दादोबा पांडुरंग तर्खडकर – मराठी भाषेचे पाणिनी

सुमारे २०० वर्षांपुर्वी,वाघिणीचं दुध म्हणविल्या गेलेल्या इंग्रजी भाषेच्या आगमनाच्या काळात मराठी भाषेचे व्याकरणवयाच्या विसाव्या वर्षी लिहून ते पूर्ण करणारे दादोबा पांडुरंग तर्खडकर (९ मे १८१४–१७ ऑक्टोबर १८८२), तर्खडकर भाषांतरमाला या ग्रंथांच्या रूपाने सर्वपरिचित आहेतच.

इंग्लिश भाषा शिकणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांना ती भाषा शिकणं सोपं वाटावं, या हेतूनं दादोबांनी ग्रंथाची रचना इंग्लिश व्याकरणाच्या पद्धतीनं केली. या ग्रंथात त्यांनी पुण्याची भाषा ही प्रमाणभाषा मानली असून, प्रश्‍नोत्तर पद्धतीचा अवलंब केला आहे.

अव्वल इंग्रजीतील मराठी व्याकरणकार, ग्रंथकार आणि कळकळीचे धर्मसुधारक असलेल्या दादोबांचा जन्म वसई,मुंबई येथे झाला. प्राथमिक शिक्षण घरी वडिलांजवळ तसेच खाजगी शाळांतून आणि माध्यमिक शिक्षण ‘बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ च्या शाळेत झाले.मराठी व इंग्रजी सोबतच फारसी आणि गुजराती भाषा देखील ज्ञान देखील दादोबांना अवगत होत्या.

संस्कृत व इंग्रजी भाषांच्या व्याकरणाचे अध्ययन करून आणि मराठी भाषेच्या रूपविचाराची स्वतंत्र प्रज्ञेने व्यवस्था लावून मराठी भाषेचे व्याकरण (१८३६) त्यांनी सिद्ध केले. ह्या व्याकरणाच्या अनेक आवृत्या निघाल्या. १८८१ मध्ये दादोबांनी आपल्या व्याकरणाच्या सातव्या आवृत्तीची पूरणिकाही प्रसिद्ध केली. विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी लघुव्याकरणही (१८६५) त्यांनी लिहीले. त्याच्याही अनेक आवृत्या निघाल्या. मोरोपंतांच्या केकावलीवर यशोदापांडुरंगी (१८६५) ही गद्य टीका त्यांनी लिहिली. तीतून दादोबांची सहृदयता प्रत्ययास येते. ह्या टीकेस इंग्रजी आणि मराठी अशा दोन प्रस्तावना त्यांनी जोडल्या. त्यांपैकी मराठी प्रस्तावनेत त्यांचे वाङ्‌मयविषयक विविध विचार आलेले आहेत.

दादोबांचे १८४६ पर्यंतचे आत्मचरित्रहे देखील महत्त्वाचे आहे. अव्वल इंग्रजीतील जवळजवळ एकमेव आत्मचरित्र म्हणून दादोबांच्या आत्मचरित्राचे महत्त्व आहे. त्यांच्या काळातील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय स्थितीचे त्यात पडलेले प्रतिबिंबही अभ्यासकांच्या दृष्टीने मोलाचे आहे. स्वतः दादोबांचे जीवन अशा काही चळवळींशी वेगवेगळ्या प्रकारे निगडित झालेले असले, तरी त्यांच्या आत्मचरित्रातून त्या चळवळींबरोबरच दादोबांचे व्यक्तिमत्त्वही स्पष्टपणे प्रत्ययास येते.

ग्रंथलेखनाप्रमाणेच समाजसुधारणेचे कार्यही दादोबांनी केले. सरकारी नोकरी करीत असतानाच लोकहिताच्या कार्यात त्यांनी भाग घेतला. दुर्गाराम मनसाराम मेहेता यांनी सुरतला स्थापन केलेली मानवधर्मसभा आणि राम बाळकृष्ण जयकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली परमहंस सभा या धर्मसुधारक संस्थांमागे दादोबांची प्रेरणा होती. यांशिवाय मराठी ज्ञानप्रसारक सभा, मुंबई विद्यापीठ, पुनर्विवाहोत्तेजक सभा, बॉम्बे असोसिएशन इ. संस्थांच्या कार्यातही त्यांचा सहभाग असे. भिल्लांचा बंडखोर पुढारी पटाजी नाईक याचे बंड त्यांनी १८५७ साली मोडून काढले व सरकारने रावबहादुर ही पदवी त्यांना बहाल केली.

लोकहितवादी गोपाळराव देशमुख , भाषाशिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर,मोरो केशव दामले यांसारख्या अव्वल विचारवंतांनी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची त्यांच्या लेखनातून पाणिनीशी तुलना केल्याने तर्खडकर मराठी भाषेचे पाणिनीम्हणून प्रसिद्ध आहेत.17 ऑक्‍टोबर 1882 ला दादोबांचं निधन झालं.

महाराष्ट्रभाषेचे पाणिनीदादोबा पांडुरंग तर्खडकर यांना विनम्र आदरांजली.

6 thoughts on “दादोबा पांडुरंग तर्खडकर – मराठी भाषेचे पाणिनी

 1. “सुमारे २०० वर्ष पूर्वी…” हे असं मराठीत लिहीतात?? हे तर “२०० साल पहले..” या हिंदीतील वाक्यासारख लिहीलय तुम्ही. मला वाटत ते “सुमारे २०० वर्षांपूर्वी ..” अस लिहीतात.

  1. ती टंकलेखन चूक राहीली आहे, लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद,

 2. मानवधर्मसभा, धर्मसुधारक संस्था इत्यादी विधायक कार्यांशी संलग्न असलेल्या दादोबांनी भिल्लांचा बंडखोर पुढारी पटाजी नाईक याचे बंड १८५७ साली मोडून काढले आणि या कामाबद्दल त्यांना सरकारी मानमरातब मिळावा हे त्यांच्या एकंदर आयुष्याशी विसंगत वाटते. पटाजी नाईकचा १८५७च्या ‘स्वातंत्र्य’ लढयात काही भाग होता का?

  1. हरजी नाईक व पटाजी नाईक हे अहमदनगर जिल्ह्यातील भिल्लांचे म्होरके होते.१८५७ मध्ये उठावाचे रणशिंग फुंकले जाताच भागोजी नाईक,कजरसिंग नाईक,खाजा नाईक इत्यादींच्या नेतृत्वात सातपुडा सातमाळा मधील भिल्लांनी उठाव केला होता,हे सर्व थेट तात्या टोपेंच्या संपर्कात होते.सातपुड्याच्या भिल्लांच्या उठावाला साथ म्हणून अहमदनगर च्या नांदगाव,यावल,पाचोड आदि भागातल्या भिल्लांनी उठाव केले,त्यावेळी तर्खडकर हे अहमदनगर ला उपजिल्हाधिकारी (डेप्युटी कलेक्टर) होते,हा नगर च्या भिल्लांचा उठाव त्यांनी चातुर्याने मोडून काढला होता.नगर मधील भिल्लांचे म्होरके पटाजी नाईक हेच होते.
   दादोबांनी सुधारणावादी कार्य केले असले तरी ते इंग्रजांची चाकरी करतच होते.त्यामुळे हि विसंगती वाटते.

 3. दादोबा पांडुरंग ह्यांची जात नक्की काय?
  १. ते वैश्य वाणी नाहित
  २. ते ब्राम्हण ही नाहित
  ३.त्यांचे चरित्र प्रियोळकर प्रकाशित करतात वसई व कारवार हे अंतर
  ४.ते सोनार भंडारी व पाठारे प्रभु हि नाहित
  ऊत्तर दिल्यास चांगले
  ९०२१३७३६२८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.