निसर्गाचं एक वैशिष्ट्य आहे,निसर्गनिर्मित प्रत्येक गोष्टीला अनेक छटा असतात,म्हणजे आपण निसर्गाकडे पाहू त्या नजरेने निसर्ग आपल्याला वेगळा दिसतो,आपण हवा तो अर्थ त्या निसर्गातल्या गोष्टींचा अन हालचालींचा काढू शकतो, आता जून महिना म्हटलं की विषय निघतोच त्या पावसाचंच पहा ना, तो पाऊस म्हणजे आभाळातून पडणारं ते पाणी,पाणी तेच,आकाश तेच,पाण्याची दिशा तीच पण त्या पावसाचे अर्थ मात्र नानाविध.
आता माणूस हा मतलबी वैशिष्ट्याचा बिनशेपट्या प्राणी,त्याला आपल्या मतलबाने गोष्टींचे अर्थ काढायची सवय. एखादा भोळा आस्तिक असतो जो त्या पावसाला वरूणदेव म्हणून त्याची पूजा करायला तयार, पाऊस पडावा म्हणून यज्ञयागादी करणारे आस्तिक एकीकडे, तर हा सगळा विज्ञानाचा खेळ, सगळी फिजिक्स आणि केमिस्ट्रीची थेरं मांडून ह्यात काय देव बिव नाय म्हणणारी विज्ञानयागी डोकी एकीकडं.
एकीकडे बारकी पोरं, सांग सांग भोलानाथच्या नादी लागून उगाच शाळेभोवती तळे साचून दांड्या मारण्याच्या आशेवर राहतात त्यांचा पाऊसच वेगळा,आम्ही ऑफीसवाले सुद्धा कचेरीबाहेर तळे साचण्याच्या आशेवर आहोत,पण सध्या Work From Home ची सोय आधीच करून दिली असल्यानं त्याच पावसाचं पाणी आमच्या आशेवर फिरतं. येरे येरे पावसा,तुला देतो पैसा म्हणून लहान कारट्यांना उगाच पावसाला “पेढा देऊन येडा बनवायची” जाम मजा वाटते.
पाऊस म्हटला की फुलणारी हिरवळ,बहरलेला निसर्ग आठवणारी मंडळी एकीकडे, अन पाऊस म्हटला की ‘काय तो चिखल आणि काय ती गीचगीच’ म्हणून कपाळी आठयांचे डोंगर उभी करणारी मंडळी एकीकडे, अर्थात पाऊस तोच मात्र आपले चष्मे तेवढे वेगळे. कुणी पावसात साचलेल्या पाण्यातून वेगाने गाडी दामटतो तर कुणी तेच उडालेले पाणी अंगावर येऊ नये म्हणून त्यापासून दूर पळू पाहतो.
पावसात कुणाला छत्री सांभाळायचं ओझं वाटतं तर कुणी मुद्दाम छत्री विसरून पावसात मनसोक्त भिजण्याची स्वप्नं पाहतो. पाऊस आला की पावसाचे हंगामी कवी उगवतात अन पाऊस झाला की दुःखाचे डोंगर मांडून रडक्या कथा सांगणारे सुद्धा उगवतात. पावसाने काय कॉलेजात पोरा पोरींच्या प्रेमाची सेटिंग लावण्याचा किंवा मोडण्याचा ठेका घेतलेला नसला तरी काहींना अचानक पावसात प्रेमाचे रंग चढतात काहींचे पावसात प्रेमभंग दिसतात.
शेतकऱ्याला पाऊस नक्कीच सुखावतो तर तिकडे पावसाचं पाणी साचून ट्राफिक जाम मध्ये अडकलेला शहरातला नागरिक मात्र त्रस्त होतो. मुंबईतले चाकरमानी पावसाळ्यात लोकल रेल्वेच्या खोळंब्यावर नेमके रेल्वे बोर्डाला शिव्या घालत असावेत की पावसाला हा एक मोठा प्रश्न मनात येऊन गेला,त्याचं उत्तर तो मुंबईचा समुद्री पाऊस आणि ते मुंबईकर जाणोत.
माणसाने आयुष्य जगावं तर ह्या पावसासारखं! हवं तेव्हा कोसळावं, हवं तेव्हा थांबावं, मनाला वाटलं तर खूप जोरदार वादळी अन आक्रमक व्हावं नाही तर खूप शांत,हलकं अन स्थीरच रहावं. असं मनसोक्त बरसता बरसता अनेकांची धांदल उडवावी, काहींना सुखद धक्के द्यावे,कुणाला चिडवावे, कुणाला रडवावे.
तापणाऱ्या उन्हाळ्याच्या उष्णतेत अचानक अंधारून येऊन गारवा तयार करणारा पाउस सुखावातोच, सोबत त्याची आस लावून बसणाऱ्या धरणीमातेच्या लेकराला,शेतकऱ्याला तर आनंदाने नाचायला लावतो. पृथ्वीवरचे अन्नचक्र चालवतो, शिशिराच्या पानगळीने उजाडलेल्या झाडांना अचानक बहर आणतो.
पाउस आला की सर्वत्र कशी जादूची कांडी फिरावी असं अचानक बदल दिसतो. कवींना कविता,कुणाला चारोळ्या, लहानग्या पोरांना भोलानाथ आणि अचानक सुट्टी मिळण्याचे स्वप्न आठवू लागतात. रेनकोट, छत्रीवाले रस्त्याने दिसू लागतात,फुटपाथच्या कडेला मक्याची कणसं कोळश्यावर गरम होऊ लागतात. चहावाल्यांचा चहा जरा जास्तच विकला जात असेल नाही?
पाउस म्हणाल तर अनेक गोष्टी घडवतो, अनेक गोष्टींना गती देतो, म्हणाल तर वेगाने सदानकदा धावत्या शहरांना अचानक मंद करतो. पाउस तसा रंगीत पहिला तर इंद्रदेवाचे रंगीत धनुष्य फुलवणारा,पहिला तर सर्वत्र काळोख दाटवणारा.पाउस तो एकच आहे, त्याची रूपं तेवढी अनेक आहेत, असंख्य आहेत. आपण आपले चष्मे चढवावेत, पडणाऱ्या पावसाचा आपल्याला हवा तो अर्थ लावावा. ज्याला ज्याला जे हवं ते ते देणारा हा पाउस..!