मलिक अंबर – एक हबशी गुलाम ते अहमदनगरच्या निझामाचा प्रधान

औरंगाबाद शहराच्या इतिहासाची गोष्ट जेव्हा वर्तमान पत्रांतून छापली जाते तेव्हा एक नाव नेहमी घेतलं जातं ते ‘मलिक अंबर’. चारशे वर्ष जुने औरंगाबाद शहर अर्थात तत्कालीन खिडकी (खडकी) ची स्थापना करून शहरात अजूनही अस्तित्वात असलेली पाणीपुरवठा व्यवस्था म्हणजे ‘नहर-ए-अंबरी’ ची उभारणी करणारा इतपत मलिक अंबर ची ओळख तर सर्वांनाच आहे. पण शहराचा स्थापत्य-विशारद ह्यापेक्षाही मोठी ओळख त्याची करून द्यावी ती म्हणजे एक उत्तम राजकारणी,प्रशासक अन कर्तुत्ववान योद्धा.

जगात इतर कुठल्याही भूमीला न लाभलेला इतका सुंदर,विविध पैलूंनी नटलेला भारतीय इतिहास म्हणजे आश्चर्यांची खाण म्हणावी लागते. आपल्या बहरलेल्या ऐतिहासिक पुस्तकांच्या पानांतून अनेक आश्चर्यकारक गोष्टींना जन्म देणारा हा भारतीय इतिहास काही गूढ व्यक्तींना आपल्या जीर्ण पानांतून दडवून ठेवतो अन त्यापैकीच एक म्हणजे मलिक अंबर. दख्खन च्या इतिहासात मराठेशाही च्या पराक्रमाने मुघलांच्या नाकात दम करण्यापूर्वी मुघलांना विशेषतः बादशाह जहांगीरला त्रस्त करून सोडण्याचं काम करणारा मलिक अंबर हा एक चकित करणारा योद्धा. एक हबशी गुलाम म्हणून भारतात येउन पोचलेला पुढे हळू हळू कर्तुत्व गाजवत थेट अहमदनगरच्या निझामाचा ‘पेशवा’ अर्थात पंतप्रधान झाला. ढासळलेली निजामशाही सावरून ती सांभाळण्याचं काम करणं हे अत्यंत धाडसाचं अन कौशल्यपूर्ण काम मलिक अंबर ने केलं. केवळ मुघलांना दख्खनेत उतरण्यापासून रोखण्याचं नव्हे तर एक आदर्श राज्यपद्धती सुरु करून इथल्या मुलखाचा विकास करण्याचं श्रेय मलिक अंबर ला द्यावं लागेल. ह्याच मलिक अंबर ची औरंगाबाद शहराचा निर्माता ह्या पलीकडची ओळख करून घेण्याचा हा प्रयत्न.

मलिक अंबर एक हबशी गुलाम ते अहमदनगरच्या निझामाचा प्रधान

मलिक अंबर च्या जन्माची तारीख आणि वर्ष नेमके वर्ष सांगता येत नाही परंतु १५४० ते ५० च्या उत्तरार्धात इथिओपिया च्या हरार मध्ये मलिक अंबर चा जन्म झाला.इथिओपिया चं जुनं नाव होतं ‘अबसीनिआ’ (Abyssinia) त्यावरून अरब त्यांना हब्श म्हणत ज्यांना भारतात ‘हबशी’ म्हणून ओळखलं जातं.मलिक अंबर चं मूळ नाव ‘चापू’ आणि ‘शांबू’ असल्याचं वाचायला मिळतं. मलिक अंबर लहान असतानाच गुलाम म्हणून विक्री का झाला ह्याचे बरेच अनुमान असले तरी बहुदा गरिबी मुळे आई वडिलांनीच त्याची विक्री केली अथवा अरबांच्या हल्ल्यात तो गुलाम म्हणून पकडला गेला असावा. आपल्या लहान वयातच अनेक वेळा विक्री होत यमन आणि मक्का मधील गुलामांच्या बाजारांतून तो बगदाद मधील मीर कासीम अल-बगदादी नामक त्याच्या मालकाच्या हाती येउन पडला.याच मधल्या काळात ह्या इस्लाम च्या शिकवणी नुसार चापू ‘काफिर’ चा धर्म बदलून त्याला इस्लाम बनवण्यात आलं.बगदाद मध्ये असतानाच त्याला ‘अंबर’ हे नवीन नाव मिळालं अन तिथून मजूर म्हणून अंबर ची पाठवणी दक्षिण मध्य भारतात झाली.

भारतात आल्यावर अंबर चंगेज खान च्या सेवेत आला. चंगेज खान हा स्वतः हबशी. चंगेज खान,अहमदनगरच्या निजामाचा ‘पेशवा’ म्हणजे पंतप्रधान होता. सुमारे १५७० च्या काळात चंगेज खानच्या सान्निध्यात आल्यापासूनच अंबर हा इतर गुलामांच्या तुलनेत हुशार आणि शौर्य गाजवणारा असल्यामुळे त्याची नेमणूक चंगेज खान च्या रक्षणात झाली. चंगेज खानच्या सान्निध्यात राजकारण अन उत्तम प्रशासनाचे तंत्र मलिक अंबर ने अवगत केलं. पुढे चंगेज खान चा मृत्यू होताच त्याच्या सेवेतले अनेक हबशी गुलाम स्वतंत्र झाले, अंबर ने देखील आपली एक छोटी हबशी घोडेस्वारांची सैन्य तुकडी उभी करून निझामशहा च्या सेवेतून बाहेर पडला. अहमदनगरच्या निझामशाही साम्राज्याचा होत असलेला ऱ्हास पाहून अंबर आपल्या सैन्यासह सुरवातीला गोलकोंडा व नंतर विजापूर दरबार च्या सेवेत गेला मात्र तेथेही त्याला फारशी संधी न मिळाल्याने अंबर पुनश्च अहमदनगरला परतला. विजापूर च्या सेवेत असतानाच आदिलशहा ने त्याला ‘मलिक’ ही पदवी देऊन गौरव केला होता व पुढे त्याचे हेच नाव प्रचलित झाले.

अहमदनगर च्या गादीवर बसलेला कमकुवत निझाम पाहून अकबर सुद्धा आपली दख्खन विजयाची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तयारीत होता. त्याकरिता बरेच सैन्य त्याने दक्षिणेत पाठवले,अनेक हल्ले केले पण अहमदनगर च्या सेवेत आता ‘मलिक अंबर’ नामक एक कृष्णवर्णी सेनानी होता. मुघल सेनेवर छोटेमोठे हल्ले करणं,त्यांची रसद लुटून आणणं,त्यांचा दारुगोळा पळवणं असे प्रकार करून मलिक अंबरने मुघल सैन्याला त्रस्त केलं. त्याच्या ह्याच कामामुळे हळू हळू करत त्याला निझामाच्या पदरी मोठा सन्मान मिळत गेला,त्याचे सैन्यबळ ही वाढतच गेलं. पुढे निजाम कमकुवत होतच गेला आणि मुघलांनी थेट अहमदनगर किल्ला ताब्यात घेतला,पण मुघलांच्या नशिबात दिग्विजय बहुदा लिहिलाच नव्हता,अहमदनगर ची राजधानी पडली असली तरी किल्ला आणि आसपासचा भाग सोडला तर इतर प्रदेशावर मुघलांचा ताबा नव्हता. त्याचा फायदा घेत मलिक अंबर आपल्या सैन्यासह निसटला आणि थेट परंडा येथे पोचला. इथून पुढे त्याच्या मुत्सद्दीपणा चा एक उत्तम नमुना सांगता येऊ शकेल. मलिक अंबर ने निझामशाही वंशातल्या अली मुर्तुझा द्वितीय ह्याच्याशी आपल्या  मुलीचा विवाह करवून दिला अन त्याला निजामशाही साम्राज्याचा सम्राट घोषित केलं. अन स्वतः त्या निजामाचा वजीर म्हणून कारभार पाहू लागला. आता संपूर्ण निजामशाहीची कमान आपल्या हातात घेऊन मलिक अंबर दक्षिणेच्या राजकारणात महत्वाचा दुवा बनला होता. त्याने परंडा येथेच निझामाची राजधानी स्थापली अन मुघलांच्या ताब्यातला बराच प्रदेश पुन्हा अहमदनगर साम्राज्यात आणला.

एव्हाना मलिक अंबर ५०,००० हून अधिक सैन्याचे नेतृत्व करू लागला,त्याने मराठे (मराठी बोलणारे) सरदारांच्या मदतीने ४०,००० मराठे सैन्य उभे केले. आपल्या ‘गनिमी कावा’ या युद्धतंत्राचा वापर करून पुढची तीन दशकं त्याने मुघलांना सळो की पळो करून सोडलं.पुढे दख्खन चा प्रदेश मुघलांच्या तावडीतून मुक्त करून त्याने परंडा वरून राजधानी जंजिरा इथे हलवली. दौलताबाद सारखा किल्ला साम्राज्यात आणला अन मोक्याच्या जागांवर अनेक छोटे मोठे किल्ले उभे केले जेणेकरून प्रदेशाची निगराणी सोपी झाली. मुघला सोबत अनेक मोठ्या लढाया होऊन त्यांना पराभव दाखवला. अकबराच्या मृत्यू नंतर सत्तेवर आलेला जहांगीर,मलिक अंबर ची धास्ती घेऊन प्रचंड चिडला होता,त्या बाबत त्याच्या चित्रकाराने काढलेलं चित्र बरंच काही बोलून जातं ज्यात बादशहा जहांगीर एका पृथ्वीच्या गोलावर उभा राहून मलिक अंबरच्या मुंडक्यावर धनुष्य रोखून आहे. ह्या चित्रातून जहांगिराची मलिक अंबर बद्दल असलेली चीड स्पष्ट होते. मलिक अंबर मराठ्यांच्या आधी मुघलांना त्रस्त कारून सोडणारा हा हबशी योद्धा इतिहासाच्या पानांत मात्र हरवून गेला.

malik-ambar-jahangir

१६०५ ते १६२६ ह्या काळात मलिक अंबर निजामशाहीची सूत्रे हातात घेऊन होता,मात्र त्याच्या मृत्य नंतर अवघ्या दहा वर्षांत अहमदनगर ची निजामशाही कायमची नष्ट झाली ह्यावरून निजामशाही केवळ मलिक अंबर व त्याच्या कुशल सैन्याच्या आणि प्रशासनाच्या खांद्यावर कशी टिकून होती हे स्पष्ट होतं.

मलिक अंबर: मराठी सैन्याची पायाभरणी

मुळात मलिक अंबर हा हबशी,तो इथे गुलाम म्हणून आला अन चंगेज खानच्या मृत्यू नंतर जेव्हा तो स्वतंत्र झाला त्याच्या पदरी १५०० घोडेस्वार सैन्य होतं. पण येत्या काळात झालेल्या घडामोडी त्याला महत्व देत गेल्या आणि त्याला अधिकाधिक सैन्याची गरज पडली. त्यावेळी मुघलांच्या स्वाऱ्या सहन करून त्रस्त झालेला मराठी प्रदेश व इथला सामान्य शेतकरी वर्ग यांना सोबत घेऊन मलिक अंबर ने त्याचं सैन्य उभं करायला सुरुवात केली. आधीचे स्वतंत्र झालेले हबशी सैन्य अन मराठे मिळून मलिक अंबर कडे सुमारे ५०,००० सैन्य गोळा होत गेलं.

मलिक अंबर च्या पदरी अनेक मराठे सरदार होते. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा व शहाजी राजेंचे वडील मालोजी राजे हे अंबर च्या अत्यंत विश्वासातले सरदार म्हणून ओळखले जात.आपल्या सोबत असलेल्या अनेक मराठे

मलिक अंबर आणि प्रशासन

केवळ शौर्य गाजवून,मराठ्यांना एकत्र करून मुघलांना त्रस्त करणेच नव्हे तर राज्य करण्याच्या पद्धतीत अमुलाग्र बदल मलिक अंबर ने घडवले. सामान्य जनतेकडून मिळणारा महसुल त्याने ३३ टक्यांपर्यंत कमी केला,तसेच शेतसारा गोळा करण्याची पद्धती बदलून ठराविक महसुल न घेता दरवर्षी जितके उत्पन्न होईल त्यानुसार महसुल कमी जास्त करण्याची मुभा देणारी पध्दत मलिक अंबर ने घालून दिली. ह्यातून सामान्य शेतकरी वर्ग बराच सुखावला,तसेच प्रत्येक प्रदेशाची प्रतवारी निश्चित करून त्यानुसार प्रत्येक ठिकाणी महसुल कमी जास्त केला गेला ह्या सगळ्यांमुळेच मलिक अंबर सामान्य जनतेच्या मनात आदराचे स्थान मिळवून होता. प्रशासन करण्याची नवीन पध्दत राबवल्याने मलिक अंबर ला जनतेचं भरपूर पाठबळ मिळालं अन तो लोकप्रिय झाला.

3 Comments

  1. खूपच चांगली माहिती आहे आणि खूप सुंदर लिहिली आहे. असेच आणखीन लेख लिहिले असल्यास वाचायला नक्की आवडेल, धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.