आयुष्यात एखादी गोष्ट पहिल्यांदा घडणार असेल तर त्याबद्दल आपण प्रचंड उत्साहित असतो. प्रथमच परदेश वारीचा योग आला की आपला उत्साह निराळाच. माझ्या नौकरीच्या निमित्ताने मला श्रीलंका दर्शनाची संधी मिळाली होती, त्याच उत्साहात सगळ्यांसारखा मी उत्साहात होतो. पहिल्यांदा विमानात बसणार ते पण थेट कोलंबोच्या म्हणून मी विमान उडण्याच्या आठवडा भर आधीच आकाशात जाऊन पोचलो होतो.
श्रीलंका म्हणजे काय, भारताने टाकलेला पोलिओ ड्रोप म्हणून आपण भारतीय हिणवणार. ज्याची गणना आपण रावणाची लंका म्हणून करतो त्या देशाचे चित्र मनात रंगवताना अवघड जात होते. आपण भारतीयांना आपल्यासमोर इतरांना तुच्छ लेखण्याची जी खोड आहे, त्यानुसार श्रीलंका हा गरीब मागासलेला देश असावा अन सर्वत्र बकाली अन अविकसित अवस्था असावी असा कल्पना विलास मी केला होता. आपण भारतीय, आपण श्रेष्ठ, आपण विकसित असा मस्तवाल गर्व घेऊन मी निगाम्बो विमानतळावर उतरलो. तिथे दारातच गौतम बुद्धांची तेजस्वी पण शांत मूर्ती दिसते. ती मूर्ती जणू सूचना करत होती, तुमच्या अहंकाराच्या चपला इथे बाहेर काढून मगच ह्या लंकेच्या भूमीवर पाय ठेवा. आणि कागदी कारवाई संपवून बाहेर पडताच गौतम बुद्धांनी केलेली सूचना किती खरी आहे हे पटण्यास सुरवात झाली. विमानतळा बाहेर पडून उबर ची गाडी बोलावली होती. त्या गाडीने कोलंबोच्या दिशेने आपल्या मुंबई पुणे एक्स्प्रेस वे सारख्या एका महामार्गाची कास धरली. बोट दाखवायलाही जागा उरणार नाही इतक्या व्यवस्थित व सुंदर महामार्गावरून नियंत्रित वेगात गाडी धावू लागली तेव्हा, ह्या इवल्याश्या देशात रस्ते भारताच्या तुलनेने रस्ते किती सुधारित आहेत ह्याची खुण गवसली. कोलंबो आणि कॅन्डी ह्या दोन्ही शहरांत मला रस्त्यांच्या बाबतीत टीका करण्याची एकही संधी मिळाली नाही, ज्या ज्या सार्वजनिक बाबींवर आपण भारतात रोज गळे काढतो, त्या सगळ्या गोष्टी लंकेत अगदी व्यवस्थित होत्या. मी कोलंबो आणि कॅन्डी ही दोनच शहरे पाहिली पण ज्या मागासलेल्या लंकेच्या कल्पना मी योजिल्या होत्या, त्या सगळ्या हवेतल्या गाठोड्यात बांधून मला समुद्रात फेकून द्याव्या लागल्या अशी ती लंका आहे.
समुद्रावरून आठवलं, इथला समुद्र म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा, निळाशार, अगदी कोरा करकरीत, त्यात भरपूर जलसंपत्ती. चार दिवसाला एकदा नळाला पाण्याची बारीक धार येणारे आम्ही मराठवाडी अशी जलसंपत्ती पाहून वेडेपिसे होतो. योगायोगाने अशाच एका समुद्र किनारी असलेल्या हॉटेल मध्ये राहण्याचं स्वर्गसुख मला लाभलं. कोलंबो च्या निळाशार समुद्रा कडे कडे ने रेल्वे धावते. ते दृष्य बघायला मिळणे म्हणजे वेगळाच अनुभव आहे. समुद्र किनारा अन रेल्वे ह्याचं अतूट मैत्रीचं नातं असावं अन ते हातात हात घालून खेळत बागडत असावेत असे ते विहंगम दृष्य.
श्रीलंकेत भरपूर निसर्ग आहे, म्हणजे निसर्गाने देताना अजिबात काही हातचे राखलेले नाही. जसा समुद्र तशी गर्द झाडीने न्हालेली डोंगराई. कोलम्बो वरून कॅन्डी ला रेल्वेने जावे, आजवर केलेल्या रेल्वे प्रवासांत हा एक रेल्वे प्रवास अविस्मरणीय आहे. त्या एक दिवसाच्या प्रवासाची एक वेगळीच कहाणी मी पुन्हा कधी सांगेन. सृष्टीच्या चित्रकाराने कॅनव्हासवर भरपूर रंग मोकळ्या हाताने उधळून त्यातून सुंदर चित्र निर्माण करावे, ते चित्र म्हणजे श्रीलंका.!
भारतीयांसाठी श्रीलंका ही रावणाची भूमी असली तरी लंकन लोकांनी तिला गौतम बुद्धांची पवित्र भूमी म्हणून जपले आहेत. मोठ्या प्रमाणावर बुद्ध मंदिरे इथे आहेत. थोड्याफार फरकाने भारतीय देवतांची बौध्द रूपे इथे पाहायला मिळाली. इथला एक सामाजिक नियम आहे, तो मनात घर करून आहे. इथे वारंवार सूचना केली जाते, की कुठल्याही देवतेच्या मूर्ती कडे आपण पाठ करू नये त्याने त्यांचा मान राखला जात नाही, फोटो काढताना देखील मूर्ती कडे पाठ करणे म्हणजे गुन्हा ठरते. हा नियम वारंवार सांगितला गेला, आपणही छत्रपतींच्या राज्यात वावरताना, गड किल्ल्यांवर, महापुरुषांच्या प्रतिमांसमोर सतत अशा सूचना एकमेकांना अन येणाऱ्या प्रत्येकाला करत गेलो तर?
ते काही असो, पण श्रीलंका अतिप्राचीन पण आताच्या काळात हवा तसा प्रगत देश आहे असे मला भासले. उण्यापुऱ्या आठ दहा दिवसांच्या अनुभवात मी श्रीलंकेचे चार आठ पाने गणित मांडणे चुकीचे होईल. एव्हाना तिथे जाण्या आधीच लंकेला गरीब अन मागासलेला म्हणत हिणवून माझ्या पामर बुद्धीने आपली पत दाखवली होती. पण श्रीलंका समृद्ध आहे, इथे चहा अन मसाले व भात इतकचे उत्पादन होत असले तरी तो जगाच्या पटलावर चहा निर्माता म्हणून ओळखला जाणारा देश आहे. बाकी सर्व गोष्टी इथे आयात होतात. पण लंकेत कुठल्याही शिक्षणासाठी एक रुपया देखील खर्च करावा लागत नाही, आरोग्य व्यवस्थेचे देखील तसेच. हे सर्व ऐकून मी आश्चर्यचकित झालो होतो. इथे संस्कृती अन राहणीमानाच्या बाबतीत सगळीकडे ब्रिटीश छाप दिसून येते, म्हणजे ब्रिटिशांनी अख्या जगालाच बिघडवले आहे त्याला लंका कोण अपवाद!
श्रीलंका म्हणजे माझ्यासाठी नीटनेटक्या व्यवस्थेचे चित्र वाटते. गदिमांनी त्यांच्या गीतात ‘रम्य ही स्वर्गाहुनी लंका’ असे वर्णन केले. ते योग्यच आहे. आपल्या आठवड्याच्या भेटीत मला श्रीलंका स्वर्गासम भासली. लंका रावणाची असली तरी ती बहु सुंदर आहे. तिथे उद्योगांची रेलचेल नसली तरी निसर्गाची देण आहे. श्रीलंका अर्थाने गरीब असेल कदाचित पण निसर्गाने संपन्न आहे. अशा ह्या लंकेचा अनुभव प्रत्येकाने आयुष्यात एकदा घ्यावाच असे मी म्हणतो. दक्षिणेत फिरायला जाताना जरा चेन्नई केरळ च्या पलीकडे चार पावलं गेलात तर तुम्हाला सहज ह्या सुखाचा अनुभव घेता येईल, तो एकदा प्रत्येकाने घ्या आणि हो अहंकाराच्या चपला बाहेर काढूनच ह्या लंकेच्या भूमीत प्रवेश करा.
बोहोमा इस्तुती!
जब्बरदस्त!
आपल्याकड देवळातून बाहेर येताना देवाकड तोंड करून उलट बाहेर यायचं अशीच रीत होती / आहे. देवाकड (पूर्वी राजाकड देखील) पाठ करायची नाही असा प्रघात होता.
बाकी रेल्वेबद्दल लिहाच.
होय, हि तशीच काहीशी पध्दत आहे, देवाकडे पाठ करायची नाही, श्रीलंकेतील अनेक गोष्टींचे मूळ हे भारतात आहे, त्यामुळे आपल्या सारख्या अनेक गोष्टी त्यांच्याकडे आहेत, पण विषय असा की ह्या पद्धती ते आजही सांभाळून आहेत अन जे नवीन येतात त्यांना त्या समजावून सांगत आहेत, आपल्याकडे उलट आहे, आपणही आपल्या पद्धती पाहुण्यांना सांगितल्या पाहिजेत.
आणि हो त्या रेल्वे प्रवासाबद्दल एकदा वेगळा लेख लिहावं असं आहे, म्हणून ह्यात जास्त लिहिलं नाही
सुंदर वर्णन .
आनंद वाटला .
धन्यवाद…!
खूप छान वर्णन👍दर्जा👌👌
धन्यवाद…!
खूपच सुंदर वर्णन..खूप दिवसांपासून श्रीलंका पहायचं मनात आहे…हा ब्लॉग वाचून ती इच्छा अजूनच दृढ झाली.
पासपोर्ट आहे का? उद्याच थेट विमान पकडा आणि तासाभरात उतारा कोलंबोत! मी म्हणतो नक्की जा तिथे… आणि जाल तर अजिबात पश्चात्तापाची वेळ येणार नाही ही हमी आहे
भारिय लिहत राहा
धन्यवाद…
हे सगळं वाचताना वर्णन केलेल्या गोष्टींचे चित्रण डोळ्यांपुढे उभे राहते.उत्कृष्ट लेखन.keep it up….!!All the best..👍👍
धन्यवाद अपूर्वा ….
लेख खुप छान वाटलं. खुप दिवसानंतर शुद्ध मराठी भाषा ऐकायला मिळेल.
अप्रतिम वर्णन केलंत
जायची इच्छा झालीये
नक्कीच जाईन
@ashutoshab🙏
मी
@dkulkarni4718