखील सोडवावी लागू शकतील. एखाद्या भागात x तारखेला पाणी आले असेल आणि y दिवस आधी z KM दूरच्या भागात पाईपलाईन फुटली असेल तर नळाला पाणी येण्याची पुढची तारीख कोणती या सारखी गणितं तुम्हाला फटाफट सोडवता आली पाहिजेत. केवळ गणित चांगले असून उपयोग नाही. तुम्हाला इतिहासाची जाण असणे देखील महत्वाचे आहे. समांतर पाईपलाईनचा विषय किती काळापासून आहे आणि त्या दरम्यान घडलेल्या घटना कोणत्या. किंवा मलिक अंबरची पाईपलाईन आताच्या पाईपलाईन पेक्षा कशी चांगली असे दर्जेदार विषय हाताळता आले पाहिजेत.
संभाजीनगर मध्ये पाणीप्रश्न हा विषय काही कालचा, आजचा आणि उद्याचा नाही. हा विषय स्थावर आहे. अनादी काळापासून, कित्येक शेकडो वर्षे जुना आहे. कारण पाचशे वर्ष आधी देखील इथे पाणीप्रश्न होता म्हणूनच तर मलिक अंबराने नहरी बनवल्या ना. या नहरी त्या वेळच्या पाणीप्रश्नाची साक्ष आहेत. येणाऱ्या पुढच्या काही शेकडो वर्षांनी जलवाहिनीचे अवशेष सापडून त्यावेळच्या इतिहासात याची नोंद होणार आहे हे लक्षात घ्या. त्यावेळची लेकरं परीक्षेत जलवाहिनीच्या प्रवासात फारोळा पंप हाऊसचे महत्व अशा विषयांवर सविस्तर उत्तरे लिहिणार आहेत. त्यामुळे हा विषय असाच सोडून चालणार नाही.
सांगायचा मुद्दा, संभाजीनगरचा पाणीप्रश्न हा अगदी सहज सोपा वाटत असला तरी तो दिसतो तितका साधा नाही. हा विषय जायकवाडी धरणासारखा महाकाय आहे. हा विषय ५३ किमी जलवाहिनी सारखा लांब जाणारा आहे. एक चर्चा सुरु झाली म्हणजे आपोआप याला अनेक “समांतर” चर्चा सुरु होतील इतका त्याचा व्याप आहे. एखाद्या सकाळी झोपेतून उठलो आणि आजपासून पाणीप्रश्न पूर्णतः मिटला अशी बातमी वाचली तर आम्ही संभाजीनगर करांना त्या दिवसापासून अजिबात करमणार नाही. असे गहन विषय चर्चेतून बाद होऊ नयेत म्हणूनच कदाचित महापालिका आणि सरकार हा प्रश्न कायम ठेवते. तुम्ही संभाजीनगर मध्ये असाल तर प्रलंबित पाणीप्रश्ना शिवाय गत्यंतर नाही. आणि या पाणीप्रश्नाचे कुणाकडेही उत्तर नाही.
पर्यटनाची राजधानी, युनेस्को हेरिटेज असलेले शहर, उद्योगांची पंढरी, एका दिवसात दीडशे मर्सिडीज, आशिया खंडातील सर्वात वेगाने वाढलेले शहर या सगळ्या बिरुदांना आठ दिवसांनी नळाला येणारे पाणी हे एकमेव उत्तर आहे!