सर्व्हर

सर्व्हर – म्हणजे जो सर्व्ह करतो तो सर्व्हर,कधीही रिक्वेस्ट आली की डाटा सर्व्ह करायचं काम ज्याकडे असतो तो सर्व्हर,
आता सर्व्हर म्हणजे ते मशीन जे अहोरात्र, न थकता,न थांबता चालुच असतं,अगदी दिवसाचे चोविस तास,आठवड्याचे सातही दिवस,अगदी वर्षभर,आयुष्यभर,जो पर्यंत चालण्याची शक्ती आहे तोपर्यंत फक्त चालुच रहायचं अन आलेल्या रिक्वेस्ट ला प्रतिसाद देउन त्यांना हवा तो डाटा हवा तेव्हा देत रहायचं,

उन असो,वारा असो,थंडी असो,गरमी असो,दिवस असो,रात्र असो,सुटी असो,रविवार असो सोमवार,राहू चा काळ असो,गुरू बल असो, शुभ असो अशुभ असो, आमावस्या असो पौर्णिमा असो, या सर्व्हर ला अंत नाही,उसंत नाही, याचा आपला एकच ‘धर्म’ तो म्हणजे सदान कदा चालु रहायचं अन दिलेलं काम सर्व्ह करायचं,कसली अपेक्षा नाही,राग नाही,लोभ नाही,आनंद नाही, दुःख नाही,बस् आपलं सर्व्ह करण्याचं चं कर्म करत आपला धर्म पाळत राहायचं…

एरर आला तरी तात्पुरतं अडखळतो,खूप रिक्वेस्ट आल्या तर हळू होतो,कदाचित काही वेळ बंद पडतो,पण पुन्हा सुरू होतो अन पुन्हा तेच न थांबता, न थकता,सदा सर्वदा सर्व्ह करतो,

माणसाचं ही असंच आहे,अरे धर्म धर्म म्हणजे काय,तर देवानं दिलेलं कर्म सदा सर्वदा, न थकता करतच राहणं म्हणजे धर्म,
सर्व्ह करता करता वेळ बदलेल,परिस्थिती बदलेल,कधी अवघड काळ येईल,कधी सुख येईल,कधी सोबती साथ सोडून जातील,पण तरीही बिचकत अडखळ,धडपडत का होईना त्या कर्माला सर्व्ह करणं हाच माणसाचा धर्म,

प्रत्येकाचा सर्व्ह करण्याचा धर्म त्याने ठरवला,
विद्या मिळवणे हा विद्यार्थ्याचा धर्म,
ज्ञान देणे शिक्षकाचा धर्म,
रोग्याची सेवा डॉक्टराचा धर्म,
राष्ट्राचं रक्षण हा सैनिकाचा धर्म,
राष्ट्राचा विकास हा अभियंत्याचा धर्म,
जनतेची सेवा सरकारचा धर्म,

सदान कदा आपला धर्म पाळणं,कसल्या फळाची अपेक्षा न करता आपल्याला दिलेलं कर्म,करतच राहणं,हेच तर आयुष्याचं गुपीत कृष्ण सांगुन गेला,डाटा चांगला की वाईट,कमी की जास्त याचा विचार सोडून तो सर्व्ह करायचं कर्म करणं हाच धर्म

अन हा सर्व्हर जर कायमचा थांबला तर???

कायमचा थांबला तर उरतं ते चौकोनी आकाराचं खोकं,पण त्याला आता सर्व्हर म्हणत नाहीत, कारण तो आता सर्व्ह करत नाही,पण त्याच जागी तसंच दुसरं एक खोकं बसवुन त्याला आता तेच सर्व्ह करण्याचं कर्म दिल्या जातं,कारण हा धर्म काही केल्या थांबणार नाही,खोकी बदलतील पण सर्व्हर चालुच राहील,हा धर्म चालुच राहील,अखंड,अव्याहत,न थकता,न थांबता….

-आशुतोष

ह्या पोस्ट देखील आपल्याला आवडतील अशी अपेक्षा करतो

Leave A Reply

आपला ई-मेल कुठेही प्रदर्शित केला जाणार नाही.