ट्विटरवर इडलीवाला अण्णा हे नाव मी अगदी सहज घेतले होते. काही वर्ष आधी, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांनुसार आपले नाव ट्विटरवर लावायचे एक फॅड आले होते. प्रत्येकजण आलेला चित्रपट, एखादे पात्र, राजकीय घडामोडी, कुणी एखादा छंद या नुसार आपली नावे लावत होता. त्यावेळी मी देखील हे इडलीवाला अण्णा हे नाव घेतले. इडली हा माझा सर्वात आवडीचा खाद्य पदार्थ हे पहिले कारण. मी कधीही, कुठेही, कोणत्याही वेळी इडली आवडीने खाऊ शकतो.
मी भाग्यनगरला नवीन नोकरी करू लागलो तिथे रोज सकाळी नाष्ट्याला इडली खात असे. आवडीचा पदार्थ आणि दहा रुपयांत मुबलक मिळतो मग त्यावर ताव मारणारच. भाग्यनगरला रस्त्यावर एक लुना, त्यावर चार डब्बे ठेऊन इडलीवाले उभे राहतात. हाच अनेकांचा नाश्ता असतो. मी ऑफिस समोर अशाच इडलीवाल्या अण्णा कडे बरेचवेळा इडली खात होतो. तो माणूस सकाळी चेहऱ्यावर कसलेही दुःख किंवा सुख नसल्यागत निर्विकार भावनेने मन लावून इडल्या विकत होता.
रोजच्या गिऱ्हाईकाला ‘गुड मॉर्निंग सार’ वगैरे गोड बोलून फटाफट प्लेट लावायचा, कुणालाही एक क्षण उशीर होणार नाही याची काळजी त्याला असायची. काही कमी जास्त झाले तर ‘सॉरी सार..’ म्हणून कमीपणा घेऊन काम चालू ठेवायचा. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र कधीही बदलले मी पाहिले नाही.
समोरचा माणूस लहान आहे किंवा मोठा याचा त्याला फरक पडला नाही. प्रत्येकालाच आपले “सार…” म्हटले की त्याचे काम झाले. समोरचा माणूस राव आहे की रंक याच्याशी त्याला काहीही घेणेदेणे नव्हते. एका दिवशी धो धो पाऊस पडत होता आणि हा आपली एक रंगीत छत्री घेऊन पावसात उभा. तसा तो उन्हाळ्याच्या गर्मीत, थंडीत कधीही त्याचा नेम चुकला नाही. सण असो वा सुट्टी, तो प्रत्येकच सकाळी मला त्याच्या ठरलेल्या जागेवर दिसायचा. त्याच्या कामात कधीच खंड पडला नाही.
जवळपास एक वर्ष मी त्याच्या गाडीवर अधून मधून इडली खाल्ली. त्याने मला इडली ऐवजी दुसरं काही खाऊन पहा म्हणून विनंती केली होती, मला एक दोन वेळा त्याच्या कुणीतरी नातेवाईकाला नोकरी मिळते का म्हणून पण विचारले. केवळ इडली खाण्यापुरता माझा त्याचा संबंध यायचा.
अधून मधून ज्याच्या गाडीवर आपण इडली खातो त्याचे नुलैत निरीक्षण मी केले होते. प्रत्येक जण येतो इडली खातो आणि आपल्या कामावर मार्गस्थ होतो पण हा मनुष्य आहे तसाच जागेवर उभा. याला कुठेही जायचे नाही, आकाशाला गवसणी घालायची नाही की स्वप्ने पूर्ण करण्यासाठी धावायचे नाही.
त्या इडली विकणाऱ्या माणसाबद्दल मी माझेच तर्क लावून मनात पात्र उभे केले होते. त्या पात्राला जगाशी काही घेणे देणे नव्हते, त्याला अहंकार-गर्व, जात-धर्म, स्वप्न-इच्छा, ध्येय-साध्य अशा काहीही जटिल गुंतागुंतीच्या गोष्टी नव्हत्या. अगदी निर्विकार चेहऱ्याने ग्राहकाच्या कागदी पत्रावळीत इडली,वडा नाहीतर डोसा घालणे, त्याला पाण्याचे पाऊच देणे, यापुढे त्याचे जग संपलेले असे माझ्या पात्राचे आयुष्य होते. जगाच्या रहाटगाड्याशी काही घेणेदेणे नसलेला केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलेल्या त्याच काल्पनिक पात्राचे नाव “इडलीवाला अण्णा” मी ठेवले. तेच नाव मी ट्विटरवर दिले आणि आजही तेच ठेवले आहे.